वैद्यकीय अधिकाऱ्यांसह दहा पदे रिक्त

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 21 मार्च 2017

ढेबेवाडी - येथील ग्रामीण रुग्णालयात दोन वैद्यकीय अधिकाऱ्यांसह इतर सुमारे दहा कर्मचाऱ्यांची पदे रिक्त असल्याने वैद्यकीय सेवा विस्कळित झाली आहे. 

ढेबेवाडी - येथील ग्रामीण रुग्णालयात दोन वैद्यकीय अधिकाऱ्यांसह इतर सुमारे दहा कर्मचाऱ्यांची पदे रिक्त असल्याने वैद्यकीय सेवा विस्कळित झाली आहे. 

येथे २००९ मध्ये ग्रामीण रुग्णालयास मंजुरी मिळाली. जुने प्राथमिक आरोग्य केंद्र पाडून तेथे नवीन इमारत बांधण्यात आली. नवीन इमारत होताना रुग्णालय प्राथमिक शाळेच्या शेडवजा खोल्यांमध्ये सुरू होते. त्यावेळी सगळ्यांनाच त्रास सहन करावा लागला. ते रुग्णालय नवीन इमारतीत स्थलांतरित झाले आहे. मात्र, रुग्णालयातील विविध विभाग अजूनही सुरूच झालेले नाहीत. येथे पुरेसे कर्मचारी नसल्याने उपलब्ध कर्मचाऱ्यांसह अधिकाऱ्यांची त्रेधा उडत आहे. वैद्यकीय अधिकारी दोन, शिपाई तीन, लिपिक दोन जागा रिक्त आहेत. सिस्टर, फार्मासिस्ट आदींच्या जागाही रिक्तच आहेत. कर्मचाऱ्यांच्या निवासस्थानाचा प्रश्‍न अनेक वर्षे न सुटल्याने कर्मचारी व डॉक्‍टर सध्या भाड्याने खोल्या घेवून वास्तव्याला आहेत. रुग्णालयाच्या इमारतीमुळे रुग्णालय सुसज्ज वाटत असले तरी येथे येणाऱ्या रुग्णांच्या पदरी निराशाच पडत आहे. पुरेशा सुविधा उपलब्ध नसल्याने खासगी दवाखान्याचा रस्ता पकडण्याशिवाय रुग्णांसमोर दुसरा पर्यायच नाही. अनेकदा उपचारावरील मर्यादेमुळे येथून रुग्णांना कऱ्हाडला किंवा साताऱ्याला पाठविले जात आहे. एक्‍सरे आणि शस्त्रक्रिया विभागही अद्याप सुरू नाही.

कर्मचाऱ्यांच्या रिक्त जागा भरून ते पूर्ण क्षमतेने कार्यरत होण्याची गरज आहे. संबंधितांनी याप्रश्‍नी तातडीने लक्ष घालावे. रुग्णांचे हाल कायम राहिल्यास याप्रश्‍नी आम्ही रस्त्यावर उतरून आंदोलन करू.  
- हिंदूराव पाटील, ज्येष्ठ नेते, काँग्रेस

Web Title: 10 post empty with medical officer