सोलापुरात डेंगीसदृश आजाराचे 103 रुग्ण 

विजयकुमार सोनवणे
बुधवार, 20 जून 2018

सोलापूर : शहर व हद्दवाढ भागात 1 जानेवारी ते 15 जून 2018 या  साडेसहा महिन्यांच्या कालावधीत डेंगीसदृश आजाराची लागण झालेले 103 रुग्ण आढळले. उपचारानंतर हे रुग्ण बरे झाले आहेत. हिवताप विभागामार्फत शहराच्या विविध भागात एक लाख 23 हजार 524 ठिकाणच्या पाणी साठवलेल्या ठिकाणची तपासणी करण्यात आली. त्यापैकी 4328 कंटनेर, भांड्यांत लारव्हा (अळ्या) आढळल्या. 

सोलापूर : शहर व हद्दवाढ भागात 1 जानेवारी ते 15 जून 2018 या  साडेसहा महिन्यांच्या कालावधीत डेंगीसदृश आजाराची लागण झालेले 103 रुग्ण आढळले. उपचारानंतर हे रुग्ण बरे झाले आहेत. हिवताप विभागामार्फत शहराच्या विविध भागात एक लाख 23 हजार 524 ठिकाणच्या पाणी साठवलेल्या ठिकाणची तपासणी करण्यात आली. त्यापैकी 4328 कंटनेर, भांड्यांत लारव्हा (अळ्या) आढळल्या. 

लारव्हा आढळून आलेल्या ठिकाणच्या नागरिकांना ते पाणी टाकून देण्याची सूचना देण्यात आली असून, पाण्यामध्ये अबेट या अळीनाशकाची फवारणी करण्यात आली आहे. महापालिका हिवताप विभागाच्या पथकाने शहर व हद्दवाढीच्या घरातील हौद, कुलरमधील पाणी, रिकामे टायर, गेल्या सात ते आठ दिवसांपासून साठविण्यात आलेले पाणी असे स्वरूप या घरांमध्ये होते. या घरमालकांना पाणी टाकून देण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. सापडलेले डास हे अळीच्या स्वरूपात होते. हे पाणी आणखी चार ते पाच दिवस तसेच ठेवले असते, तर अळीचे रूपांतर डासात होऊन, त्यापासून डेंगी व चिकुनगुनियाचा प्रसार झाला असता. 

डेंगीसदृश आजाराचे रुग्ण आढळलेल्या परिसरात धुरावणी करण्यात येत आहे. तसेच घरोघरी जाऊन पाणी टाक्‍या तसेच कंटेनरही तपासले जात आहेत. ज्या ठिकाणी तीनपेक्षा जास्त दिवस पाणी साठविलेल्या टाक्‍या आहेत, त्या रिकाम्या करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. 

अशी होते डेंगीची लागण -
डेंगी हा ताप गंभीर स्वरूपाचा असून, एडिस इजिप्ती डासाच्या मादीपासून त्याचा प्रसार होतो. रुग्णांपासून निरोगी व्यक्तींना त्याचा संसर्ग होतो. डेंगी ताप, डेंगी हिमरिजीक फिव्हर (रक्तमिश्रित रुग्ण) आणि डेंगी शॉक सिंड्रोम असे या आजाराचे प्रकार आहेत. 

डेंगीची लक्षणे -
दोन ते सात दिवसांपासून तीव्र स्वरूपाचा ताप, डोकेदुखी, सांधेदुखी, कंबरदुखी, अंगावर पुरळ येणे, तोंड, नाकातून रक्तस्राव होणे, रक्तदाब कमी होणे, प्लेटलेट काउंट कमी होणे. औषधोपचारामुळे 90 टक्के रुग्ण बरे होतात. मात्र, प्रतिकारशक्ती कमी असलेल्या 10 टक्के रुग्णांना रुग्णालयात दाखल करावे लागते. 

बचावासाठी हे करा..
पाणी झाकून ठेवावे. अडगळीचे सामान, रिकामे डबे, फुटकी भांडी, बिनकामाचे टायर नष्ट करावेत. ताप आल्यास रक्ताची तपासणी करावी. वैयक्तिक संरक्षणासाठी मच्छरदाणी, रासायनिक कॉइलचा वापर करावा. साठलेले पाणी वाहते करावे. डासोत्पत्ती होऊ नये यासाठी पाण्यात गप्पी मासे सोडावेत. 

उपलब्ध औषधसाठा 
- अबेट - 170 लिटर 
- डिपीआर पावडर - 475 किलो 
- सायक्रोथ्रीन - 300 लिटर 
- फवारणी यंत्र - 400 

डेंगीबाबत जनजागृती करण्यासाठी हिवताप विभागातर्फे जनजागरण मोहीम राबविली जाणार आहे. विशेषतः मोठी रुग्णालये, शासकीय कार्यालये, दवाखान्यातील पाणी टाक्‍या तपासण्यात येणार आहेत. 
- सविता इंगळे, जीवशास्त्रज्ञ, महापालिका हिवताप विभाग 

Web Title: 103 patients like dengue found in solpaur