राज्यातील 11 लाख शेतकऱ्यांचाच 'सन्मान'

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 13 मार्च 2019

सोलापूर - राज्यातील एक कोटी 21 लाख 55 हजार अल्प व अत्यल्प भूधारक शेतकऱ्यांपैकी 70 लाख 72 हजार शेतकरी केंद्र सरकारने सुरू केलेल्या सन्मान निधीसाठी पात्र ठरले. परंतु, आतापर्यंत त्यापैकी 11 लाख 55 हजार शेतकऱ्यांच्या खात्यावर प्रत्येकी दोन हजार रुपये जमा करून त्यांचा सन्मान करण्यात आल्याची माहिती कृषी आयुक्‍त कार्यालयाने दिली. उर्वरित 59 लाख 17 हजार शेतकऱ्यांना अद्यापही प्रतीक्षाच असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.

जगाचा पोशिंदा असलेल्या बळिराजाचा मदतीच्या स्वरूपात सन्मान करण्याच्या उद्देशाने केंद्र सरकारने देशातील 12 कोटी शेतकऱ्यांना वार्षिक सहा हजार रुपये देण्याचा निर्णय घेतला. दोन हजार रुपयांचा पहिला हप्ता 31 मार्चपर्यंत जमा करण्याचे आदेशही दिले. परंतु, सर्व्हरचा अडथळा, बॅंक खात्याला आधार लिंक नसणे, बॅंकांच्या माहितीत त्रुटी, खाते क्रमांक चुकीचे, या कारणांमुळे काही जणांच्या खात्यातील पैसे परत काढून घेण्यात आले. सरकारने योजना सुरू करण्यापूर्वी अडथळ्यांचा अभ्यास न केल्याने मार्चपर्यंत पहिला हप्ता जमा होणे अशक्‍य असल्याचे कृषी आयुक्‍त कार्यालयाच्या सूत्रांनी सांगितले. या पार्श्‍वभूमीवर बळिराजाच्या नशिबी पुन्हा प्रतीक्षाच असल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे.

बॅंकांचे अधिकारी वैतागले
राष्ट्रीयीकृत बॅंकांमध्ये मागील काही वर्षांपासून रिक्‍त पदांची भरती करण्यात आलेली नाही. त्यातच दैनंदिन कामही वाढले असतानाही दुसरीकडे नव्या शासकीय योजनांसाठी सरकारतर्फे बॅंकांकडून तत्काळ माहिती मागविली जाते. त्यामुळे उपलब्ध मनुष्यबळावर ताण येत असल्याने राष्ट्रीयीकृत बॅंकांमधील अधिकारी वैतागल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.

राज्यातील सन्मान निधीची स्थिती
एकूण पात्र शेतकरी 70.72 लाख
माहिती अपलोड 63.49 लाख
निधी मिळालेले शेतकरी 11.55 लाख
मिळालेली रक्‍कम 231 कोटी
प्रतीक्षेतील शेतकरी 59.17 लाख

Web Title: 11 lakh farmer honor