अकरावी-बारावीची तोंडी परीक्षा बंद

युवराज पाटील
गुरुवार, 9 मे 2019

एक नजर

  • अकरावी-बारावीला तोंडी परीक्षा आणि अंतर्गत मूल्यमापनासाठीच्या गुणांची पद्धत बंद करण्याचा निर्णय
  • प्रात्यक्षिके असलेले विषय वगळता सर्व विषयांची शंभर गुणांची परीक्षा
  • येत्या शैक्षणिक वर्षापासून अकरावीची पुस्तकेही बदलणार.  

कोल्हापूर - अकरावी-बारावीला तोंडी परीक्षा आणि अंतर्गत मूल्यमापनासाठीच्या गुणांची पद्धत बंद करण्याचा निर्णय शिक्षण विभागाने घेतला आहे. त्यामुळे आता गुणांची खिरापत बंद होणार असून प्रात्यक्षिके असलेले विषय वगळता सर्व विषयांची शंभर गुणांची परीक्षा होणार आहे. येत्या शैक्षणिक वर्षापासून अकरावीची पुस्तकेही बदलणार आहेत.

दहावीला तोंडी परीक्षा आणि अंतर्गत मूल्यमापनाचे गुण रद्द केल्यावरून विद्यार्थी, पालक आणि शिक्षकांचे चर्चेचे गुऱ्हाळ अगदी परीक्षेच्या तोंडावरही सुरू होते. आता येत्या शैक्षणिक वर्षापासून (२०१९-२०) अकरावी आणि बारावीचीही अंतर्गत मूल्यमापनाची पद्धत बंद करण्यात येणार आहे. गेल्यावर्षी दहावीची पुस्तके बदलल्यानंतर यंदा अकरावीची पुस्तके आणि मूल्यांकन प्रणालीत बदल करण्यात येणार आहे. त्यानंतर पुढील वर्षी (२०२०-२१) बारावीसाठी हे बदल लागू होणार आहेत.

दहावीची तोंडी परीक्षा व अंतर्गत मूल्यमापन बंद केल्यामुळे प्रवेशाच्या स्पर्धेत राज्य मंडळाचे विद्यार्थी मागे पडतील अशी ओरड शिक्षक व पालकांतून होत होती. तसेच त्याचवेळी अंतर्गत मूल्यमापनात शाळा किंवा कनिष्ठ महाविद्यालयांकडून सढळ हाताने गुण दिले जातात, त्यामुळे विद्यार्थ्यांची नेमकी पारख होत नाही, असाही आरोप निकालानंतर दरवर्षी होत होता.

या सगळ्या पार्श्वभूमीवर आता कनिष्ठ महाविद्यालयांच्या तोंडी परीक्षा आणि अंतर्गत मूल्यमापनाचे गुण रद्द करण्याचा निर्णय शिक्षण विभागाने घेतला आहे. अकरावी आणि बारावीला सध्या ८०-२० अशी मूल्यांकन प्रणाली आहे. कला, वाणिज्य शाखेच्या बहुतेक विषयांना वीस गुण हे अंतर्गत मूल्यमापनासाठी असतात. ८० गुणांची लेखी परीक्षा होते. सर्व भाषा विषयांची तोंडी परीक्षा घेण्यात येते, त्यासाठीही २० गुण असतात.

आता भाषा, वाणिज्य शाखेचे विषय आणि कला शाखेचे बहुतेक साऱ्या विषयांची शंभर गुणांची अंतिम परीक्षा होणार आहे. विज्ञान शाखेतील विषय आणि भूगोल, मानसशास्त्र या विषयांच्या प्रात्यक्षिक परीक्षा कायम राहणार आहे; मात्र विज्ञान शाखेच्या भाषा विषयाची तोडी परीक्षा व अंतर्गत मूल्यमापन बंद होणार आहे.

विद्यार्थ्यांसाठी आव्हानात्मक परीक्षा
अकरावी व बारावीच्या परीक्षेतील शेवटचा प्रश्न हा सिद्धांताच्या उपयोजनावर, विद्यार्थ्यांच्या अनुभवावर, कृतीवर आधारित असेल. त्यामुळे विद्यार्थ्यांसाठी परीक्षा अधिक आव्हानात्मक होणार असल्याची चर्चा शिक्षण विभागात सुरू आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 11 th and 12 th standard Oral Exam cancelled by education department