सांगली जिल्ह्यात जानेवारी अखेरीपर्यंत नवीन 11000 वीज कनेक्‍शन 

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 29 October 2020

वीज जोडण्या जानेवारी अखेरीपर्यंत पूर्ण करण्याचे आदेश ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांनी दिले. आमदार अनिल बाबर यांनी ही माहिती दिली. 

आटपाडी (सांगली) ः सांगली जिल्ह्यातील अकरा हजार आणि खानापूर विधानसभा मतदारसंघातील अडीच हजार प्रलंबित वीज जोडण्या जानेवारी अखेरीपर्यंत पूर्ण करण्याचे आदेश ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांनी दिले. आमदार अनिल बाबर यांनी ही माहिती दिली. 

मंत्री राऊत यांच्या उपस्थितीत मुंबईत बैठक झाली. यावेळी महावितरणचे संचालक भालचंद्र खंडाईत, ऊर्जा विभागाचे उपसचिव प्रशांत बडगेरी प्रत्यक्ष उपस्थित होते. तर पुणे विभागाचे प्रादेशिक संचालक अंकुश नाळे, कोल्हापूरचे मुख्य अभियंता निर्मळे, सांगलीचे अधिक्षक अभियंता संजय पेटकर हेही व्हिडिओ कॉन्फरसिंगद्वारे सहभागी झाले होते. 

यावेळी मंत्री राऊत म्हणाले,"" क्षमतेपेक्षा जास्त ताण पडल्यामुळे रोहित्र नादुरूस्त होतात. त्यामुळे अशा रोहित्रा शेजारीच नवीन रोहित्र उभारण्यात येतील. यासाठी स्वखर्चाने तसेच जिल्हा नियोजनच्या निधीतून खर्च करावा. एच. व्ही. डी. एस अंतर्गत नवीन वीज जोडणी याची कामे जानेवारी पर्यंत पूर्ण करा. सहाशे मीटर पेक्षा अधिक लांब वर वीज कनेक्‍शन जोडणी असेल तर तो वाढीव खर्च जिल्हा नियोजन समितीच्या निधीतून करण्यासाठी प्रस्ताव द्यावेत.'' 

बैठकीतील निर्णयानुसार खानापूर मतदारसंघात भिकवडी बु आणि घरनिकी येथील नवीन उपकेंद्रासाठी निविदा काढण्यात येतील. माडगुळे आणि करगणी येथील 4.5 मेगावॅट सौर ऊर्जेचे काम सुरू करण्यात येईल. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 11000 new electricity connections in Sangli district till end of January