सांगली : इंग्रजी शाळांना 1169 विद्यार्थ्यांचा ‘बाय-बाय’

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 23 जुलै 2019

सांगली - इंग्रजी भाषा म्हणजे वाघिणीचे दूध... ते पचवेल तोच भविष्यात टिकेल... इंग्रजी शाळांतील शिक्षणच सर्वोत्तम... ही लाट गेल्या काही वर्षांत जोरात वाहत होती. त्यात बरेच लोक वाहत गेले, काहीजण दिखाऊपणासाठी तर काहींनी मराठी शाळांच्या दर्जाला घाबरून मुलांना इंग्रजी शाळेत प्रवेश घेतला... पण यंदा त्यात मोठा बदल झाला असून तब्बल १ हजार १६९ मुलांनी इंग्रजी शाळांना बाय-बाय करत मराठी शाळेचा रस्ता तुडवायला सुरवात केली आहे.

सांगली - इंग्रजी भाषा म्हणजे वाघिणीचे दूध... ते पचवेल तोच भविष्यात टिकेल... इंग्रजी शाळांतील शिक्षणच सर्वोत्तम... ही लाट गेल्या काही वर्षांत जोरात वाहत होती. त्यात बरेच लोक वाहत गेले, काहीजण दिखाऊपणासाठी तर काहींनी मराठी शाळांच्या दर्जाला घाबरून मुलांना इंग्रजी शाळेत प्रवेश घेतला... पण यंदा त्यात मोठा बदल झाला असून तब्बल १ हजार १६९ मुलांनी इंग्रजी शाळांना बाय-बाय करत मराठी शाळेचा रस्ता तुडवायला सुरवात केली आहे. 

मुलांना कुठल्या माध्यमातून शिक्षण द्यावे, याविषयी प्रचंड प्रमाणात मतमतांतरे आहेत. तज्ज्ञांत गट आहेत. काहींनी मातृभाषेतून शिक्षणाला पर्याय नाही, असा दावा केला तर काही मंडळी इंग्रजी ही भविष्याची गरज असल्याचे मत मांडले आहे. सहाजिकच, पालकांमध्येही गोंधळाची परिस्थिती आहे. दुसरीकडे मोठ्या गावांत आता इंग्रजी शाळा सुरू झाल्या आहेत. दारात त्यांची बस येतेच, मुले टाय-बूट घालून जाताहेत. इंग्रजी कविता म्हणताहेत, हे सारेच मोहात पाडणारे आहे. त्यांना सावध करणारे कित्येक लेख वर्तमानपत्रातून छापून आले. गेल्या काही वर्षांत त्याचा फार परिणाम दिसला नव्हता. गेल्यावर्षीपासून मात्र इंग्रजी शाळांकडे वळलेली पावले पुन्हा मराठीचा रस्ता तुडवू लागली आहेत. त्यातही जिल्हा परिषदेची शाळाच साऱ्यांना खुणावतेय, हे विशेष. 

जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षणाधिकारी सुनंदा वाखारे यांनी जिल्ह्यातील सर्व शाळांतून माहिती मागवली. त्यात इंग्रजी शाळांतून मराठी शाळेत दाखल झालेल्या विद्यार्थ्यांचा आकडा जिल्हा परिषद शाळांचा उत्साह वाढवणारा आहे. त्यामागच्या कारणांचा शोध घेताना शाळांतील सुधारणांबद्दल पालकांत विश्‍वास वाढल्याचे चित्र समोर आले आहे. त्यात डिजिटल शाळा, शिष्यवृत्ती परीक्षेतील यश, वाढते उपक्रम याबद्दल पालकांनी समाधान व्यक्त केले आहे. 

पहिले पाऊल मराठीत
जिल्ह्यात यावर्षी २२ हजारहून अधिक मुले पहिलीच्या वर्गात  प्रवेशासाठी पात्र आहेत. त्यात शहरी आणि ग्रामीण भागांचा समावेश आहे. पैकी आतापर्यंत सुमारे साडेपंधरा हजारांहून अधिक मुलांना मराठी शाळांत प्रवेश घेतला आहे. हा आकडा ७० टक्‍क्‍यांहून अधिक आहे. ३० सप्टेंबरपर्यंत ही प्रक्रिया चालणार आहे, त्यामुळे आकडा आणखी वाढेल, असा विश्‍वास व्यक्त करण्यात आला आहे.   

तालुकावार कुठे, किती?
शिराळा ः ५१, वाळवा ः १९०, मिरज ः ७२, पलूस ः ६२, तासगाव ः १९३, कडेगाव ः ४९, खानापूर ः ९७, आटपाडी ः १२३, कवठेमहांकाळ ः ६२, जत ः २७० 

जिल्हा परिषद शाळांत मुलांना प्रवेश देताना पालकांनी खूप सकारात्मक विचार केला आहे. त्यांच्या विश्‍वासाला भक्कम करणारी शिक्षण प्रक्रिया राबवण्याचे काम शिक्षक नक्की करतील. त्याबाबत सतत शिक्षकांशी मी बोलत राहीन. त्यांचे प्रश्‍नही लवकरच मार्गी लागतील.’’
- सुनंदा वाखारे, 

प्राथमिक शिक्षणाधिकारी


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 1169 student bye bye to English Medium in Sangli