सांगली जिल्ह्यात १२ लाख लिटर संकलन ठप्प

सांगली जिल्ह्यात १२ लाख लिटर संकलन ठप्प

सांगली  - दूध दराच्या प्रश्‍नाचा तिढा सोडवण्यात राज्य सरकारला अपयश आल्याने स्वाभिमानी शेतकरी संघटनेने पुकारलेल्या दूध बंद आंदोलनाला आज पहिल्या दिवशी जोरदार प्रतिसाद मिळाला. जिल्ह्यात १२ लाख लिटर दुधाचे संकलन ठप्प राहिले. सहकारी, खासगी दूध संघांनी आंदोलनाला पाठिंबा देत पूर्ण संकलन बंद ठेवले. वाहतूक थांबवली. त्यामुळे कुठेही अनुचित प्रकार घडला नाही. शेतकऱ्यांनी शाळांतील विद्यार्थ्यांसह जागोजागी दुधाचे मोफत वाटप करून सहभाग घेतला. 

दरम्यान, राज्यभरात मध्यरात्रीपासूनच सुरू झालेल्या दूध दरवाढीच्या आंदोलनाने आक्रमक पवित्रा घेतला आहे. राज्याच्या विविध भागांतून दूध वाहतूक करणारे १०० हून अधिक टॅंकर व सुमारे चार लाख लिटर दुधाची नाकेबंदी केल्याचा दावा खासदार राजू शेट्टी यांच्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने करण्यात आला. 

‘स्वाभिमानी’ने पुकारलेल्या आंदोलनाला किसान सभेनेही पाठिंबा दिला. दोन्ही संघटनांचे कार्यकर्ते घडामोडींवर लक्ष ठेवून होते. पोलिसांनी कार्यकर्त्यांवर पाळत ठेवली. दूध संघांनाही संकलन बंद ठेवल्याने अनुचित प्रकार घडणार नाही, याची पोलिसांना माहिती होती. त्यामुळे काही दूध केंद्रांबाहेर जुजबी बंदोबस्त ठेवला होता. मउद्यापासून आंदोलनाची दिशा कशी राहील, याकडे मात्र सर्वांचे लक्ष आहे. 

दरम्यान, आज (ता. १७) सलग दुसऱ्या दिवशी पश्‍चिम महाराष्ट्रातील दूध संकलन बंद ठेवले जाणार आहे. आंदोलनाचा भडका उडून नुकसान होऊ नये, यासाठी संघांनी एकमताने ही भूमिका घेतली आहे. शेतकऱ्यांनी या आंदोलनात उत्स्फूर्त प्रतिसाद दिला असल्याने दूध संकलन सुरू केले तरी दूध डेअरीकडे जाणार नाही, असा विश्‍वास खासदार राजू शेट्टी यांनी व्यक्त केला आहे. 

वाळवा तालुक्‍यात शंभर टक्के प्रतिसाद
इस्लामपूर - दूधबंद आंदोलनाला वाळवा तालुक्‍यात जोरदार प्रतिसाद मिळाला. गावोगावी दूध संकलन बंद ठेवण्यात आले. 

वाळवा - दुधाची खरेदी-विक्री पूर्णपणे बंद राहिली. हुतात्मा, राजारामबापू दूध संघाला परिसरातून दहा हजार लिटर दुधाचा रोज पुरवठा होतो. तो ठप्प होता. सर्व खासगी, सहकारी संस्थांनी दूध संकलन व विक्री बंद ठेवली. त्याची आगाऊ सूचना कालच दिली होती. संघटनेच्या कार्यकर्त्यांची वर्दळ नव्हती, मात्र शेतकऱ्यांनी स्वत-हून चांगला प्रतिसाद दिला. 

नेर्ले - नेर्लेसह कासेगाव, वाटेगाव परिसरात दूध संकलन ठप्प राहिले. काहींनी गावांतील शाळांत व गल्लोगल्ली दूध वाटप केले. नागरिकांनी मुबलक दुधाचा आस्वाद घेतला. कासेगाव आझाद विद्यालय, पुतळामाता कन्या शाळा व सर्वोदय वसतीगृहातील विद्यार्थ्यांचा दुधाचे वाटप झाले. 

बागणी - परिसरातील सर्व दूध संकलन केंद्रानी आंदोलनला पाठिंबा दिला. आंदोलन मिटेपर्यंत दूध पुरवठा करु नये, असे आवाहन करण्यात आले. 

बावची - दूध संकलन केंद्रांनी संकलन बंद ठेवले. दररोज सहा हजार लिटर दुधाचे उत्पादन होते. 
नवेखेड - दूध संकलन केंद्रांवर शुकशुकाट होता. संकलन होणार नाही, असे फलक केंद्रासमोर लागले होते. 

ऐतवडे खुर्द - चिकुर्डे, कुंडलवाडी, तांदूळवाडी, कुरळप यांसह परिसरातील गावात आज दूध संकलन बंद होते. राष्ट्रीय महामार्गावरील कणेगाव फाटा येथे पोलिसांचा बंदोबस्त होता. 

कोकरुड - शिराळा पश्‍चिम भागातील शेतकरी दूध संकलन केंद्राकडे फिरकले नाहीत. पश्‍चिम भागात तीनशे दूध संस्थाच्या माध्यमातून जवळपास ७० हजार लिटर दररोज दूध संकलन ठप्प होते. 

दूध बंद ठळक
* मिरज तालुक्‍यात द्राक्ष बागेला दुधाचा डोस
* जिल्हाभर शाळांमध्ये गरमागरम दूधवाटप
* गावोगावी भट्टी पेटवून खवा, बासुंदी केली
* दूध संघांच्या दिवसभर वाटाघाटी सुरू

‘‘दूध दराचा निर्णय होईपर्यंत लोकांनी विक्री करू नये. दूध लोकांना वाटावे, विविध पदार्थ करावेत. शाळकरी मुलांना द्यावे, असे आवाहन खासदार राजू शेट्टी यांनी केले आहे. ते आम्ही सर्वदूर पोचवले आहे.’’
- महेश खराडे, जिल्हाध्यक्ष, स्वाभिमानी संघटना

प्रत्येक शेतकऱ्याकडे आधार कार्ड आहे. त्यामुळे एक शेतकरी दुसऱ्या संस्थेतून सारखाच फायदा मिळवू शकत नाही. या सरकारनेच सगळ्या योजना डिजिटल करायचे ठरवले होते. पारदर्शकतेसाठीच सरकारने शेतकऱ्यांच्या बॅंक खात्यात थेट अनुदान जमा करावे, त्यासाठी डिजिटायझेशनचा उपयोग करून घ्यावा.
- राजू शेट्टी, स्वाभिमानी शेतकरी संघटना 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com