सांगली जिल्ह्यात 12 टक्केच पाणी साठा 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 3 मे 2017

खासगी टॅंकरकडूनही पिण्यासाठी पाणीपुरवठा सुरू. 
घरटी एक माणूसपाण्यासाठी राबतोय. 
टॅंकर न मिळालेल्या लोकांची पाण्यासाठी धावाधाव. 
द्राक्ष, केळी, डाळिंब बागांसाठी टॅंकरने पाणीपुरवठा. 
जिल्ह्यातील विहिरी, कूपनलिकांची पाणीपातळी दीडमीटरने घटली. 
टॅंकरच्या खेपा मंजूर तरही प्रत्यक्षात काही गावांना पाणी मिळेना. 
जिल्ह्यात रोहयोच्या 204 कामांवर 2 हजार 213 मजुरांची उपस्थिती. 

सांगली - जिल्ह्यातील मध्यम व लघू प्रकल्पातील पाणीसाठी केवळ 12 टक्केच शिल्लक आहे. परिणामी पिण्याची पाणीटंचाई गंभीर वळणावर पोहोचणार आहे. सध्या 140 गावे आणि 1003 वाड्या-वस्त्यांवरील 3.15 लाख लोकसंख्येला पाणीपुरवठा सुरू आहे. मे अखेरीस 200 टॅंकर टप्पा ओलांडण्याची शक्‍यता आहे. एप्रिलमध्येच सार्वजनिक विहिरी, कूपनलिकांनी पाण्याचा तळ गाठला आहे. दीड मीटरने पाणीपातळी घटली आहे. बागायती द्राक्ष, केळी, डाळिंब शेतकऱ्यांना टॅंकरने पाणी द्यावे लागते आहे. 

जिल्ह्यातील पाणी टंचाईची गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. तापमान चाळीस अंशांवर गेले असताना दुष्काळी तालुक्‍यात पुन्हा टॅंकरची मागणी दिवसेंदिवस वाढतेच आहे. जिल्ह्यातील पाच पैकी चार मध्यम प्रकल्प कोरडे पडलेत. लघू प्रकल्पांतही 12 टक्‍के पाणीसाठा आहे. गतवर्षी सुरवातीस पावसाने चांगला जोर धरला; मात्र परतीचा पाऊस झाला नाही. परिणामी पाणी टंचाई जाणवतेय. जत, खानापूर तालुक्‍यात सरासरीपेक्षा 12 ते 15 टक्के कमी पाऊस झाला. तासगाव, आटपाडीत सरासरी गाठली; पण परतीचा पाऊस झाला नाही. त्यामुळे या दुष्काळी तालुक्‍यांमधील लघू आणि मध्यम प्रकल्पांमधील पाणी संपण्याच्या मार्गावर आहे. पाण्यासाठी लोकांची भटकंती सुरू झाली आहे. 

चार मध्यम प्रकल्प कोरडे 
जिल्ह्यात एकूण पाच मध्यम प्रकल्प आहेत. शिराळ्यातील मोरणा प्रकल्प वगळता उर्वरित चारही प्रकल्प कोरडे पडलेत. जत तालुक्‍यातील तीन व तासगावमधील एक अशा चार प्रकल्पांचा समावेश आहे. या प्रकल्पांत एकूण 49.83 द.ल.घ.मी. पाणीसाठ्यापैकी केवळ मोरणा प्रकल्पात 4.12 द.ल.घ.मी. पाणीसाठा आहे. उर्वरित बसप्पावाडी, दोड्डनाला, संख आणि सिद्धेवाडी चार प्रकल्प कोरडे आहेत. 

लघू प्रकल्पांमध्ये 14 टक्केच पाणीसाठा 

जिल्ह्यात 79 लघू प्रकल्पांतील पाणीसाठ्याची क्षमता 172.56 द.ल.घ.मी. आहे. त्यातील 41 प्रकल्प कोरडे पडलेत, तर 22 प्रकल्पांमध्ये 25 टक्‍क्‍यांपेक्षाही कमी पाणीसाठा आहे. केवळ तीन प्रकल्पांमध्ये 75 टक्‍क्‍यांपेक्षा जास्त पाणी आहे. खानापूर, कडेगाव आणि तासगाव तालुक्‍यांतील तलाव आहेत. 

मेमध्ये जास्त धोका 
एप्रिलअखेर जिल्ह्यातील सर्व 84 तलावांमध्ये केवळ 12 टक्केच पाणीसाठा आहे. एकूण पाणीसाठा क्षमता 222.39 द.ल.घ.मी. इतकी असली तरी सध्या 28.23 द.ल.घ.मी. पाणीसाठा आहे. यातील 4.12 द.ल.घ.मी. साठा मोरणा प्रकल्पाचा आहे. मे महिन्यामध्ये पाणी टंचाईची तीव्रता वाढणार आहे. 

टॅंकरची संख्या वाढली 
जिल्ह्यात 30 एप्रिल अखेर 139 टॅंकर सुरू होते. 140 गावे आणि 1003 वाड्यावस्त्यांवर पाणी दिले जात आहे. 3 लाख 25 हजार 610 लोकांना टॅंकरने पाणीपुरवठा सुरू आहे. मे अखेरीस जिल्ह्यातील 200 हून अधिक टॅंकर लागतील, असा अंदाज आहे. 
 

धरण, पाणीसाठी 
कोयना- 26.97 टीएमसी 
वारणा- 13.10 टीएमसी 

Web Title: 12 percent water storage in the sangli district