सांगलीतील शिवाजी स्टेडियमवर तब्बल 12 टन गवत; स्वच्छता मोहीम, विविध संघटनांचे खेळाडू सहभागी

बलराज पवार
Wednesday, 11 November 2020

लॉकडाऊन काळात बंद ठेवल्याने अस्वच्छतेचे आगार बनलेल्या सांगली शहरातील छत्रपती शिवाजी स्टेडियमवर आज महापालिका आणि खेळाडूंनी स्वच्छता मोहीम घेतली. यामध्ये क्रीडांगणावरील 12 टन गाजर गवत गोळा केले. स्टेडियमचा परिसर स्वच्छ केला. 

सांगली : लॉकडाऊन काळात बंद ठेवल्याने अस्वच्छतेचे आगार बनलेल्या शहरातील छत्रपती शिवाजी स्टेडियमवर आज महापालिका आणि खेळाडूंनी स्वच्छता मोहीम घेतली. यामध्ये क्रीडांगणावरील 12 टन गाजर गवत गोळा केले. स्टेडियमचा परिसर स्वच्छ केला. 

लॉकडाऊन काळात क्रीडांगण बंद असल्यामुळे स्टेडियमच्या मैदानात गाजर गवत आणि कचरा निर्माण झाला होता. यामुळे खेळाडूंना सराव करताना अनेक अडचणींना तोंड द्यावे लागत होते. या स्टेडियमची स्वच्छता करण्याची मागणी खेळाडूंकडून केली जात होते. महापालिका आयुक्त नितीन कापडणीस यांनी छत्रपती शिवाजी स्टेडियमवर स्वच्छता मोहीम घेण्याची सूचना प्रशासनाला केली. त्यानुसार आज स्वच्छ सर्व्हेक्षण 2021 अंतर्गत उपायुक्त राहुल रोकडे आणि आरोग्य विभागाने स्वच्छता मोहीम घेतली. यामध्ये विविध संघटनांचे खेळाडू सहभागी झाले होते. 

संपूर्ण स्टेडियमच्या स्वच्छतेसाठी तीन तास लागले. या मोहिमेत क्रीडा प्रशिक्षक युवराज खटके, प्रा. एस. एल. पाटील, बापू समलेवाले, क्रिकेट प्रशिक्षक विष्णू शिंदे, प्रकाश फाळके, शिरीष रहाटे, अक्षय पाटील, चेतन पडियार, महापालिकेचे क्रीडाधिकारी महेश पाटील, तायक्वांदोचे प्रशिक्षक चौगुले, खोखोचे प्रशांत पवार, वरिष्ठ स्वछता निरीक्षक अविनाश पाटणकर, स्वच्छता निरीक्षक याकूब मद्रासी, बंडा जोशी, पंकज गोंधळे, सामाजिक कार्यकर्ते अमर निंबाळकर यांनी सहभाग घेतला. 

क्रीडांगण अस्वच्छ करणाऱ्यांवर फौजदारी 
स्वच्छता मोहीमेवेळी अनेक आक्षेपार्ह गोष्टी प्रशासनाच्या समोर आल्या. याबाबत सातत्याने तक्रार केली जात होती. मात्र प्रशासन दुर्लक्ष करत होते. आज प्रशासनासमोरच या बाबी आल्या. यापुढे छत्रपती शिवाजी स्टेडियममध्ये आक्षेपार्ह गोष्टी आढळल्यास थेट फौजदारी गुन्हा दाखल करण्याचा इशारा आयुक्त नितीन कापडणीस यांनी दिला आहे. या ठिकाणी सुरक्षेच्या कारणास्तव सीसीटीव्ही यंत्रणा आणि वॉचमन ठेवण्याबाबत सूचना देण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले. 

संपादन : युवराज यादव 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 12 tons of grass at Shivaji Stadium in Sangli; Cleaning campaign, players from various organizations participate