
गतवर्षी कोरोनामुळे लॉकडाउन परिस्थितीत 60 हजार टन बेदाणा जादा तयार झाला. कोरोनामुळे देशासह जगात विक्रीवर मागणीअभावी विक्रीला मर्यादा आल्या. फळछाटणीसाठी शेतकऱ्यांपुढे आर्थिक संकट उभे ठाकले आहे.
राज्यात 1.20 लाख टन बेदाणा शिल्लक; 1200 कोटी अडकले
सांगली ः राज्यभरात द्राक्षाच्या ऑक्टोबर फळछाटणीची तयारी सुरू झाली आहे. गतवर्षी कोरोनामुळे लॉकडाउन परिस्थितीत 60 हजार टन बेदाणा जादा तयार झाला. कोरोनामुळे देशासह जगात विक्रीवर मागणीअभावी विक्रीला मर्यादा आल्या. फळछाटणीसाठी शेतकऱ्यांपुढे आर्थिक संकट उभे ठाकले आहे.
यंदा राज्यात 2.20 लाख टन बेदाणानिर्मिती झाली. त्यातील 1.20 लाख टन बेदाणा शीतगृहात शिल्लक आहे. सरासरी शंभर रुपये किलो दर धरला तरी सुमारे 1200 कोटी रुपये बेदाण्यात अडकले आहेत. आगामी दसरा, दिवाळी सणाच्या काळात सुमारे 50 हजार टन बेदाण्याची विक्री अपेक्षित आहे. दोन महिन्यांनंतरही आर्थिक चक्रातून शेतकरी सावरण्याची आशा आहे.
राज्यात द्राक्षाचे सर्वाधिक क्षेत्र नाशिक, सांगली, जालना, सोलापूर, सातारा, इंदापूरसह काही प्रमाणात उस्मानाबाद, बीड, कर्नाटकच्या सीमा भागात विस्तारले आहे.
यावर्षी कोरोनामुळे लॉकडाउनमुळे राज्यभरात 60 हजार टन बेदाणा जादा तयार झाला. विक्रीसाठीच्या द्राक्षापासून बेदाण्याची प्रत खालावली. कोरोनामुळे देशातच नव्हे, तर जागतिक पातळीवर मागणी घटली. दरवर्षीचे ग्राहक मिळणेही मुश्कील झाले आहे. त्यात यंदा जादा बेदाणा तयार झाल्याने दरातही घसरण झाली आणि मालही जादा शिल्लक राहिला. राज्यभरातील शीतगृहात 1.20 लाख टन बेदाणा शिल्लक आहे.
सांगलीसह नाशिक जिल्ह्यात फळ छाटण्याची तयारी अंतिम टप्प्यात सुरू आहे. आगामी काळात देशांतर्गत आणि निर्यातीसाठी बाजारपेठेचा अंदाज येत नसल्याने यंदा उशिरा हंगाम घेण्याकडे कल आहे. मात्र, नाशिक जिल्ह्यात द्राक्षाचे क्षेत्र मोठे असल्याने 15 ऑगस्टपासूनच छाटण्या सुरू झाल्या आहेत. सांगली जिल्ह्यात आगाप छाटण्या तुरळक झाल्या. सप्टेंबरच्या शेवटी 10 टक्के, तर उर्वरित 85 टक्के छाटण्या ऑक्टोबरलाच होतील. त्याची तयारी सुरू आहे. मात्र, काही शेतकऱ्यांची बेदाणा विक्री झालेली नाही. गेल्यावर्षी निर्यात केलेल्या काही मोजक्या शेतकऱ्यांनाही अद्याप संपूर्ण रक्कम मिळालेली नाही.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बाजारपेठ, दर, मागणी, निर्यात, दलालांकडून होणारी खरेदी, याबाबत अस्थिरता असल्यामुळे कृषी सेवा केंद्राकडून उधारीला फाटा दिला जातो आहे. परिणामी हंगामाच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांसमोर संकट उभे ठाकले आहे. बेदाण्याचा उठावही तातडीने अशक्य आहे. कर्जमाफी, जादा कर्जामुळे अनेकांना नव्याने पीक कर्जेही दुरापास्त झालीत.
दृष्टिक्षेप...
- बेदाणा उत्पादन ः 2 लाख 10 हजार टन
- कोरोना लॉकडाउनमुळे 60 हजार टन वाढ
- विक्री ः 90 हजार टन
- शिल्लक बेदाणा ः 1 लाख 20 हजार टन
- सरासरी दर ः 80 ते 180 रुपये प्रति किलो
- दसरा, दिवाळीत 50 हजार टन विक्री शक्य
40-45 टक्के बेदाणा अद्यापही शिल्लक
प्रत्येक वर्षी सरासरी 18 हजार गाड्या (प्रत्येक गाडी दहा टन) बेदाणा तयार होतो. यंदा द्राक्ष विक्री न झाल्याने 20-22 टक्के भर पडली. कोरोनामुळे बाजारात दर आणि मागणीअभावी विक्री नसल्याचा फटका शेतकरी, व्यापाऱ्यांनाही बसतोय. सरासरी 40-45 टक्के बेदाणा अद्यापही शिल्लक आहे. देशातच नव्हे, तर जागतिक आपत्तीपुढे आम्ही हतबल आहोत.
- मनोज मालू, अध्यक्ष बेदाणा अशोसिएशन
मदतीचीही शक्यता दुरापास्त
यापूर्वी कोरोना आपत्तीसारखी परस्थिती मी अनुभवली नव्हती. यंदा झालेल्या नुकसानीचा हिशोबच करता येत नाही. शिवाय दर कमी असल्याचा सर्वांनाच फटका बसतो आहे. बेदाणा विकायचा आहे; पण विकत नाही आणि ठेवायचा म्हटलं तर चक्र चालत नाही. यामध्ये शासनाच्या मदतीचीही शक्यता दुरापास्त आहे. यातूनच मार्गक्रमण करावे लागणार आहे.
- अरविंद ठक्कर, सचिव, शीतगृह संघटना
डिलर्सही शेतकऱ्यांना रोखीने खरेदीसाठी आग्रही
कोरोनाचा कृषी सेवा पुरवठ्यावर परिणाम झालेला आहे. मागणीप्रमाणे माल येत नाही. येत्या काही दिवसांत तो सुरळीत होईल. गतवर्षी अनेक शेतकऱ्यांच्या उधाऱ्या न आल्याने दुकानदार संकटात आहेत. त्यांच्यासह सर्वच वितरकांना रोखीने खरेदीचा प्रस्ताव कंपन्यांकडून येत आहे. परिणामी डिलर्सही शेतकऱ्यांना रोखीने खरेदीसाठी आग्रही आहेत.
- अविनाश पाटील, अध्यक्ष, सांगली ऍग्रीकल्चर डिलर इनपुटस् असोसिएशन
हवामानाकडे लक्ष
यंदा बेदाणा उत्पादक संकट होते. हळूहळू ते कमी होत आहे. बेदाण्याला मागणी, दरातही सुधारणा अपेक्षित आहे. फळछाटणीसाठी शेतकरी हवामानाकडे लक्ष ठेवून आहेत.
- सुभाष आर्वे, माजी अध्यक्ष, राज्य द्राक्ष संघ
संपादन : युवराज यादव
Web Title: 120 Lakh Tonnes Raisin Balance State 1200 Crore Stuck
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..