
चांदोलीत २४ तासांत १२० मिलिमीटर पाऊस
वारणावती - गेल्या सहा ते सात दिवसांपासून चांदोली धरणक्षेत्रात सुरू असलेल्या संततधार पावसामुळे धरणाच्या पाणीपातळीत वाढ झाली असून चांदोली धरण आज ४९.६४ टक्के भरले. ३४.४० टीएमसी पाणी साठवण क्षमता असलेल्या या धरणात १७.०८ टीएमसी पाणीसाठा झाला असून धरणाची पाणीपातळी ६०६.२५ मीटर झाली आहे.
संततधार पावसामुळे धरणाच्या पाणी पातळीत वाढ झाली असून धरणातून सध्या ७३२ क्यूसेक पाण्याचा विसर्ग वारणा नदीपात्रात सुरू आहे. धरण पाणलोट क्षेत्रात सुरू असलेल्या जोरदार पावसामुळे धरणात सध्या १५ हजार ३१२ क्यूसेकने पाण्याची आवक सुरू आहे. त्यामुळे धरणाची पाणीपातळी गेल्या चोवीस तासांत दीड मीटरने वाढली आहे.
गेल्या चोवीस तासांत तब्बल १२० मिलिमीटर पावसाची नोंद झाली असून आजअखेर ६७४ मिलिमीटर पावसाची नोंद येथील पर्जन्यमापन केंद्रावर झाली आहे. धरणाची पाणीपातळी ६०६.२५ मीटर झाली असून धरणातील पाणीसाठा ४८३.५७ द.ल.घ.मी. म्हणजे १७.०८ टीएमसी झाला आहे.
चांदोली धरण व चांदोली अभयारण्य पर्यटकांसाठी बंद करण्यात आले असले तरी कड्या-कपारीतून धो-धो कोसळणारे धबधबे व पावसामुळे हिरवाईने नटलेल्या परिसरातील डोंगररांगा पाहण्यासाठी या परिसरात सध्या पर्यटकांचा ओघ वाढू लागला आहे.
Web Title: 120 Mm Of Rain In 24 Hours In Chandoli
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..