Belgaum News : बेळगाव शैक्षणिक जिल्ह्यात ४२ केंद्रांवर बारावी परीक्षा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

HSC-Exam

Belgaum News : बेळगाव शैक्षणिक जिल्ह्यात ४२ केंद्रांवर बारावी परीक्षा

बेळगाव : बारावीची परीक्षा जवळ आल्यामुळे शिक्षण खात्याने परीक्षेची तयारी सुरू केली असून, बेळगाव शैक्षणिक जिल्ह्यातील ४२ परीक्षा केंद्रांवर परीक्षा पार पडणार आहे. या सर्व केंद्रांवर सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याची सूचना केली असून बेळगाव शैक्षणिक जिल्ह्यातील २५३९० विद्यार्थी परीक्षा देणार आहेत. यामध्ये इंग्रजी विषयाची परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या अधिक आहे.

९ ते २९ मार्च पर्यंत बारावीची परीक्षा होणार आहे. विद्यार्थ्यांची काही दिवसांपूर्वी परीक्षा प्रवेश पत्र ऑनलाइन उपलब्ध करून दिले होते. दोन दिवसात विद्यार्थ्यांना परीक्षेची प्रवेश पत्रे संकेतस्थळावर उपलब्ध होणार आहेत. त्यानंतर विद्यार्थ्यांना प्रवेश पत्र डाउनलोड करून घ्यावे लागणार आहे. बेळगाव शैक्षणिक जिल्ह्यात बेळगाव शहरात बारावीच्या विद्यार्थ्यांची संख्या अधिक असून वाणिज्य व विज्ञान शाखेचे विद्यार्थी शैक्षणिक जिल्ह्यात अधिक प्रमाणात आहेत.

सर्व केंद्रांवर सीसीटीव्ही बसवण्याचे काम हाती घेतले असून विद्यार्थी व विद्यार्थिनींसाठी स्वतंत्र शौचालय, स्वच्छ पिण्याचे पाणी, यासह वर्ग खोल्यांत आवश्यक असलेली डागडुजी करण्याची सूचना पदवी पूर्व शिक्षण खात्याने केली आहे. कोरोना काळात सीसीटीव्ही कॅमेरे बंधनकारक केले नव्हते. मात्र यावेळी सर्व केंद्रांवर सीसीटीव्हीची नजर असणार आहे. ४२ परीक्षा केंद्रांवरील मुख्य परिवेक्षकांची नेमणूक करण्याचे काम पूर्ण झाले आहे.

बेळगाव शैक्षणिक जिल्ह्यात बारावीची परीक्षा देणारे विद्यार्थी

फ्रेश विद्यार्थी - २१४६५

रिपीटर्स विद्यार्थी - २८२०

बहिस्थ विद्यार्थी - ११०५

एकूण - २५३९०

बारावी परीक्षेची तयारी सुरू केली असून एकूण ४२ परीक्षा केंद्रांवरील मुख्य पर्यवेक्षकांची नेमणूक केली आहे. दोन दिवसात विद्यार्थ्यांना परीक्षेचे प्रवेश पत्र उपलब्ध होणार आहे. परीक्षा काळात सर्व केंद्रांवर सीसीटीव्ही कॅमेरे बंधनकारक असणार आहेत.

- एम एम कांबळे, जिल्हा पदवी पूर्व शिक्षणाधिकारी.