रिओपाठोपाठ सूर्याने शोधले कोरेगावात 13 बॉम्ब

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 10 नोव्हेंबर 2019

सातारा पोलिस दलाने सर्व गावठी बॉम्ब शोधून काढल्यानंतर ग्रामस्थांनी सुटकेचा नि:श्वास सोडला. सध्या घटनास्थळाचा पंचनामा सुरु आहे.

कवडेवाडी (जि. सातारा) ः कवडेवाडी (ता. कोरेगाव) येथे तब्बल 13 जिवंत सद्रुष्य स्फोटके (बॉम्ब) सापडले आहेत. या घटनेने कोरेगाव तालुक्‍यात खळबळ उडाली आहे. सातारा पोलिस दलातील बॉम्ब शोधक पथक व नाशक पथकाने हे सर्व बॉम्ब निकामी केले आहेत. हे सर्व गावठी बॉम्ब असून शिकारीसाठी त्यांचा वापर होत असल्याची शक्‍यता वर्तवली जात आहे.

आज (रविवार) सकाळी कवडेवाडी येथे बॉम्ब असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. या घटनेने पोलिस हडबडून जागे झाले. त्यांनी तत्काळ बॉम्ब शोधक पथकास पाचारण केले. काही वेळानंतर बॉम्ब शोधक पथक डॉग स्कॉडसह घटनास्थळी दाखल झाले. वाठार पोलिस ठाण्याच्या हद्दीत महादेव डोंगरानजीक पोलिसांनी शोध मोहिम सुरु केली. सकाळी सुरु झालेली ही मोहिम दुपारी तीनपर्यंत सुरु होते.

कवडेवाडी गावानजीक बॉम्ब असल्याचे वृत्त पसरल्यानंतर परिसरातील ग्रामस्थांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले. उत्सुकतेपोटी तालुक्‍यातील शेकडो ग्रामस्थ डोंगरावर जमा होऊ लागले. त्यांना पोलिसांना वारंवर हटवावे लागत होते. सुमारे चार तासाहून अधिक काळ बॉम्ब शोधण्याची मोहिम राबवल्यानंतर 13 जिवंत गावठी बॉम्ब सद्रुष्य स्फोटके हस्तगत केली. विशेष म्हणजे यातील चार जिवंत गावठी बॉम्ब सूर्या श्‍वानाने जमिनीवरुन शोधून काढले. प्राथमिक स्तरावर हे बॉम्ब रानडूक्कर मारण्यासाठी वापरले जात असावेत अशी माहिती पोलिसांनी दिली.

याप्रकरणी पोलिसांनी मनिबबे सुरपचंद राजपूत (वय 45) सध्या राहणार कवडेवाडी , हिवरे (ता. कोरेगाव) मूळ गाव हरदवा, तहसिल रेठी, जिल्हा. कठणी, उत्तरप्रदेश यास ताब्यात घेतले आहे.

रिओमुळे मिळाले जवाने पिस्टल

ही मोहिम पोलिस अधीक्षक तेजस्वी सातपुते, अतिरिक्त पोलिस अधीक्षक धीरज पाटील यांच्या सूचनेनूसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक विजय कुंभार मार्गदर्शनाखाली सहायक फौजदार विलास नागे, पोलिस हवालदार विनोद गायकवाड, मोहन नाचण, योगेश पोळ, संतोष जाधव, प्रवीण कडव, गणेश कापरे, केतन शिंदे, धिरज महाडीक, वैभव शिंदे, अमोल गवळी बॉम्ब शोधक व नाशक पथकातील किरण मोरे, रुपेश साळूंखे, निलेश दयाळ तसेच श्‍वान सूर्या यांनी उत्कृष्ट कामगिरी करीत मोहिम फत्ते केले. सातारा पोलिस दलाने सर्व गावठी बॉम्ब शोधून काढल्यानंतर ग्रामस्थांनी सुटकेचा नि:श्वास सोडला. सध्या घटनास्थळाचा पंचनामा सुरु आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 13 bombs in Koregaon searched by Surya after Rio