मोकाट जनावरांमुळे रोजच होत आहेत अपघात! 

परशुराम कोकणे
बुधवार, 25 जुलै 2018

सोलापूर : मुख्य रस्त्यांसह गल्लीबोळात मोकाट कुत्रे, गायी आणि गाढवांनी वाहनधारकांना हैराण करून सोडले आहे. महापालिका प्रशासनाचे दुर्लक्ष झाल्याने शहरातील मोकाट जनावरांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून रस्त्यावरील मोकाट जनावरांमुळे शहर परिसरात रोज सरासरी पाच अपघात होत आहेत. 

सोलापूर : मुख्य रस्त्यांसह गल्लीबोळात मोकाट कुत्रे, गायी आणि गाढवांनी वाहनधारकांना हैराण करून सोडले आहे. महापालिका प्रशासनाचे दुर्लक्ष झाल्याने शहरातील मोकाट जनावरांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून रस्त्यावरील मोकाट जनावरांमुळे शहर परिसरात रोज सरासरी पाच अपघात होत आहेत. 

अनेकदा मोकाट कुत्रे वाहनाच्या मागे लागतात, त्यामुळे काहीजण वाहन वेगाने पुढे नेण्याचा प्रयत्न करतात. या गडबडीत अनेकांचे अपघात झाल्याचे आपण पाहिले आहे. असाच एक प्रकार रविवारी दत्त चौक परिसरात घडला. कुत्रे मागे लागल्याने रितेश सुनील नाईकवाडे (वय 20, रा. पत्रा तालीमजवळ, सोलापूर) या तरुणाने दुचाकी वेगाने चालविली. या गडबडीत तो रस्त्यावरील कारला धडकला. जखमी अवस्थेत त्याला अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांनी शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. शुक्रवारी रात्री महापौर बंगला परिसरात दुचाकीखाली कुत्रा आल्याने दुचाकीस्वार तरुण दहा फूट फरफटत गेला. महापालिका प्रशासनाने शहरातील मोकाट कुत्र्यांसह गायी आणि गाढवांवर नियंत्रण आणण्याची मागणी होत आहे. शहर परिसरात रोज किमान चार ते पाच अपघात मोकाट जनावरांमुळे होत आहेत. अशा अपघातांमुळे अनेकांना कायमचे अपंगत्वही आले आहे. 

स्मार्ट सिटीच्या दिशेने जाताना महापालिका आयुक्त अविनाश ढाकणे यांनी या प्रश्‍नाकडे गांभीर्याने लक्ष देण्याची गरज आहे. या प्रश्‍नावर पाठपुरावा करण्यासाठी सोलापुरातील कोणत्याही सामाजिक संस्थेकडे वेळ नसल्याचे दिसून येत आहे. 

दोन दिवसांपूर्वी महापौर बंगला परिसरात रस्त्यावर चार-पाच कुत्रे बसले होते. भरधाव जाणाऱ्या दुचाकीच्या आडवे कुत्रे आले आणि तरुण दहा फूट फरफट गेला. या घटनेत तो गंभीर जखमी झाला. घटनेच्या ठिकाणी कुत्र्याचा मृत्यू झाला. मोकाट जनावरांमुळे अपघातांचे प्रमाण वाढले आहे, महापालिका प्रशासनाने याकडे लक्ष देण्याची गरज आहे. वाहनधारकांनी वाहनाचा वेग कमी ठेवल्यास अपघात टाळता येतील. 
- स्वाती भोसले, वाहनचालक 

रात्रीच्या वेळी मोकाट कुत्रे वाहनाच्या मागे लागतात. वाहनचालक घाबरून दुचाकी वेगाने नेतात. अशा प्रकारातून रोज अपघात होत आहेत. याकडे कोणाचेही लक्ष नाही. अपघातानंतर उपचारासाठी सामान्य कुटुंबातील व्यक्तीला खर्च करणे परवडत नाही. 
- अमित केसकर, वाहनचालक