मागास वस्त्यांत १४ अभ्यासिका

उमेश बांबरे
सोमवार, 22 जुलै 2019

वसतिगृहांचा वीज खर्च वाचणार
समाजकल्याण विभागाने जिल्ह्यातील त्यांच्या १६ वसतिगृहात सोलार सिस्टिम बसविली जाणार आहे. त्यामुळे येथील विजेसह गरम पाण्यावर होणाऱ्या खर्चावर नियंत्रण येणार आहे. आतापर्यंत निम्म्या वसतिगृहांना सोलार सिस्टिम बसवून झाली आहे.

सातारा - नावीन्यपूर्ण योजनेतून बौद्धवस्ती व मागासवर्गीय वस्त्यांमध्ये अभ्यासिका बांधल्या जाणार आहेत. या अभ्यासिकांच्या माध्यमातून या समाजातील युवकांना स्पर्धा परीक्षेसह इतर परीक्षांचा अभ्यास करण्यासाठी हक्‍काची जागा गावात उपलब्ध होणार आहे. २०१८-१९ मध्ये समाजकल्याण विभागाच्या माध्यमातून दोन कोटी २३ लाख ८९ हजार रुपयांचा निधी उपलब्ध करण्यात आला आहे. त्यातून १४ ठिकाणी अभ्यासिका व वाचनालये बांधली जाणार आहेत.

अनुसूचित जाती उपयोजनेतून बौध्दवस्ती व मागासवर्गीय वस्तीमध्ये विविध विकासकामे समाजकल्याण विभागाच्या माध्यमातून होतात. पण, नावीन्यपूर्ण योजनेतून प्रथमच अनुसूचित उपयोजनेतून यावर्षीपासून बौध्द व मागासवर्गीय वस्तीमध्ये वाचनालयांची सुविधा उपलब्ध केली जाणार आहे. २०१८-१९ मध्ये जिल्ह्यात एकूण १४ ठिकाणी ही सुविधा उपलब्ध होणार आहे. त्यासाठी समाजकल्याण विभागाला जिल्हा नियोजन समितीतून तब्बल दोन कोटी २३ लाख ८९ हजार रुपयांचा निधी उपलब्ध केला आहे. बौध्दवस्ती व मागासवर्गीय वस्तीतील युवकांना अभ्यासाची गोडी लागावी, तसेच स्पर्धा परीक्षेच्या अभ्यासासाठी या युवक, युवतींना या अभ्यासिकेच्या माध्यमातून हक्काची जागा उपलब्ध करण्याचा प्रयत्न आहे.

या अभ्यासिकेत टेबल, खुर्च्या, कपाट, बसण्यासाठी बॅंच, तसेच पुस्तकेही उपलब्ध करून दिली जाणार आहेत. त्यामुळे या समाजातील मुलांना शैक्षणिक अभ्यासासोबतच युवकांना स्पर्धा परीक्षेचाही अभ्यास करण्याची सोय होणार आहे. आतापर्यंत पाटण तालुक्‍यातील मारूल तर्फ पाटण, येराड, शिरळ, मरळी, साईकडे, बहुले, आटोळी तसेच माण तालुक्‍यातील बिदाल, टाकेवाडी, सातारा तालुक्‍यातील वर्णे, फत्यापूर, मत्यापूर, नागठाणे, कामठी या गावांचा समावेश आहे. या प्रत्येक ठिकाणी होणारी अभ्यासिका व वाचनालयासाठी साधारण १५ लाख रुपये खर्च केले जाणार आहेत. बांधकाम विभागाच्या वतीने ही सर्व कामे केली जाणार आहेत. यापूर्वी मागावर्गीय वस्तीमध्ये समाजमंदिरांची कामे मोठ्या प्रमाणात झाली. पण, त्यांचा कार्यक्रमांपुरताच उपयोग होत आहे. 

अशा ठिकाणी थोडाफार निधी खर्च करून वाचनालये होऊ शकतील, याचा विचार करणे गरजेचे आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 14 Studies in Backward Classes