पाणी प्रश्नावरून मुरगूड पालिकेत 15  नगरसेवकांचे राजीनामे

पाणी प्रश्नावरून मुरगूड पालिकेत 15  नगरसेवकांचे राजीनामे

मुरगूड - येथील नगरपरिषदेकडून गेली कित्येक दिवस शहराला दूषित पाणीपुरवठा होत आहे. या पाणीप्रश्‍नावरूनच आज पालिकेत रणकंदन माजले. यात उपनगराध्यक्ष, पक्षप्रतोद व विरोधीपक्षनेत्यासह तब्बल 15 नगरसेवक - नगरसेविकांनी आपल्या पदाचा राजीनामा गटप्रमुख प्रा. संजय मंडलिक यांच्याकडे पाठविला. त्यामुळे राजकीय क्षेत्रात एकच खळबळ माजली आहे.

पालिकेतील पक्षीय बलाबल

सध्या पालिकेवर मंडलिक गटाची सत्ता आहे. येथे नगराध्यक्षासह 16 नगरसेवक - नगरसेविका मंडलिक गटाच्या आहेत. तर उर्वरित तीन पैकी दोन नगरसेवक आमदार हसन मुश्रीफ गटाचे व पाटील गटाचा एक नगरसेवक आहे. नगराध्यक्ष राजेखान जमादार हे लोकनियुक्त नगराध्यक्ष आहेत.

मुरगूड शहराला ऐतिहासिक सरपिराजीराव तलावातून पिण्याच्या पाणी पुरवठा केला जातो. गेली दीड वर्षे शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या योजनेच्या फिल्टर हाऊस मधील ब्लोरिंग मशीन बंद अवस्थेत असल्यामुळे शहरात दूषित पाणीपुरवठा केला जात आहे. शहराला पाणीपुरवठा करणारी योजना जुनी असून ती कुचकामी ठरत आहे. एकीकडे पाणीटंचाईचे संकट असताना दुसरीकडे शहरातील नागरिकांना दूषित पाण्याचा सामना करावा लागत आहे. याबाबत शहरातील नागरिकांनी सोशल मीडियावरून उठाव करण्यास गेल्या कित्येक दिवसापासून सुरुवात केली होती. पण पालिका प्रशासनाने याकडे दुर्लक्ष केले होते. त्यामुळे आज सकाळी साडेदहा वाजण्याच्या सुमारास संतप्त नागरिकांनी  पालिकेवर मोर्चा काढून स्वच्छ पाणी देण्याची मागणी केली.

यावेळी नगराध्यक्ष दालनात बसलेले नगराध्यक्ष राजेखान जमादार यांना काही नागरिकांनी दालनातून बाहेर ओढून काढले. त्याचबरोबर मुख्याधिकारी संजय गायकवाड यांना देखील दालनातून बाहेर काढून दालनास कुलपे लावले. शहरातील नागरिकांनी नगराध्यक्ष राजेखान जमादार, मुख्याधिकारी संजय गायकवाड यांना धारेवर धरले.

यावेळी उपस्थित असणाऱ्या उपनगराध्यक्ष नामदेवराव मेंडके, पक्षप्रतोद जयसिंग भोसले यांच्यासह मंडलिक गटाच्या तेरा नगरसेवकांनी आपल्या पदाचा राजीनामा गटप्रमुख संजय मंडलिक यांच्याकडे पाठवत असल्याचे जाहीर केले.

"नागरिकांना गेली दीड वर्षे दूषित पाणीपुरवठा केला जात आहे हे अयोग्य आहे. वेळोवेळी पालिका प्रशासन व नगराध्यक्ष जमादार यांना सूचना करून देखील त्यांनी या गोष्टीकडे दुर्लक्ष केले आहे. नगराध्यक्ष जमादार हे एकाधीकारशाहीने आणि 'हम करे सो कायदा' यानुसार कारभार हाकत आहेत. या सर्वाला कंटाळून आम्ही सर्वांनी या पदाचा राजीनामा दिला आहे,

- नामदेव मेंडके, उपनगराध्यक्ष

आज दिलेल्या राजीनामा सत्रात मंडलिक गटाचे उपनगराध्यक्ष नामदेव मेंडके, नगरसेविका श्रीमती प्रतिभा पांडुरंग सूर्यवंशी, सुप्रिया राजेंद्र भाट, हेमलता भगवान लोकरे, रेखा आनंदा मांगले, वर्षाराणी सचिन मेंडके, अनुराधा अनिल राऊत, रंजना दत्तात्रय मंडलिक, नगरसेवक दीपक तुकाराम शिंदे, मारुती दिनकर कांबळे, एस. व्ही. चौगले, संदीप बाबुराव कलकुटकी व पक्षप्रतोद जयसिंग साताप्पा भोसले यांचा समावेश आहे. तर पाणीपुरवठा समिती सभापती रविराज परीट हे मुश्रीफ गटाचे आहेत. यांनी देखील राजीनामा दिला आहे. त्याचबरोबर राहुल पांडुरंग वंडकर हे पाटील गटाचे आहेत ते पालिकेचा विरोधी पक्षनेता म्हणून काम पाहताहेत. यांनीदेखील राजीनामा दिला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com