जिल्ह्यातील 15 साखर कारखान्यांनी गाळप परवाना घेतला

15 sugar mills in the district got crushing licenses
15 sugar mills in the district got crushing licenses

सांगली : कोरोना संकटाची तीव्रता कमी होत असतानाच साखर कारखान्यांचा गळीत हंगाम प्रारंभ झाला आहे. परंतू अतिवृष्टीमुळे साखर कारखान्यांपुढे आणखी थोडे दिवस संकट कायम राहणार आहे. जिल्ह्यातील 15 साखर कारखान्यांनी यंदा गाळप परवाना घेतला असून विक्रमी गाळपासाठी त्यांच्यात स्पर्धा रंगणार आहे. गतवर्षी 12 साखर कारखाने सुरू होते. यंदा महांकाली, माणगंगा आणि केन ऍग्रो या कारखान्यांनी गाळप परवाना मागितला नाही. 

जिल्ह्यात गतवर्षी ऊस उत्पादक शेतकरी दुष्काळ, महापूर आणि अतिवृष्टी अशा संकटात सापडले होते. अतिवृष्टीमुळे हंगाम महिनाभर उशिराने सुरू झाला होता. तसेच दुष्काळात चाऱ्यासाठी तोड, महापुरामुळे ऊस क्षेत्र 25 ते 30 टक्केने घटले होते. त्याचा परिणाम गतवर्षी हंगाम साडेतीन ते चार महिन्यापर्यंत सुरू राहिला. ऊसक्षेत्र घटल्यामुळे गतवर्षी जवळपास 15 लाख टन गाळप कमी होऊन साखर उत्पादनही 17 लाख क्विंटलने घटले. मागील हंगामात 12 साखर कारखान्यांनी 66 लाख 79 हजार 385 टन ऊसाचे गाळप करून 82 लाख 46 हजार क्विंटल साखरेचे उत्पादन घेतले. तसेच हंगामाच्या शेवटी कोरोनाच्या संकटाचा सामना करावा लागला. 

यंदा कोरोनाचे संकट अद्यापही कायम असताना साखर कारखान्यांनी हंगामास प्रारंभ केला आहे. 15 ऑक्‍टोबरपासून हंगाम सुरू करण्यास शासनाने परवानगी दिली असली तरी गतवर्षीप्रमाणे अतिवृष्टीने साखर कारखान्यांपुढे संकट निर्माण केले आहे. अनेक ठिकाणी ऊसपट्ट्यात अतिवृष्टीमुळे पाणीच पाणी झाले आहे. त्यामुळे तोडणी करण्यात अडथळे येत आहेत. त्यामुळे हंगामाचा प्रारंभ रस्त्याकडील ऊसतोडणीने झाला आहे. तरीही अडचणी समोर आहेत. त्यामुळे आणखी दोन आठवड्यांनी हंगाम जोमात सुरू होईल असे चित्र आहे. 

गतवर्षी ऊस क्षेत्र घटले होते. परंतू यंदा एक लाख 11 हजार हेक्‍टर ऊसक्षेत्राची नोंद झाली आहे. त्यामुळे यंदा गाळप आणि साखर उत्पादन वाढेल असे चित्र आहे. गतवर्षी 12 साखर कारखाने सुरू होते. यंदा 15 साखर कारखान्यांनी गाळप परवाना घेतला आहे. त्यामुळे अधिकाधिक गाळपासाठी यंदा स्पर्धा रंगणार असल्याचे दिसून येते. 

या कारखान्यांनी घेतला परवाना- 
जिल्ह्यातील "राजारामबापू' कारखान्याचे चार युनिट, "सोनहिरा', "मोहनराव शिंदे', "यशवंत', तासगाव कारखाना, "निनाईदेवी', "विश्‍वास', "हुतात्मा', "क्रांती', "दत्त इंडिया', उदगिरी शुगर, सद्‌गुरू श्री श्री या 15 कारखान्यांनी गाळप परवाना घेतला आहे. तर "महांकाली', "माणगंगा' आणि "केन ऍग्रो' या कारखान्यांनी गाळप परवानाच मागितलेला नाही. 

ऊस क्षेत्र तालुकानिहाय- 
मिरज तालुका (18679 हेक्‍टर), जत (711), खानापूर (3972), वाळवा (35659), तासगाव (6947), शिराळा (8145), आटपाडी (1330), कवठेमहांकाळ (4176), पलूस (13679), कडेगाव (18647) याप्रमाणे एक लाख 11 हजार 945 हेक्‍टर ऊसक्षेत्राची नोंद आहे. 


संपादन : प्रफुल्ल सुतार 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com