मीरासाहेब दर्गा विकासासाठी 156 कोटींचा आराखडा मंजूर 

 156 crore plan approved for development of Mirasaheb Dargah
156 crore plan approved for development of Mirasaheb Dargah

सांगली : मिरजेतील मीरासाहेब दर्गा विकासासाठी 156 कोटींच्या आराखड्याला मुंबईत मंत्रालयात झालेल्या बैठकीत मंजुरी देण्यात आली. सहा वर्षांत हा निधी टप्प्याटप्प्याने मिळणार असल्याची माहिती राष्ट्रवादीचे गटनेते मैनुद्दीन बागवान यांनी दिली. अर्थमंत्री अजित पवार, पालकमंत्री जयंत पाटील, अल्पसंख्याक विकास मंत्री नवाब मलीक, नगरविकासचे प्रधान सचिव महेश पाठक हे बैठकीस उपस्थित होते. तसेच महापौर गीता सुतार, आयुक्त नितीन कापडणीस, विरोधी पक्षनेते उत्तम साखळकर, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता संतोष रोकडे यांच्यासह वरिष्ठ अधिकारी ऑनलाईन उपस्थित होते.

श्री. बागवान म्हणाले,""पहिल्या टप्प्यात येत्या अंदाजपत्रकात 25 कोटी रुपयांची तरतूद होणार आहे. गेल्या काही वर्षांपासून मीरासाहेब दर्गा परिसराचा विकास करण्याची मागणी होत आहे. राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आल्यापासून मी पाठपुरावा करीत होतो.

आयुक्त कापडणीस यांनी दर्गा परिसर विकास आराखडा तयार करून घेतला. यात दर्ग्याच्या मूळ इमारतीचे विस्तारीकरण व सुशोभीकरण, नियोजित इमारतीचे मजबुतीकरण, रस्त्यांचे कॉंक्रिटीकरण, पंढरपूर रस्त्यालगत शाही दर्गाचा विकास या बाबींचा समावेश आराखड्यात केला. मंत्री जयंत पाटील यांच्या यांच्या पुढाकाराने आज मुंबईत बैठक झाली. त्यांनीही दर्ग्याचे महत्त्व आणि मिरज जंक्‍शन या माध्यमातून परिसर विकासाची गरज पटवून सांगितली.

अर्थमंत्री अजित पवार यांनी एकाचवेळी एवढा निधी देणे शक्‍य नसल्याने प्रतिवर्षी 25 कोटी या हिशेबाने सहा वर्षांत निधी उपलब्ध होईल, अशा सूचना करीत प्रस्ताव मंजूर केला. यामुळे आता दर्गा परिसर आणि शहराच्या विकासाचा मार्ग मोकळा झाला आहे. 

असा आहे प्रस्ताव... 

  • मीरासाहेब दर्गा मूळ इमारत विस्तारीकरण व सुशोभीकरण, जुन्या वास्तूंचे मजबुतीकरण : 86.11 कोटी 
  • दर्गा परिसरातील रस्ते कॉंक्रिटीकरण : 33.18 कोटी 
  • पंढरपूर रस्त्यालगत शाही दर्गा व परिसरांतर्गत दोन भूखंडांचा विकास : 19.38 कोटी 
  • कुपवाड येथील आरक्षित जागेवर वारकरी व सार्वजनिक वापरासाठी सुविधा व बगीचा विकास : 17.68 कोटी 

संपादन : युवराज यादव 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News
www.esakal.com