साताऱ्यातील नदी पुनरुज्जीवनासाठी 15.83 कोटी

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 30 जून 2016

सातारा - नदी पुनरुज्जीवन कार्यक्रमांतर्गत जिल्ह्यातील माणगंगा, रानमाळा, येरळा, वासना नद्यांसाठी 15.83 कोटी रुपयांचा निधी उपलब्ध झाला आहे. या निधीतून नदीपात्रात साखळी पद्धतीचे सिमेंट नालाबांध बांधण्यात येणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी आश्‍विन मुद्‌गल यांनी दिली.

सातारा - नदी पुनरुज्जीवन कार्यक्रमांतर्गत जिल्ह्यातील माणगंगा, रानमाळा, येरळा, वासना नद्यांसाठी 15.83 कोटी रुपयांचा निधी उपलब्ध झाला आहे. या निधीतून नदीपात्रात साखळी पद्धतीचे सिमेंट नालाबांध बांधण्यात येणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी आश्‍विन मुद्‌गल यांनी दिली.

जलयुक्त शिवार अभियानातील नदी पुनरुज्जीवन कार्यक्रम हा महत्त्वाकांक्षी उपक्रम आहे. यात उगमापासून संगमापर्यंत दुष्काळी तालुक्‍यातील नद्यांचे पुनरुज्जीवन केले जात आहे. जिल्ह्यातील माण तालुक्‍यातील माणगंगा, सातारामधील रानमाळा, खटावमधील येरळा व कोरेगावमधील वसना नदीचा समावेश आहे. आतापर्यंत या नद्यांच्या पात्रात साठलेला गाळ काढून पात्राचे रुंदीकरण, पात्रात झालेली अतिक्रमणे हटविली आहेत. काही ठिकाणी सिमेंट बंधारेही बांधले आहेत, त्यामुळे नद्या पावसाळ्यात पडणाऱ्या पाण्यातून बारमाही वाहत्या राहणार आहेत.

नदी पुनरुज्जीवन कार्यक्रमांतर्गत दुसऱ्या टप्प्यात शासनाने एकूण 46.09 कोटी रुपये उपलब्ध केले आहेत. त्यापैकी जिल्ह्यातील चार नद्यांच्या पुनरुज्जीवन कार्यक्रमास 15 कोटी 83 लाख 33 हजार रुपये उपलब्ध केले आहेत. यापूर्वी या कार्यक्रमास 14.30 कोटी रुपये उपलब्ध झाले होते. दुसऱ्या टप्प्यात मिळालेल्या या निधीतून एकूण 60 साखळी सिमेंट नालाबांध बांधण्यात येणार आहेत. यात माणगंगा नदीत 18, रानमाळामध्ये पाच, येरळा नदीत दहा, वसना नदीत 27 नालाबांधाचा समावेश आहे. माण, खटाव तालुक्‍यांत अवकाळी पावसाचे बंधारे, नालाबांध, पाझर तलावात पाणी साचल्याने गावांच्या पाणीपातळी वाढली आहे. या नद्याच्या पात्रात साखळी सिमेंट नालाबांध बांधण्यात येणार असल्याने पात्रे बारमाही वाहती राहण्याबरोबरच पाणीपातळीत मोठ्या प्रमाणात वाढ होण्यास मदत होणार आहे.

Web Title: 15.83 crore for the revival of the river satara