#KolhapurFloods शिरोळ तालुक्‍यातील 16 गावांना अद्याप वेढा 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 13 ऑगस्ट 2019

शिरोळ - तालुक्‍यातील पूरपरिस्थितीमध्ये सुधारणा होत असली; तरी अद्यापही 16 गावांना आलेले बेटाचे स्वरूप कायम आहे. बुधवारी सायंकाळपर्यंत काही मार्ग खुले होण्याची शक्‍यता असल्याने, या गावांशी संपर्क थेट होणार आहे.

शिरोळ - तालुक्‍यातील पूरपरिस्थितीमध्ये सुधारणा होत असली; तरी अद्यापही 16 गावांना आलेले बेटाचे स्वरूप कायम आहे. बुधवारी सायंकाळपर्यंत काही मार्ग खुले होण्याची शक्‍यता असल्याने, या गावांशी संपर्क थेट होणार आहे.

दरम्यान, प्रापंचिक साहित्याचे नुकसान झालेल्या पूरग्रस्तांना पहिल्या टप्प्यातील अनुदानाचे वाटप उद्यापासून होणार आहे. जिल्ह्याला मंजूर 25 पैकी चौदा कोटींची रक्‍कम तालुक्‍यास मिळाल्याची माहिती उपविभागीय अधिकारी समीर शिंगटे यांनी आज येथे दिली. 

शिरोळ तालुक्‍यातील महापूर ओसरण्यास सुरवात झाल्याने मंगळवारी सकाळी शिरोळ ते अर्जुनवाड मार्ग खुला झाला. यामुळे या गावाशी थेट संपर्क सुरू झाला. ग्रामस्थांनी गावाकडे अक्षरशः धाव घेतली. घराच्या नुकसानीचा अंदाज घेतला. प्राथमिक माहितीनुसार अर्जुनवाडमध्ये सुमारे 50 घरांची पडझड झाली आहे. तालुक्‍याच्या दक्षिण भागातील पाण्याची पातळी गेल्या चोवीस तासांत अडीच ते तीन फुटांनी उतरली आहे. यामुळे घालवाड, कुटवाड, कनवाड, हसूर, शिरटी, नृसिंहवाडी, कुरुंदवाड, बस्तवाड, तेरवाड, राजापूर, राजापूरवाडी, खिद्रापूर आदी गावांना बेटाचे स्वरूप अद्यापही आहे. 

दरम्यान, ज्या कुटुंबांच्या घरात दोनपेक्षा अधिक दिवस पुराचे पाणी आले आहे, अशा कुटुंबांसाठी देण्यात येणाऱ्या सानुग्रह अनुदानापैकी पाच हजार रुपयांच्या रकमेचे वाटप बुधवारपासून करण्यात येणार आहे. यासाठी तालुक्‍याला चौदा कोटी रुपये प्राप्त झाले असून, मंगळवारी पाच कोटी रुपये प्रशासनाने, वाटपासाठी काढले आहेत. तलाठी व ग्रामसेवकांच्या मदतीने ही रोख रक्‍कम संबंधित कुटुंबांकडे सुपूर्द केली जाणार असल्याची माहिती श्री. शिंगटे यांनी दिली. 

पूरग्रस्तांसाठी 107 छावण्या 
तालुक्‍यामध्ये पूरग्रस्तांसाठी 107 छावण्या उभारल्या आहेत. या छावण्यांमध्ये 42 हजार 509 पूरग्रस्त सहभागी आहेत. या छावण्यांमध्ये 15 हजार 411 लहान-मोठी जनावरे सहभागी आहेत. याशिवाय सीमा भागातील दोन छावण्यांमध्ये 511 नागरिक स्थलांतरित झाले आहेत.  

 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 16 villages in Shirol Taluka under water