वारसा वाचनाचा...१६७ वर्षांचा!

वारसा वाचनाचा...१६७ वर्षांचा!

कोल्हापूर - तुम्ही जगभरात कुठेही असा. करवीर नगर वाचन मंदिराच्या संकेतस्थळावर गेलात की ग्रंथालयातील सर्व ग्रंथ संपदेची माहिती मिळेल. तुम्हाला मग जे पुस्तक किंवा हस्तलिखित पाहिजे असेल ते संस्थेशी संपर्क साधून त्याच्या फोटो कॉपी मिळवू शकता....काही हस्तलिखितांच्या पीडीएफ फाईलही संकेतस्थळावर अपलोड झाल्या आहेत. थोडक्‍यात काय तर शतकोत्तर हीरकमहोत्सवी परंपरा असणारे हे ग्रंथालय आता जगभरातील अभ्यासकांची संशोधन शाळा म्हणूनच ओळखले जाऊ लागले आहे.    
कर्नल एच. एल. अँडरसन यांच्या पुढाकाराने १५ जून १८५० ला ‘कोल्हापूर नेटिव्ह लायब्ररी’ नावाने संस्था सुरू झाली. ४ मे १९२४ ला ‘कोल्हापूर जनरल लायब्ररी’असे संस्थेचे नामकरण झाले. २४ मे १९३४  पासून ‘करवीर नगर वाचन मंदिर’ म्हणून ही संस्था इतिहासाचा साथीदार, वर्तमानाचा साक्षीदार आणि भविष्यकाळाचा मार्गदर्शक म्हणून आजअखेर कार्यरत आहे. जगभरातील हजारो दृष्टिहिनांच्या जीवनात आनंद फुलविणाऱ्या ब्रेल लिपीतील ग्रंथांचा विशेष विभाग असणारे करवीर नगर वाचन मंदिर हे देशातील पहिले जिल्हा वाचनालय आहे, तर दुर्मिळ ग्रंथ व हस्तलिखितांचा संग्रह असणाऱ्या देशातील पहिल्या दहा ग्रंथालयाच्या तोडीचा संग्रह येथे आहे. दुर्मिळ ग्रंथांच्या जपणुकीसाठी शासन काही तरी करेल, या अपेक्षेवर न थांबता संस्था आणि सभासदांच्या पुढाकाराने निधी उपलब्ध करून येथे दुर्मिळ ग्रंथांच्या डिजिटलायझेशनची प्रक्रिया सुरू आहे. संस्थेत सध्या विविध विषयांवरील एक लाख तीस हजारावर पुस्तके आहेत. त्यात सुमारे वीस हजार संदर्भग्रंथ, आठशेहून अधिक दुर्मिळ हस्तलिखितांचा समावेश आहे. संस्थेत आजवर झालेल्या व्याख्यानांच्या १९७२ पासूनच्या ध्वनिफिती, प्रत्येक वर्षाचे प्रोसेडिंग व वार्षिक अहवालांच्या सीडीज्‌ आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे ज्ञानपीठ पुरस्कारप्राप्त सर्व साहित्य संस्थेत उपलब्ध आहे. 

असा आहे दुर्मिळ खजिना
संस्थेत १८९९ मधील समग्र विल्यम शेक्‍सपिअर, मोरोपंत, अनंत फंदी अशा कवींचे कवितासंग्रह, सन १९०० पूर्वीची ऐंशी संगीत व गद्य नाटके आणि सोळाव्या-सतराव्या शतकापासूनची शंभरहून अधिक हस्तलिखित, कॅप्टन जार्विस जॉर्ज क्रिस्टो यांचे ‘शिक्षामाला भाग २ व बीजगणित’ (१८२७), जार्व्हिस जॉर्ज यांचे ‘विद्येचे उद्देश लाभ आणि संतोष’ (१८२९), ना. रा. ठकार यांची ‘इंग्लंड देशाची बखर भाग २’ (१८३४), नाना नारायण यांचे ‘इंग्लंड देशाचे वर्णन’ (१८३४), जी मटी यांचे ‘रेशमाचे किडे पाळण्याची व रेशीम तुतीची झाडे लावण्याची रीत’ (१८३८) असे आद्यमुद्रित ग्रंथ, निळोबा महाराजांचे ‘अभंग’, पंडित विष्णू परशुराम यांचा ‘नाना फडणवीस यांची बखर’ (१८५९), मोरोपंतांचा ‘भीष्मपर्व, उद्योगपर्व, आर्या, द्रोणपर्व, स्त्रीपर्व’ (१८६०), परशुराम बल्लाळ गोडबोले यांचे सर्व संग्रह (१८६० ते ६४), कृष्णशास्त्री चिपळूणकरांचे सॉक्रेटिसचे चरित्र (१८७५), नागाचंद नाटक (१८६३), र. शं. अभ्यंकरांचे हरिश्‍चंद्र सत्वदर्शन नाटक (१८६७), लक्ष्मण गोपाळ दीक्षितांचे रुक्‍मिणीहरण नाटक (१८६५) असे दुर्मिळ ग्रंथ, श्री भागवत (शके १७२९), श्री ज्ञानेश्‍वरी (शके १६३८), - कृष्णशास्त्री मुद्‌गल लिखित युद्धकांड रामायण, श्री ज्ञानेश्‍वरी (शके १७८५), ज्ञानेश्‍वरी परिभाषा (शके १८१२), सार्थ दासबोध, श्री महाभारत आदिपर्व (शके १६९१), भक्तीविजय (शके १७२२), तुकोबाराय गाथा (शके १७९३) आदी हस्तलिखिते, हिंदीतील दोशी उगरचंद अमरचंद यांचे श्री शांतिनाथ पुराण (१९११), संस्कृतमधील श्री भागवत्‌ प्रथम स्कंद, श्रीधरस्वामी भागवत्‌ भावार्थ दीपिका (शके १७०५), श्रीमत्‌ भागवत आदी हस्तलिखिते.

खांडेकरी साहित्याचा असाही ऐतिहासिक विजय
मराठी साहित्यातील पहिले ज्ञानपीठ पुरस्कार विजेते,ज्येष्ठ साहित्यिक वि. स. तथा भाऊसाहेब खांडेकर यांच्या साहित्याने सर्वोच्च न्यायालयातही ऐतिहासिक विजय मिळवला. पुण्याच्या देशमुख आणि कंपनी या प्रकाशन संस्थेच्या विरोधात तीस वर्षे सुरू असलेल्या या खटल्याचा निकाल २०१० मध्ये लागला. खांडेकरांचे साहित्य आजही तितकेच लोकप्रिय आहे. मात्र अशा लोकप्रिय लेखकाला आणि त्यांच्या कुटुंबीयांना प्रकाशकांकडून फसविले गेल्याने, प्रसंगी धमक्‍या देण्याचे प्रकार घडल्याने हा खटला मराठी साहित्यात सर्वाधिक गाजलेला खटला मानला जातो. या निकालाने खांडेकरी साहित्याचे सर्वाधिकार त्यांच्या वारसांकडेच असल्याचे स्पष्ट झाले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com