कोल्हापूर शहरात 176 जुनी झाडे धोकादायक

कोल्हापूर शहरात 176 जुनी झाडे धोकादायक

कोल्हापूर - पावसाळा सुरू झाला, की शहरातील जुन्या धोकादायक इमारती पाडण्याचा विषय सुरू होतो, आणि महापालिका यंत्रणा कामाला लागते; पण रस्त्याकडेच्या झाडांचेही वय होते, त्यापासूनही नागरिकांच्या जीवाला धोका असतो, याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष आहे. गेल्या आठवड्यात शहरात पाच जुनी झाडे कोसळली. सुदैवाने कोणतीही जीवित, वित्तहानी झाली नाही. 

दहावर्षांपूर्वीच झालेल्या अर्धवट वृक्षगणनेत अशी झाडे शोधली आहेत. शहरात जुनी, जीर्ण अशी सुमारे 176 धोकादायक झाडांचा धोका आहे. ही 176 झाडे नैसर्गीकरित्या जुनी झाली असली तरी आज ती शहरात धोकादायक अवस्थेत आहेत. गेल्या आठवड्यात रंकाळा चौपाटी परिसरात सकाळी दोन मोठी झाडे उन्मळून पडली. जर ही झाडे सायंकाळी कोसळली असती तर मोठा अनर्थ झाला असता. झाडे पडल्यामुळे विजेचे खांबही कोसळले. 

शहरात सध्या रेनट्री, गुलमोहर, पिचकारी, सॅट्रोडिया, अकेशिया आदी झाडांचीच पूर्वी लागवड झाली आहे. या झाडांचे सरासरी आयुष्य 40 ते 50 वर्षांचे असते. या झाडांप्रमाण निलगिरी, सुबाभूळ, सिल्वर ओक, अशा झाडांचीही लागवड केली आहे. या झाडांचेही आयुष्य 20 ते 25 वर्षे असते. या झाडांची वाढ 30 ते 40 फुटापर्यंत होते, पण या कालावधीनंतर या झाडांची 20 ते 22 फुटावर ते वठण्यास सुरवात होते. किंवा कीड लागून हे झाड पडण्याचा मार्गावर असते. सर्वाधिक म्हणजे 100 ते 200 वर्षांचे आयुष्य वड पिंपळ या झाडांचे असते. 

आज लक्ष्मीपुरी, शाहूपुरी, तसेच मंगळवारपेठ परिसरात सर्वाधिक जुनी झाडे आहेत. महापालिकेच्या वृक्ष प्राधिकरण समितीकडे शहरातील वृक्षांची गणना केलेली असते. दर पाच वर्षानी वृक्षगणना केली पाहिजे, असा शासनाचा संकेतच आहे; पण त्यामुळे वृक्षगणना झालीच नाहीय. या शास्त्रीय वृक्षगणनेत झाडांची जात, वय, आयुष्य याचीही मोजदाद केली जाते. वयस्कर आणि धोकादायक झाडांची छाटणी करतात तसेच विस्तार आणि उंची कमी केली जाते; पण झाड तोडायचे नाही, याच एका नियमानुसार जुनाट झाडेही धोकादायक अवस्थेत राहिली आहेत. त्या झाडांबाबत नागरिकांच्या जीवितासाठी तातडीने निर्णय कोण घेणार? याकडे नागरिकाचे लक्ष आहे. 

अशी होतात झाडे कमकुवत 
खासगी बांधकामावेळी बेसमेंटसाठी खुदाई करताना झाडांची मुळे एका बाजूने तोडली जातात. रस्तेविकास प्रकल्पावेळी फूटपाथ आणि गटारी करताना झाडांची कत्तल झालीच शिवाय अनेक झाडांची मुळेही तोडली. केबल खुदाई करताना, गटारे करताना झाडांची मुळे अर्धवट तोडल्याने या झाडांचे आयुष्य कमी झाले आहे. एका बाजूला या झाडांचा भार झाल्याने भविष्यात अशी झाडे कोसळण्याचाही धोका अधिक आहे. अनेक वेळा झाड नकोसे झाले तर खोडात खिळे मारले जातात किंवा तार गुंडाळली जाते, अथवा मुळात कचरा जाळून झाडाला कमकुवत करण्याचे उद्योग अनेक सुरू असतात. पेव्हिंग ब्लॉक किंवा सिंमेंट कट्टे घालून मुळे हवाबंद केल्यास झाडे नैसर्गिक अवस्थेत रहात नाहीत. 

कोल्हापुरातील झाडांची गणना दहा वर्षांपूवी अर्धवट केली आहे. ज्या संस्थेला वृक्ष गणनेचे कंत्राट दिले. त्यांनी 40 वॉर्डमधीलच झाडांची गणना केली, तीही चुकीची केली. ती चूक सुधारण्यासाठी दुसऱ्या संस्थेला काम दिले; पण तेही सदोष झाले आहे. 
- उदय गायकवाड,
वृक्ष प्राधिकरण समिती सदस्य. 

शहरात झाडे लावताना परिसराचा अभ्यास करण्याची गरज आहे. मध्यमवर्गीय (कमी उंचीची) झाडे शहरात लावली पाहिजेत. बहावा, पारिजातक, कांचन, कुंती, हादगा आदी जातीची झाडे लावली तर फुलांमुळे सुशोभीकरणही होईल आणि उंची कमी असल्याने धोकाही होणार नाही. यासाठी मायक्रो प्लॅन आवश्‍यक आहे. 
- अनिल चौगले,
पर्यावरण अभ्यासक. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com