खटावमधील 18 गावांत आले टॅंकर!

संजय जगताप
शनिवार, 22 एप्रिल 2017

"सकाळ'च्या दणक्‍याने प्रशासन वठणीवर; पाणी मिळाल्याने ग्रामस्थ सुखावले
मायणी - तीव्र पाणीटंचाई असताना केवळ कागदी घोडे नाचवणाऱ्या खटाव तालुका प्रशासनाच्या कारभाराची लक्तरे वेशीवर टांगताच तालुक्‍यातील अठराही गावांत तातडीने टॅंकर सुरू करण्यात आले.

"सकाळ'च्या दणक्‍याने प्रशासन वठणीवर; पाणी मिळाल्याने ग्रामस्थ सुखावले
मायणी - तीव्र पाणीटंचाई असताना केवळ कागदी घोडे नाचवणाऱ्या खटाव तालुका प्रशासनाच्या कारभाराची लक्तरे वेशीवर टांगताच तालुक्‍यातील अठराही गावांत तातडीने टॅंकर सुरू करण्यात आले.

मायणीत तर कालच गुरुवारी (ता. 20) रोजी दुपारनंतर दहा हजार लिटरचा एक टॅंकर तातडीने पाठवून देण्यात आला. आजही माळीनगर व मोहननगर या तीव्र टंचाईग्रस्त उपनगरांत दोन टॅंकरने पाणीपुरवठा करण्यात आला. "सकाळ'ने केलेल्या पाठपुराव्यामुळे तातडीने टॅंकर सुरू होऊ शकले, अशी प्रतिक्रिया नागरिक व्यक्त करीत आहेत.

खटाव तालुक्‍यात तीव्र पाणीटंचाईने लोक हैराण झाले आहेत. पाणीपुरवठ्याचे बहुतांश स्त्रोत आटले आहेत. लोकांना पाणीपुरवठा करण्याचे मोठे आव्हान प्रत्येक ग्रामपंचायतीपुढे उभे ठाकले आहे. ग्रामपंचायतींनी तालुका प्रशासनाकडे टॅंकरचे प्रस्ताव पाठवले होते. मात्र, सर्वच प्रस्ताव अंतिम मंजुरीसाठी पुढे न पाठवता तालुका प्रशासनाने टॅंकरच्या संख्येत कपात करून काही प्रस्ताव पुढे पाठवले.

जिल्हाधिकाऱ्यांनी खटाव तालुक्‍यासाठी अठरा टॅंकर मंजूर केले. पंधरा एप्रिलला त्याबाबतचे आदेश काढून तातडीने टॅंकर सुरू करण्याच्या सूचना तालुका प्रशासनाला दिल्या. दरम्यान, टॅंकरसाठी प्रशासनाचे उंबरे झिजवणाऱ्या गावोगावच्या सरपंच व प्रमुख कार्यकर्त्यांचा रोष दूर करण्यासाठी लगेचच अठरा एप्रिलपासून टॅंकर सुरू करणार असल्याची ग्वाही देण्यात आली. तसे सरपंचांना पत्राद्वारे कळवण्यात आले. मात्र, त्यानंतर दोन दिवस उलटले तरी टॅंकर दृष्टीस आले नाहीत. तीव्र टंचाई असतानाही प्रशासन वेळकाढूपणा करीत असल्याने पदाधिकारी व नागरिकांतून अतिशय संतापजनक प्रतिक्रिया उमटू लागल्या.

गावोगावच्या कारभाऱ्यांनी तालुका प्रशासनाबाबत "सकाळ'जवळ शेलक्‍या शब्दांत भावना व्यक्त केल्या. त्यानंतर "सकाळ' ने प्रांताधिकारी दादासाहेब कांबळे, गटविकास अधिकारी डॉ. तानाजी लोखंडे, तहसीलदार प्रियांका पवार, प्रादेशिक ग्रामीण पाणी विभागाचे अभियंता झेंडे यांच्याकडे टॅंकर सुरू होण्याबाबत पाठपुरावा केला. त्याचे फलित म्हणून कालच गुरुवारी (ता. 20) तातडीने मायणीत एका टॅंकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात आला. तीव्र पाणीटंचाईने त्रासलेल्या येथील माळीनगर व मोहननगर या उपनगरांत आज दोन शासकीय टॅंकरने पाणीपुरवठा करण्यात आला. टॅंकर आल्याचे समजताच लोकांचा जीव भांड्यात पडला. अनेकांनी आनंदाने टॅंकर आला रे आला.. अशा हाका दिल्या. पाणी भरून घेण्यासाठी लोकांची एकच झुंबड उडाली. खूप दिवसांनी पुरेसे पाणी मिळाल्याने ग्रामस्थांच्या चेहऱ्यावरील आनंद आज ओसंडून वाहत होता. दरम्यान, प्रादेशिक पाणी योजना समन्वय समितीचे अध्यक्ष दादासाहेब कचरे यांनी सहकाऱ्यांच्या मदतीने टॅंकरच्या तोटीला रिंग पाइप लावून घेतली. टॅंकरसमवेत ठिकठिकाणी जाऊन लोकांना पाण्याचे समान वाटप होईल, याची दक्षता घेतली.

'तालुक्‍यातील सर्व टंचाईग्रस्त अठरा गावांत टॅंकर सुरू झाले आहेत. आता कसलीही अडचण नाही. टॅंकरच्या प्रलंबित प्रस्तावांना मंजुरी मिळताच तेही टॅंकर तातडीने सुरू करू.''
-तानाजी लोखंडे, गटविकास अधिकारी, वडूज

'सकाळ'च्या पाठपुराव्यामुळेच तातडीने चक्रे फिरली. आज प्रत्यक्ष टॅंकर आला, नागरिकांना न्याय मिळाला.''
- महादेव माळी, संचालक, मायणी अर्बन बॅंक, माळीनगर, मायणी

"सकाळ'चे राहणार लक्ष
पुढील काही महिने खटावसह अन्य तालुक्‍यांतही अनेक गावांत पाणीटंचाई निर्माण होणार आहे. अनेक गावांनी टॅंकरचे प्रस्ताव प्रशासनाकडे सादर केले आहेत. पुढील काळात आणखी काही प्रस्ताव दिले जातील. टॅंकरने पाणीपुरवठा केला जाणाऱ्या या प्रक्रियेवर "सकाळ'च्या गावोगावच्या बातमीदारांचे बारकाईने लक्ष राहणार आहे. टंचाईग्रस्त गावांना विनाअडथळा टॅंकरने पाणीपुरवठा व्हावा, अशी "सकाळ'ची भूमिका आहे.

mayn21p1
मायणी - मोहननगर भागात टॅंकर येताच पाण्यासाठी नागरिकांची उडालेली झुंबड.

Web Title: 18 village water supply by tanker