सांगली: हत्या करून पुरलेले 19 भ्रूण ताब्यात

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 6 मार्च 2017

स्त्रीभ्रूणहत्येचे केंद्र... 
म्हैसाळ हे महाराष्ट्र-कर्नाटक सीमेवरील गाव आहे. सोनोग्राफी करून गर्भ स्त्रीचा असेल तर गर्भपात करायचा उद्योगच येथे केला जात होता. मणेराजुरी येथील स्वाती जमदाडेलादेखील पतीने स्त्री गर्भ खाली करण्यासाठीच आणले होते; परंतु दुर्दैवाने तिचा मृत्यू झाला. स्त्रीभ्रूणहत्याच येथे मोठ्या प्रमाणात केली जात असल्याची माहिती पुढे येत आहे. 

सांगली - म्हैसाळ (ता. मिरज) येथे गर्भपातावेळी महिलेचा मृत्यू झाल्याच्या प्रकरणाला आज गंभीर वळण मिळाले. पोलिस तपासात फरारी डॉ. बाबासाहेब खिद्रापुरे हा राजरोस भ्रूणहत्या करत असल्याचे निष्पन्न झाले. म्हैसाळ-कागवाड रस्त्यावरील ओढ्याकाठी पोलिसांनी जेसीबीच्या साहाय्याने खोदकाम केल्यानंतर हत्या करून बॅगेत घातलेले 19 भ्रूण मिळाले. त्यापैकी काही भ्रूण कुजलेले आहेत. काही बॅगांमध्ये मांसाचे व हाडांचे तुकडे मिळाले. अद्यापही परिसरात खोदकाम सुरू आहे. डॉ. खिद्रापुरे (रा. कनवाड, ता. शिरोळ) हा फरारी झाला आहे; तर गर्भपात करताना मृत झालेल्या महिलेचा पती प्रवीण जमदाडे हा अटकेत आहे. 

याबाबत आज पत्रकार परिषदेत माहिती देताना अधीक्षक दत्तात्रय शिंदे म्हणाले, "मणेराजुरी येथील सौ. स्वाती जमदाडे या महिलेचा बेकायदा गर्भपात करताना एक मार्चला मृत्यू झाला. याप्रकरणी स्वातीच्या वडिलांनी मिरज ग्रामीण पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार सदोष मनुष्यवध, बेकायदा गर्भपात आणि मेडिकल प्रॅक्‍टिशनर्स ऍक्‍टनुसार डॉ. खिद्रापुरे, पती प्रवीण जमदाडे याच्यावर गुन्हा दाखल केला. गुन्ह्याचा तपास करताना काही भयानक गोष्टी समोर आल्या. डॉ. खिद्रापुरे पती-पत्नी प्रॅक्‍टिस करतात. डॉक्‍टरकडे बीएचएमएस पदवी आहे. हॉस्पिटलची झडती घेतल्यानंतर गुन्ह्याला पुष्टी देणाऱ्या गोष्टी समोर आल्या. रजिस्टर्स मिळाली. ती जप्त करण्यात आली आहेत. होमिओपॅथीची पदवी असणाऱ्या डॉक्‍टरला सर्जरीचे कौशल्य असत नाही. तरीसुद्धा हॉस्पिटलमध्ये सर्जरीचे साहित्य, ऑपरेशन थिएटर, डिलिव्हरी रूम आढळली. भूलतज्ज्ञांना बोलवून गर्भपात केले जात होते.'' 

ते म्हणाले, "गर्भपातानंतर मृत गर्भ पिशवीत भरून त्याची विल्हेवाट लावली जात असे. हे कृत्य करणारे साक्षीदार मिळाले आहेत. ओढ्याच्या काठाला गर्भ पुरले जात असल्याची माहिती मिळाल्यानंतर आज कार्यकारी दंडाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत ओढ्याकाठी खोदकाम करण्यात आले. तेव्हा वेगवेगळ्या 19 बॅगा मिळाल्या. काही बॅगांमध्ये कुजलेले गर्भ होते; तर काहींमध्ये मांसाचे व हाडांचे तुकडे मिळाले. 19 बॅगा पंचनामा करून जप्त करण्यात आल्या आहेत. मिरजेच्या शासकीय रुग्णालयात या मृत गर्भांचे विश्‍लेषण केले जाईल. या गुन्ह्याचा सखोल तपास सुरू आहे. जास्तीत जास्त शिक्षा होईल इतके पुरावे हाती लागले आहेत. सदोष मनुष्यवध आणि गर्भपाताची कलमे लावण्यात आली आहेत. मृत महिलेचा पती अटकेत आहे. तर डॉक्‍टर फरारी झाला आहे.'' 

रजिस्टर्समध्ये बऱ्याच नोंदी... 
म्हैसाळमध्ये डॉ. खिद्रापुरे हा 10 वर्षांपासून प्रॅक्‍टिस करत होता. त्याची पत्नीही डॉक्‍टर आहे. झडतीमध्ये बिलाचे रजिस्टर मिळाले. भूलतज्ज्ञास दिलेली फी, कुटुंबनियोजन, सिझेरियन शस्त्रक्रिया केल्याच्या नोंदी असलेले रजिस्टर मिळाले. भूलसंमती देणारे रजिस्टर, रुग्णाची प्रकृती गंभीर असल्याबाबत पत्र मिळाले. सर्जरीसाठी लागणारी हत्यारे, दूरच्या रुग्णांचे पत्ते असलेले रजिस्टर मिळाले. 

रॅकेट असण्याची शक्‍यता... 
डॉ. खिद्रापुरे याच्या भारती हॉस्पिटलमध्ये एक्‍स-रे मशिन पोलिसांना मिळाले. त्याच्या हॉस्पिटलमध्ये स्त्रीभ्रूणहत्याच मोठ्या प्रमाणात होत असाव्यात, अशी शक्‍यता आहे. त्यामुळे अन्य ठिकाणी सोनोग्राफी करून खिद्रापुरेच्या हॉस्पिटलमध्ये गर्भपात केले जात असावेत. गर्भपात करणारे "रॅकेट' कार्यरत असल्याची शक्‍यता व्यक्त होत असल्याने संबंधितांची पाळेमुळे खणण्याचे आव्हान पोलिसांसमोर आहे. 

स्त्रीभ्रूणहत्येचे केंद्र... 
म्हैसाळ हे महाराष्ट्र-कर्नाटक सीमेवरील गाव आहे. सोनोग्राफी करून गर्भ स्त्रीचा असेल तर गर्भपात करायचा उद्योगच येथे केला जात होता. मणेराजुरी येथील स्वाती जमदाडेलादेखील पतीने स्त्री गर्भ खाली करण्यासाठीच आणले होते; परंतु दुर्दैवाने तिचा मृत्यू झाला. स्त्रीभ्रूणहत्याच येथे मोठ्या प्रमाणात केली जात असल्याची माहिती पुढे येत आहे. 

पतीने ऐकले नाही... 
मृत स्वातीचे आई-वडील पॉंडेचरी येथे आहेत. स्वातीला पहिल्या दोन मुली आहेत. तिसऱ्यांदाही मुलगीच असल्याचे पतीने तपासून घेतले होते. त्यामुळे तिचा गर्भपात करत असल्याबद्दल पतीने स्वातीच्या वडिलांना फोन केला. तेव्हा वडिलांनी नशिबात जे असेल ते होऊ दे. गर्भपात करू नका, असा सल्ला दिला; परंतु पतीने ऐकले नाही. त्यामुळे गर्भपातावेळी स्वातीचा मृत्यू झाला.

Web Title: 19 aborted female foetuses dumped near stream in Sangli