लगीनघाईत १९ कोटींचे रस्ते पाच मिनिटांत मंजूर

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 10 मे 2017

सांगली - लगीन मुहूर्ताच्या घाईत स्थायी  समितीने आज ३६ रस्त्यांच्या कामांपैकी १९ कोटींच्या २१ कामांना अवघ्या पाच मिनिटांत अंतिम मंजुरी देत सभेचे लगीन लावले. लग्न समारंभासाठी जाण्याची घाई अनेक सदस्यांना झाल्याने स्थायी समितीची बैठक कोणत्याही चर्चेविना एकमुखाने मंजुरी देत आवरली. 

सांगली - लगीन मुहूर्ताच्या घाईत स्थायी  समितीने आज ३६ रस्त्यांच्या कामांपैकी १९ कोटींच्या २१ कामांना अवघ्या पाच मिनिटांत अंतिम मंजुरी देत सभेचे लगीन लावले. लग्न समारंभासाठी जाण्याची घाई अनेक सदस्यांना झाल्याने स्थायी समितीची बैठक कोणत्याही चर्चेविना एकमुखाने मंजुरी देत आवरली. 

शहरातील २१ रस्त्यांच्या कामांना लवकरच प्रारंभ केला जाईल, अशी माहिती सभापती संगीता हारगे यांनी दिली. सभेच्या प्रारंभीच महापालिकेतर्फे होणाऱ्या शहरातील प्रमुख रस्त्यांचा विषय घेण्यात आला. ३६ रस्त्यांच्या २३ कोटी रुपयांच्या निविदा प्रक्रियेच्या सर्व फायली निकालात निघाल्यानंतर अंतिम मंजुरीसाठी स्थायी समोर ठेवण्यात आल्या. त्यापैकी २१ कामांना सदस्यांनी कोणताही आक्षेप न घेता तातडीने मंजुरी दिली. त्यामुळे या कामांना तातडीने सुरवात करण्याचे आदेशही सभापतींनी दिले. 

त्यानंतर राजू गवळीसह सदस्यांनी ड्रेनेजचा प्रश्‍न  उपस्थित केला. त्रिमूर्ती कॉलनी, रामकृष्ण परमहंस सोसायटीत ड्रेनेजच्या कामानंतरच्या चरी अद्यापही बुजवल्या का नाहीत, असा सवाल करून अधिकाऱ्यांना धारेवर धरले. त्यावर अधिकाऱ्यांकडे कोणतेही उत्तर नसल्याने सदस्यांनी हल्लाबोल केला. सभापती हारगे यांनी काम बंदचे आदेश दिले.

पावसाळ्याच्या तोंडावर नागरिकांचे हाल होऊ नयेत, यासाठी तातडीने चरी बुजवाव्यात, असे आदेशही दिले.

गुंठेवारी भागासह उपनगरातील रस्त्यांच्या मुरमीकरणाचा प्रश्‍न सदस्यांनी उपस्थित केला. मागील वर्षी आयुक्त रवींद्र खेबुडकर यांनी पावसाळ्यात मुरूम देण्यात येणार नाही, अशी भूमिका घेतली होती. त्यामुळे आता पावसाळ्यापूर्वीच मुरमीकरण करून घ्यावे, अशी आग्रही मागणी सदस्यांनी केली. त्यावर प्रशासनाकडून सकारात्मकता दाखवण्यात आली. दरम्यान, प्रियंका बंडगर यांनी विश्रामबागमधील विधाता कॉलनीतील रस्त्याच्या कामाचा विषय ऐनवेळी उपस्थित केला. नागरिकांची सातत्याने मागणी असल्याने सभपतींनीही तातडीने हा रस्ता मंजूर केला. त्याचा अंदाजित खर्च ३५ लाख रुपये आहे. 

अधिकाऱ्यांचा शिरजोर; सभापती ठरल्या कमजोर 
स्थायी समितीच्या बैठकीत सदस्यांनी ड्रेनेजच्या चरी बुजवण्याचा विषय घेतला. याची जबाबदारी कोणाची? असा सवाल सभापतींनी केला. त्यानंतर बांधकाम आणि ड्रेनेज विभागाच्या अधिकाऱ्यांनी एकमेकांची नावे पुढे करत, टाळाटाळ केली. सभापतींचा आदेशही जुमानला नाही. त्यांचा हा शिरजोर पाहून सदस्य प्रदीप पाटील यांनी सभात्याग केला. त्यानंतरही अधिकारी तसेच होते.  अखेर सभापतींनी संबंधित तीन अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याचे आदेश दिले. याचे पत्रही आयुक्तांना सादर केले.

मंजूर रस्ते असे...
अहिल्यानगर ते शालिनीनगर (मुरमीकरण), मिरज पोलिस स्टेशन व्हाया दर्गा कमान ते हॉटेल किरण (हॉटमिक्‍स डांबरीकर), अहिल्यादेवी होळकर चौक ते सांगली रेल्वे पूल, मिरज जमखानवाला हॉटेल ते शास्त्री चौक, विजापूर वेस, दिंडीवेस ते बॉम्बे बेकरी, मिरज फायर स्टेशन ते महाराणा प्रताप चौक,  जुना बुधगाव रस्ता ते इस्लामपूर बायपास रस्ता, काँग्रेसभवन, शिवाजी स्टेडियम ते उर्मिला एम्पायर, गोमटेशनगरमधील अंतर्गत रस्ते, खेराडकर पेट्रोल पंप ते चिन्मय पार्क, शंभरफुटी रस्ता ते खोकले मळा, मिरज कर्मवीर चौक ते कमानवेस, सांगलीतील कोरे आयकॉन ते भाटे दुकान, चिन्मय पार्क ते यशवंतनगर, कोल्हापूर रस्ता ते खिलारे मंगल कार्यालय, स्फूर्ती चौक ते गडदे घर रस्ता, सांगली स्टॅंड ते तरुण भारत स्टेडियम, हॉटेल प्राईड ते बायपास रस्ता, माधवनगर रोड ते सर्किट  हाऊस, जुना कुपवाड रस्ता ते जवाहर हौसिंग सोसायटी, कुपवाड विजयनगर रेल्वे ब्रिज ते मल्हारराव होळकर चौक (सर्व हॉटमिक्‍स डांबरीकरण)

Web Title: 19 crore rupees road sanction