समृद्ध जैवविविधता...!

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 31 जुलै 2019

कोल्हापूर ‘सकाळ’च्या ३९ व्या वर्धापनदिनानिमित्त १ ऑगस्ट ते ३ ऑगस्ट दरम्यान ‘जैवविविधता’ या छायाचित्र प्रदर्शनाचे आयोजन केले आहे. एकूणच या प्रदर्शनातील कलाकृती आणि छायाचित्रकारांविषयी...

कोल्हापूर ‘सकाळ’च्या ३९ व्या वर्धापनदिनानिमित्त १ ऑगस्ट ते ३ ऑगस्ट दरम्यान ‘जैवविविधता’ या छायाचित्र प्रदर्शनाचे आयोजन केले आहे. एकूणच या प्रदर्शनातील कलाकृती आणि छायाचित्रकारांविषयी...

जंगलात गेलं की वाघ, हरण, बिबट्या, अस्वल, हत्ती दिसणारच, या आशेने सारे फिरत असतात. जंगलात गेलो आणि वाघ राहूदेच, साधा ससाही दिसला नाही, असे म्हणत बहुतेकजण नाराज होतात. याला कारण एकच ते म्हणजे जंगलाबद्दल ते पूर्ण अनभिज्ञ असतात. जंगलात फिरायचे तर वन्यप्राणी दिसण्यासाठी संयम महत्त्वाचा असतो, हे मूळ तंत्रच ते विसरून जातात. परंतु, कोल्हापुरात असा एक वन्यप्रेमी आहे की, तो स्वतःच्या नव्हे तर जंगलाच्या कलेवर फिरत राहतो. अगदी आपल्या पावलाखाली चिरडणाऱ्या पानांचाही आवाज येणार नाही, इतका संयम बाळगतो. जंगलाचाच एक घटक बनून दिवस-रात्र वावरत राहतो आणि दीर्घ प्रतीक्षेनंतर वन्यप्राण्यांचे दर्शन घडले की त्याला कॅमेऱ्यात चित्रबद्ध करतो. असे करत त्याने सारे वनवैभवच कॅमेऱ्यात साठवले आहे. रमण कुलकर्णी हे या छायाचित्रकाराचे नाव आहे. तुलाच कसे वाघ दिसतात, असे बहुतेक जण रमणला विचारतात. परंतु, एक वाघ दिसण्यासाठी, त्याला कॅमेऱ्यात टिपण्यासाठी रमणला काय काय करावे लागते, यापासून ते अनभिज्ञ असतात. 

रमण कोल्हापुरातच शिकला. वाढला. ‘कलानिकेतन’मध्ये कलेची पदवी घेतली. निसर्गाची पहिल्यापासून आवड. सुरुवातीला क्‍लिक करू लागेपर्यंत पक्षी उडून जायचा. तो नाराज व्हायचा; पण जाणकारांनी त्याला काही धडे दिले. त्यात संयम हा धडा महत्त्वाचा होता. तो तासन्‌तास कॅमेरा घेऊन उभे राहू लागला. झाडाझुडपात दडून बसू लागला. समोर वन्य प्राणी दिसला की, गडबड गोंधळ न करता किंवा स्वतः गोंधळून न जाता तो छायाचित्र टिपू लागला. अर्थात त्यामुळे त्या छायाचित्रात त्या वन्यप्राण्याचे मूळ सौंदर्य तंतोतंत उतरू लागले व रमणचे एक एक छायाचित्र जिवंत भासू लागले. 

केवळ कॅमेरा हाताळता येणे किंवा फार महाग कॅमेरा घेतला म्हणून छायाचित्र टिपता येतेच असे नाही, हा रमणचा अनुभव आहे. वन्यप्राण्यांची छायाचित्रे घेणाऱ्याला वन्यविश्‍वाचे ज्ञान पाहिजेच, असे त्याचे मत आहे. छायाचित्रे घेता घेता रमणने जंगलवाचनही केले. वाघ, बिबट्या, हत्ती, हरण, भेकर, अस्वल एवढेच काय, समोरच्या झुडपातले फुलपाखरूही आपल्या अस्तित्वाने बिथरणार नाही, याची दक्षता त्याने घेतली आणि जणू काही वन्यप्राणी रमणच्या कॅमेऱ्यासमोर उभे राहून पोझ देतात की काय, असे वाटण्यासारखी वन्यप्राण्यांची छायाचित्रे रमणने टिपली. 

ती टिपताना त्याने आजूबाजूचा निसर्गही चपलखपणे टिपला. रमण ‘ग्रीनगार्ड’ या स्वयंसेवी संस्थेचा प्रमुख, ‘पगमार्क’ संस्थेचा संचालक आहे. व्याघ्रगणना, वन्यप्राणी गणना, बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटी, चांदोली, आंबा, कोयना, तिलारी येथील वन्यजीव मार्गदर्शन केंद्राच्या उभारणीतही त्याचा वाटा आहे. कोल्हापूर वन विभागात रमणची छायाचित्रे ट्रेडमार्क झाली आहेत. वन विभागाच्या अधिकाऱ्यांशी त्याचे नाते अभ्यासकाचे आहे. रमणची वन्य जीवांवरील, जैवविविधतेवरची पुस्तके जंगलाचे अंतरंग सांगणारी आहेत. त्याचे वाईल्ड कोल्हापूर, देवराई, हरियाली यशोगाथा, रोपवाटिका तंत्र मंत्र, राधानगरी गव्याचे विश्‍व, गोवा डायव्हर्सिटी हे लघुपट व माहितीपटही गाजले आहेत.

 प्रदर्शनाचे स्थळ / वेळ 
नटश्रेष्ठ बाबूराव पेंढारकर कलादालन, 
संगीतसूर्य केशवराव भोसले नाट्यगृह, कोल्हापूर.
१ ते ३ ऑगस्ट. सकाळी दहा ते सायंकाळी सात.
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: On the 19th anniversary of Sakal, a photo exhibition of Biodiversity