देशभक्तीच्या भावना जागविल्या आबालवृद्धांच्या मनामनांत

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 17 डिसेंबर 2016

कऱ्हाडला विजय दिवसात जवानांच्या पॅरामोटर रायडिंग, एरोमॉडेलिंग, लेझीम प्रात्यक्षिकांना आबालवृद्धांची दाद

कऱ्हाडला विजय दिवसात जवानांच्या पॅरामोटर रायडिंग, एरोमॉडेलिंग, लेझीम प्रात्यक्षिकांना आबालवृद्धांची दाद
कऱ्हाड - 'जय शिवाजी- जय भवानी, वंदे मातरम, भारत माता की जय,' अशा घोषणांनी मनामनांत देशभक्तीची भावना जागवत भारावलेल्या वातावरणात यंदाचा 19 वा विजय दिवस छत्रपती शिवाजी स्टेडियमवर आज दिमाखात साजरा झाला. मराठा लाइट इन्फंट्रीच्या जवानांची थरारक प्रात्यक्षिके, पॅरामोटर रायडिंग, एरोमॉडेलिंग, लष्कर आणि पोलिस दलाच्या जवानांच्या लेझीम प्रात्यक्षिकांना आज उपस्थितांची चांगलीच दाद मिळाली. विजय दिवस समारोहातील देशभक्तीचा जागर पाहण्यासाठी सातारा, सांगली, कोल्हापूर जिल्ह्यांतील आबालवृद्धांनी गर्दी केली होती.

भारतीय सैन्यदलाने बांगलामुक्ती संग्रामात मिळवलेल्या विजयाप्रीत्यर्थ निवृत्त कर्नल संभाजीराव पाटील यांच्या संकल्पनेतून कऱ्हाडला विजय दिवस समारोह दर वर्षी दिमाखात साजरा केला जातो. यंदाच्या 19 व्या विजय दिवस समारोहास मेजर जनरल राजविजेंद्र सिंग, माजी गृहमंत्री भाई वैद्य हे प्रमुख पाहुणे होते. छत्रपती शिवाजी स्टेडियमवर आज दुपारी समारोहाच्या मुख्य कार्यक्रमास प्रारंभ झाला. विजय ज्योत स्टेडियममध्ये आल्यानंतर लष्करी जवान आणि पोलिसांच्या संचलनाने प्रारंभ झाला. पोलिस अधिकारी व अन्य अधिकारी, तसेच एनसीसीच्या विद्यार्थ्यांच्या संचलनाची मानवंदना अतिरिक्त पोलिस अधीक्षक विजय पवार यांनी स्वीकारली. त्यानंतर पोदार स्कूलच्या 350 विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर गीतांवर समूहनृत्य सादर केले.

मराठा लाइट इन्फंट्रीच्या जवानांनी लेझीमची प्रात्यक्षिके सादर केली. ती सुरू असतानाच सुमारे दोन हजार फूट उंचीवरून पॅरामोटर डायव्हिंग करणारे जवान स्टेडियमच्या दिशेने झेपावले. एरीक मॅनेजीस, विजय शेट्टी, मंगेश दिघे, डॉ. वैद्य यांनी ही प्रात्यक्षिके सादर केली. त्यानंतर एरोमॉडेलिंगची प्रात्यक्षिके सादर करण्यात आली. अवघ्या 12 वर्षांच्या देवाशीष जोशी याने दाखवलेल्या प्रात्यक्षिकाने उपस्थितांची मने जिंकली. दरम्यान, पेठ वडगाव येथील विद्यार्थ्यांनी दोरीवरील उड्यांची प्रात्यक्षिके सादर केली. त्यानंतर मराठा लाइट इन्फंट्रीच्या जवानांनी थरारक कसरती सादर केल्या. यानंतर राज्य राखीव पोलिस दलाच्या जवानांनी लेझीमची प्रात्यक्षिके सादर केली. मराठा लाइट इन्फंट्रीच्या बॅण्डवादनानंतर राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता झाली. प्रा. डॉ. सतीश घाटगे, भरत कदम यांनी सूत्रसंचालन केले.

Web Title: 19th winner day