श्री क्षेत्र रेवणसिद्ध देवस्थानाला 2 कोटी 5 लाखाचा निधी मंजूर 

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 1 एप्रिल 2018

श्री क्षेत्र रेवणसिद्ध देवस्थानाच्या विकासासाठी राज्य पर्यटन विकास या योजनेतून सुमारे 2 कोटी 5 लाख रुपये मंजूर झाल्याची माहिती आमदार अनिलराव बाबर यांनी पत्रकार परिषदेत दिली.

विटा - पश्चिम महाराष्ट्रातील एक जागृत देवस्थान असणाऱ्या श्री क्षेत्र रेवणसिद्ध देवस्थानाच्या विकासासाठी राज्य पर्यटन विकास या योजनेतून सुमारे 2 कोटी 5 लाख रुपये मंजूर झाल्याची माहिती आमदार अनिलराव बाबर यांनी पत्रकार परिषदेत दिली.
आमदार बाबर म्हणाले की, श्री क्षेत्र रेवणसिद्ध हे पश्चिम महाराष्ट्रासह कर्नाटक येथील लोकांचे अढळ श्रद्धास्थान आहे. प्रत्येक सोमवारी आणि गुरुवारी येथे हजारो भाविक येत असतात. प्रत्येक वर्षी महाशिवरात्रीच्या दिवशी या देवाची खूप मोठी यात्रा भरत  असते. ही यात्रा 5 दिवस चालते. या दिवसात येथे लाखो भाविक भेट देत असतात. चैत्र महिन्यात या देवाच्या संपूर्ण परिसराला खडी घालणे म्हणजेच देवस्थानाचा संपूर्ण डोंगरासह परिसर पायी चालणे ही प्रथा आहे. यासाठीही येथे हजारो भाविक येत असतात. अशा या देवस्थानाला अद्यावत असे भक्तनिवास व त्यासाठी लागणाऱ्या सर्व सोयीसुविधा मिळवून देण्यासाठी शासनाकडे सातत्याने प्रयत्न करत होतो. त्यास 2 कोटी 5 लाख रुपये मंजूर करुन आणण्यात आपणास श्री क्षेत्र रेवणसिद्धाच्या कृपेने शक्य झाले. 

आमदार बाबर पुढे म्हणाले, मंजूर झालेल्या निधीतून भाविकांसाठी अद्ययावत असे भक्तनिवास, पिण्याच्या पाण्याची सोय या सर्व सुविधा उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. नेहमीच लोकाभिमुख व लोकहिताच्या कामांना प्राधान्य दिलेले आहे. 2014 च्या विधानसभेच्या निवडणुकीत लोकांना काही शब्ददिले होते. ते आज पूर्ण करत असताना लोकांच्या चेहऱ्यावर जे समाधान दिसते आहे, हीच माझ्या कामाची 
पोहोचपावती आहे. परंतु आपण एवढ्यावरच न थांबता अजून बराच पल्ला विकासाच्या बाबतीत गाठायचा आहे, हे आपले पुढील उद्दिष्ट आहे. त्यादृष्टीने आपण यापुढील काळातही लोकांच्या पाठिंब्यावर नक्कीच यशस्वी होऊ. याच पद्धतीने आटपाडी तालुक्यातील श्री क्षेत्र खरसुंडी येथे ही लवकरच पर्यटन विकास योजनेतून भरीव निधी मंजूर करून त्याठिकाणीही सर्व सोईसुविधा पुरविणार आहे. यासाठी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पर्यटनमंत्री जयकुमार रावल, राज्यमंत्री मदनयेरावर यांचे सहकार्य लाभले असल्याचेही त्यांनी सांगितले.

Web Title: 2 crore 5 lakhs sanctioned to Shree Area Revenue Devasthan