सांगली जिल्ह्यात महिन्यात 20 टक्के कोरोना रुग्णवाढ : सावधगिरी बाळगण्याची गरज... समूह संसर्ग झाल्याचे सर्वमान्य 

Covid Detection.jpg
Covid Detection.jpg

सांगली-  कोरोनाचा समूह संसर्ग झाल्याचे आता सगळ्यांनी मान्य केले आहे. गेल्या महिन्याभरात जिल्ह्यात कोरोनाचा प्रसार वेगाने झाला आहे. तर चाचण्यांच्या वाढलेल्या संख्येमुळे बाधितांची संख्याही मोठ्या प्रमाणात समोर येत आहे. गेल्या महिनाभरात जवळपास 20 टक्के वाढ असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे सावधगिरी बाळगण्याची गरज निर्माण झाली आहे. 

कोरोनाचा गेल्या आठ-दहा दिवसात उद्रेक झाला असून रोज बाधितांचा आकडा नऊशे ते एक हजारच्या घरात पोहोचला आहे. बाधितांचा संपर्क शोधण्याचे आव्हान प्रशासनासमोर आहे. त्यामुळे चाचण्यांचे प्रमाण वाढवण्यात आले आहे. समूह संसर्गामुळे बाधित मोठ्या प्रमाणात समोर येत आहेत. त्यातच उपचारासाठी यंत्रणा कमी पडत असल्यानेही भितीचे वातावरण आहे. सप्टेंबरच्या आकडेवारीचा विचार केला तर गेल्या 12 दिवसात मृत्यूदर घटल्याचे दिसते. 

महिनाभरात 15 हजार रुग्ण वाढ 
प्रशासनाने चाचण्यांची संख्या वाढवण्याचा निर्णय घेतल्यानंतर 10 ऑगस्ट ते 12 सप्टेंबर या काळात आरटीपीसीआर आणि अँटीजेन चाचण्यांची संख्या वाढली आहे. या काळात एकूण 75534 चाचण्या करण्यात आल्याअसून त्यामध्ये 14926 जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले आहेत. चाचण्यांच्या तुलनेत रुग्णवाढीचा दर 19.76 टक्के इतका आहे. विशेष म्हणजे आरटीपीसीआर चाचण्यांची संख्या कमी असूनही रुग्ण वाढ 23.75 टक्के इतकी मोठी आहे. त्यामुळे समूह संसर्ग किती मोठ्या प्रमाणात पसरला आहे हे लक्षात येते. 

चाचण्या वाढल्या मृत्यूदर घटला 
या महिनाभराच्या काळात चाचण्यांचे प्रमाण वाढल्यानंतर रुग्ण संख्याही मोठ्या प्रमाणात वाढली. मात्र व्हेंटीलेटर, ऑक्‍सिजनच्या तुटवड्यामुळे मृत्यूदराचे प्रमाण साडे चार टक्के इतके जास्त आहे. पण, दिलासादायक बाब म्हणजे या महिन्याचा विचार केला तर चाचण्या वाढल्याने मृत्यूदर घटल्याचे दिसते. शनिवारअखेर सप्टेंबरच्या 12 दिवसात एकूण चाचण्या 32927 करण्यात आल्या आहेत. यामध्ये 10156 रुग्ण पॉझिटीव्ह आले आहेत. तर 259 जणांचा मृत्यू झाला आहे. हा मृत्यूदर अडीच टक्के इतका खाली आला आहे. 

आरटीपीसीआरचे रुग्ण वाढले 
कोरोनाच्या चाचण्यांमध्ये आरटीपीसीआर चाचणी विश्‍वासार्ह मानली जाते. या चाचण्यांची संख्याही वाढवण्यात आली आहे. 10 ते 31 ऑगस्ट या काळात 24997 आरटीपीसीआर चाचण्या करण्यात आल्या. यामध्ये 4448 जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आहे. ही टक्केवारी 17.76 टक्के आहे. मात्र 1 ते 12 सप्टेंबर या काळात 11446 चाचण्या करण्यात आल्या. त्यातील 4208 रुग्णांचे अहवाल पॉझिटीव्ह आले आहेत. ही टक्केवारी 36.76 टक्के आहे. याचा फायदा मृत्यूदर घटण्यात झाला आहे. 

अँटीजेन चाचण्या दुप्पट 
ऑगस्ट महिन्यात 10 ते 31 तारखेपर्यंत केलेल्या अँटीजेन चाचण्यांची संख्या 17610 इतकी आहे. त्यामध्ये 322 जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले. ही टक्केवारी 18.17 टक्के आहे. मात्र सप्टेंबर महिन्यात या चाचण्यांची संख्या जवळपास दुपटीने वाढल्याचे दिसते. 1 ते 12 सप्टेंबरपर्यंत 21481 चाचण्या करण्यात आल्या असून यात 5948 रुग्ण पॉझिटीव्ह आले आहेत. ही टक्केवारी 27.28 इतकी आहे. 

आणखी चाचण्या वाढणार 
कोरोनाचा समूह संसर्ग सुरु आहे. त्यामुळे बाधितांचा शोध घेण्यासाठी चाचण्यांची संख्या वाढवण्यात येत आहे. यासाठी जिल्हा प्रशासन 70 हजार तर महापालिका प्रशासन 15 हजार चाचण्या करण्याचे ठरवले आहे. या चाचण्या सुरु आहेत. अँटीजेन चाचण्या जवळपास दुप्पट करण्यात आल्या आहेत. तर आरटीपीसीआर चाचण्याही दुप्पट केल्या आहेत. त्यामुळे सध्या सरासरी दिवसाला तीन हजार चाचण्या केल्या जात आहेत. यामध्ये आरटीपीसीआर चाचण्या सुमारे 1000 ते 1200 आणि अँटीजेन चाचण्या दिवसाला 1800 ते 2000 केल्या जात आहेत. यामुळे रुग्णसंख्या वाढतच जाणार असल्याने सावधगिरी बाळगण्याची गरज आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com