पहिल्या पावसात विठ्ठल गंगा प्रकल्पात वीस कोटी लिटर पाण्याचा साठा

वसंत कांबळे 
रविवार, 24 जून 2018

पहिल्याच पावसात बेंद ओढा दुथडी भरून वाहू लागला यामुळे ग्रामस्थात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले.

कुर्डू (सोलापूर) - पहिल्या पावसातच विठ्ठल - गंगा प्रकल्पाच्या सहा किलोमीटर मध्ये दुथडी भरल्याने परिसरातील नागरिकांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. या बेंद ओढ्याच्या ठिकाणी विठ्ठल गंगा प्रकल्पाच्या साखळीतील पहिले गाव ढवळस या ठिकाणी पहिल्या पावसानंतर माढा वेल्फेअर फांउडेशनचे अध्यक्ष श्री. धनराज शिंदे, सचिव युवराज शिंदे व त्यांचे सहकारी यांनी प्रकल्पस्थळी ग्रामस्थांची भेट दिली. पहिल्याच पावसात बेंद ओढा दुथडी भरून वाहू लागला यामुळे ग्रामस्थात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले.

शुक्रवार ता. 22 ला रात्री झालेल्या रात्रीच्या पावसामुळे प्रकल्पातील पहिल्या टप्प्यातील झालेल्या कामामध्ये पुर्ण क्षमतेने पाणी साठले असुन मुरण्यास सुरवात झाली. झालेल्या कामामध्ये या विठ्ठल गंगा प्रकल्पात सुमारे 20 कोटी लीटर पाणी साठल्याचा अंदाज आहे. दरवर्षी प्रमाणे कोट्यावधी लीटर इतरवेळी वाहून जाणारे पाणी यावेळी मात्र प्रकल्पाच्या कामामुळे जाग्यावरच थांबले. 

बेंद ओढ्यावरील विठ्ठलगंगा प्रकल्पाचे एकूण पाच पैकी पहिल्या टप्प्याचे काम प्रगतीपथावर असून यातील पहिले सहा किलोमीटरचे काम पूर्ण झाले असून सदर ठिकाणी पाणलोट क्षेत्रात पडलेले पाणी ओढ्याच्या रुंदीकरण व खोलीकरण केलेल्या ठिकाणी साठले. सदर ठिकाणी सुमारे सव्वा दोन लाख घनमीटर गाळ मुक्तीचे काम केवळ 75 दिवसात होऊन सुमारे 22 कोटी लीटर वाढीव पाणी साठा क्षमता या ठिकाणी निर्माण झाली होती. ती क्षमता निर्माण होण्यामध्ये महत्वाचे योगदान नाम फांउडेशन व सोलापूर जिल्हा नियोजन मंडळाने पार पाडले आहे.  

कामाच्या अनेक उद्देशांपैकी सर्वात पहिला व मुख्य उद्देश हा रेन वाटर हार्वेस्टिंग व ते पाणी जमिनीत मुरविणे हा सफल झाला. या प्रकल्पातील चालू टप्प्याच्या कामात सहभागी नाम फांउडेशन, जिल्हा परिषद, राज्य शासनाचा यांत्रिकी विभाग, संबधित ग्रामपंचायती व माढा वेल्फेअर फांउडेशन या यंत्रणाचे सर्व घटक यामुळे उत्साही झाले आहेत.

बेंद ओढ्यावरील महत्वाकांक्षी विठ्ठलगंगा प्रकल्पाच्या इतर माहिती देताना माढा वेल्फेअर अध्यक्ष धनराज शिंदे यांनी सांगितले की या प्रकल्पातील पुढील बाबीमध्ये योग्य त्या ठीकानी सिमेंट नाला बांधणे, ओढ्याच्या दोन्ही कडेला वृक्ष लागवड करून इकोफ्रेंडली व जैवविविधता झोन तयार करणे, त्या वृक्षाचे संगोपन व वाढ होताना ओढ्यातील पाण्याचे बाष्पीभवन कमीत कमी होईल याची काळजी घेणे याचा अंतर्भाव असेल. सिमेंट नाला बाधाबाबत जिल्हा परिषदेचे अध्यक्ष श्री. संजय मामा शिंदे यांचेकडे पाठपुरावा चालू असून त्या कामाला अग्रक्रमाने पूर्ण करणेबाबत त्यांनी आश्वत केलेबाबत सांगितले.वृक्ष लागवडीबाबत माढा वेल्फेअर फांउडेशन विशेष आग्रही असून वनीकरण विभागाकडे पाठपुरावा करणेबाबत नियोजित असल्याचे श्री.शिंदे यांनी सांगितले.

सदर वेळी ढवळस गावातील माजी सरपंच श्री. संतोष अनभुले, सरपंच रमेश इंगळे, उपसरपंच, सदस्य, ग्रामस्थ तसेच माढा वेल्फेअर संचालक व स्टाफ उपस्थित होते.

आपण एका क्लिकवर ताजे अपडेट्स आपल्या मोबाईलमध्येही मिळवू शकता.

Web Title: 20 million liters of water storage in the first rainy season of Vitthal Ganga