राज्यात 20 टक्‍केच वनक्षेत्र ; चारशे कोटी वृक्ष लागवडीची गरज 

तात्या लांडगे
शनिवार, 23 जून 2018

महाराष्ट्राला वाळवंट होण्यापासून वाचविण्याकरिता पडीक जमिनी, शेतकऱ्यांच्या शेतात, रस्त्यांलगत, शासकीय जमिनींवर, जलयुक्‍तच्या कामांच्या बाजूला जास्तीत-जास्त वृक्ष लागवड ही काळाची गरज आहे. वृक्ष लागवड लोक चळवळ होण्याची आवश्‍यकता आहे.

- सुवर्णा माने, विभागीय वन अधिकारी, सामाजिक वनीकरण

सोलापूर : पृथ्वीवर शांत, स्वस्थ जीवन जगायचे असल्यास जंगलाचे प्रमाण किमान 33 टक्‍के असायला हवे. परंतु, महाराष्ट्रात त्याचे प्रमाण 20 टक्‍केच असून, सोलापूर व लातूर, गडचिरोली यासह अन्य काही जिल्ह्यांमध्ये फक्‍त दोन टक्‍केच वनक्षेत्र आहे. राज्यात आणखी 13 टक्‍के वनक्षेत्र वाढण्याची गरज असून, त्यासाठी सुमारे चारशे कोटी वृक्ष लागवडीची गरज असल्याचे मत पर्यावरण तज्ज्ञांनी व्यक्‍त केले आहे. 

वृक्ष भेद नही करते है, गरीब और धनवान में, देते सभी का साथ अंत तक, जलकर भी शमशान मे या उक्‍तीप्रमाणे वृक्ष लागवड ही सामजिक बांधिलकी समजून सर्वांनी सक्रिय सहभागी होण्याची गरज आहे. भविष्यकाळातील वाळवंटरुपी संकटावर मात करुन वर्तमान काळातील आपल्या पिढीला निरोगी व सदृढ आयुष्य देण्याकरिता सर्वांनी वृक्ष लागवड हाच एकमेव पर्याय आहे.

राज्य सरकारच्या वतीने यावर्षी 13 कोटी तर पुढील वर्षात 33 कोटी वृक्षांची लागवड केली जाणार आहे. माळढोक अभयारण्याच्या क्षेत्रामुळे तसेच शेतकऱ्यांच्या जमिनी थेट रस्त्यापर्यंत असल्याने वृक्ष लागवडीसाठी क्षेत्र शिल्लक नसल्याचे तज्ज्ञांचे मत आहे. त्यावर राज्य शासनाकडून उपाय योजले जात असल्याचे समजते. 

Web Title: 20 percent forest area in the state The need for planting 400 crores of trees