‘जलयुक्‍त’साठी निवडणार २१० गावे

- विशाल पाटील
शनिवार, 4 मार्च 2017

तिसरा टप्पा; टंचाई, लोकसहभागातील कामांनुसार प्राधान्य

सातारा - जलयुक्‍त शिवार अभियानातून पहिल्या टप्प्यात जिल्ह्यातील २१५, दुसऱ्या टप्प्यात २१० गावांमध्ये जलसंधारण, जलसंवर्धनाची अनेक कामे राबविल्यामुळे यातील बहुतांश गावांत ‘जलक्रांती’ झाली. शासन, प्रशासनाने भरघोस निधी देत दमदार कामे केल्याने शिवारे जलयुक्‍त झाली आहेत. आता तिसरा टप्पा एप्रिलमध्ये सुरू केला जाणार असून, त्यासाठी २१० गावांची निवड करण्याचे उद्दिष्ट शासनाने दिले आहे. यावेळीही टंचाई, लोकसहभागातून जलसंधारणाची कामे केलेल्यांना प्राधान्य मिळणार आहे. 

‘सर्वांसाठी पाणी-दुष्काळमुक्‍त महाराष्ट्र’ कार्यक्रमांतर्गत राज्य शासनाने जलयुक्‍त शिवार अभियानाची २०१५ मध्ये धडाक्‍यात सुरवात केली. या अभियानात दहा वर्षांपासून टॅंकरग्रस्त असलेल्या गावांची प्राधान्याने निवड करण्यात आली. पहिल्या टप्प्यात जिल्ह्यातील २१५, तर २०१६ मधील दुसऱ्या टप्प्यात २१० गावांचा त्यात समावेश झाला. संबंधित गावांत सिमेंट बंधारे, माती नालाबांध, डीपसीसीटी, कम्पार्टमेंट बंडिंग, एकात्मिक पाणलोट, ओढाजोड प्रकल्प, शेततळी आदी प्रकारांतील हजारो कामे झाली. शासनाच्या निधीसह लोकसहभागातून सुमारे 

कोट्यवधींची कामे पूर्ण करण्यात आली. शिवाय या कामांसाठी अनेक देवस्थान, संस्था, कंपन्या, फाउंडेशनकडून कोट्यवधीची मदत झाली. 
‘जलयुक्‍त’ची कामे झालेल्या अनेक गावांतील टॅंकर बंद झाले, तर काही गावांतील टॅंकरच्या फेऱ्या कमी झाल्या. तेथील पाणवठे पावसाच्या पाण्याने भरू लागले आहेत. महसूल, कृषी, रोजगार हमी योजना, जलसंधारण, लघुपाटबंधारे, जिल्हा परिषद, वन आदी विभाग या गावांमध्ये एकत्रितपणे टॅंकरमुक्‍तीसाठी प्रयत्न करत आहेत. शासनाने लोकसहभागातून कामे करणाऱ्या ग्रामपंचायतींना प्राधान्य देण्याचे ठरविल्याने अभियानाला बळ मिळाले आहे. तिसऱ्या टप्प्यातील अभियानाबाबत कृषी विभागाला शासनाचे नुकतेच पत्र मिळाले. आता शिवार फेरी काढून त्याचा आराखडा बनविला जाईल. नंतर शासनाच्या निकषानुसार गावे निवडीचे काम सुरू होईल. 

आचारसंहितेचा ब्रेक

दुसऱ्या टप्प्यातील गावांत अभियानातील कामे पूर्ण झाली नसून, तीही कामे पूर्ण करावी लागणार आहे. विधान परिषद व जिल्हा परिषद निवडणुकीची आचारसंहिता लागल्यामुळे या कालावधीत कामांना ‘ब्रेक’ लागला होता. आता पूर्ववत कामे सुरू झाली आहेत. शासकीय यंत्रणेने कामाच्या दर्जाकडे लक्ष देणे आवश्‍यक आहे.

जलयुक्‍त शिवार अभियानात तिसऱ्या टप्प्यात २१० गावांचा समावेश करण्याचे लक्ष्य शासनाने दिले आहे. जिल्हाभरात एका दिवशी शिवार फेरी काढून शासनाच्या निकषानुसार गावांची निवड केली जाणार आहे. एप्रिलमध्ये कामे सुरू होतील, यासाठी प्रयत्न केले जातील. 
- जितेंद्र शिंदे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी

Web Title: 210 villages selected for jalyukta shivar