पोलंडची नवी पिढी पाहणार कोल्हापूरकर आहेत तरी कसे?

सुधाकर काशीद
सोमवार, 15 जुलै 2019

कोल्हापुरात (वळिवडे) आश्रयाला आलेल्या पोलंडवासीयांच्या मनात कोल्हापूरने आपल्याला संकटकाळात दिलेल्या आश्रयाबद्दल खूप ऋणाची भावना आहे आणि त्याचा एक भाग म्हणून आपल्या देशवासीयांना तीन-चार वर्षे सुरक्षित आश्रय दिलेले कोल्हापूर व कोल्हापूरकर आहेत तरी कसे, हे पाहायला पोलंडचे २२ महाविद्यालयीन युवक कोल्हापुरात येत आहेत. 

कोल्हापूर - कदाचित एखाद्या कोल्हापूरकरालाही कोल्हापूरबद्दल जेवढी आत्मीयता नसेल, तितकी कोल्हापूरबद्दलची आत्मीयता पोलंडच्या देशवासीयांना किती आहे, याची प्रचीती आज येणार आहे. दुसऱ्या महायुद्धाच्या काळात (१९४२ ते ४७) निर्वासीत म्हणून कोल्हापुरात (वळिवडे) आश्रयाला आलेल्या पोलंडवासीयांच्या मनात कोल्हापूरने आपल्याला संकटकाळात दिलेल्या आश्रयाबद्दल खूप ऋणाची भावना आहे आणि त्याचा एक भाग म्हणून आपल्या देशवासीयांना तीन-चार वर्षे सुरक्षित आश्रय दिलेले कोल्हापूर व कोल्हापूरकर आहेत तरी कसे, हे पाहायला पोलंडचे २२ महाविद्यालयीन युवक कोल्हापुरात येत आहेत. 

कोल्हापूरच्या मातीला सलाम करण्याची त्यांची ही भावना आहे. विशेष हे, की तेथील शालेय अभ्यासक्रमातही पोलंडने दुसऱ्या महायुद्धात अनुभवलेल्या चटक्‍यांचा इतिहास समाविष्ट केला आहे आणि त्यात कोल्हापूरचाही विशेष उल्लेख केला आहे. या पार्श्‍वभूमीवर महाविद्यालयीन विद्यार्थ्यांची एक तुकडीच उद्या थेट कोल्हापुरात येत आहे.

निर्वासित म्हणून त्यांचे पूर्वज ७७ वर्षांपूर्वी कोल्हापुरात वळिवडे येथे जेथे निर्वासित वसाहतीत राहत होते, त्या वसाहतीला ते उद्या भेट देणार आहेत आणि त्यांचे जे पूर्वज कोल्हापुरातील वास्तव्याच्या काळात मृत्युमुखी पडले व जेथे त्यांना दफन केले, त्या दफनभूमीस जाऊन ते पुष्पचक्र अर्पण करणार आहेत. आपल्या पूर्वजांची आठवण ठेवण्याचा हा प्रसंग. उद्या सकाळी दहाला संगम िचत्रपटगृहाच्या मागे असलेल्या ख्रिश्‍चन दफनभूमीला भेट देणार आहेत. 

दुसऱ्या महायुद्धाच्या काळात संपूर्ण पोलंड देशवासीय आपला देश सोडून आश्रयासाठी अन्यत्र गेले होते. त्यातले साधारण अडीच ते तीन हजार पोलंडवासीयांना वळीवडे येथे ठेवले होते. त्यांच्यासाठी स्वतंत्र चाळ वजा घरे बांधली होती. तेथे हॉस्पिटल, करमणूक केंद्र, आरोग्य, टपाल, प्रोव्हिजन स्टोअर्स, मैदान अशा तात्पुरत्या सुविधाही केल्या होत्या. तेथे चार वर्षे हे निर्वासित राहिले. त्या काळात त्यांना तेथे चांगला आधार मिळाला. आपल्या देशावर झालेले आक्रमण नातेवाइकांची झालेली ताटातूट या अवस्थेत हजारो मैल दूर कोल्हापुरात राहणाऱ्या निर्वासितांची काळजी कोल्हापूरकरांनी घेतली. महायुद्ध संपले आणि टप्प्याटप्प्याने हे पोलंडला परत गेले. 

त्यानंतर त्यांच्यासाठी बनवलेल्या छावण्यात सिंधी निर्वासित, कोयनाग्रस्त राहू लागले. यांना गांधीनगर म्हणून ओळखले जाऊ लागले. या वस्तीचे स्वरूप बदलले आता एक किंवा दोन-तीन त्या काळातील खोल्या अस्तित्वात आहेत. बाकी सगळे गांधीनगर झकपक झाले आहे, पण त्याच्या आड एक निवारा लपला आहे आणि तो निवारा त्याकाळात किती मोलाचा होता. याचे महत्त्व फक्त पोलंडवासीयांनाच माहीत आहे. म्हणूनच ते तो काळ उलटल्यानंतरही आज कोल्हापुरात येऊन कोल्हापूरबद्दलचे ऋण व्यक्त करणार आहेत. 

वळिवडेत स्मृती दालन करणार
वळिवडे येथे पोलंडवासीय येथे राहत होते, तेथे एक स्मृती दालन करण्यात येणार आहे. जिल्हा नियोजन व विकास मंडळातून त्यासाठी निधी उपलब्ध केला जाईल. खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी त्यासाठी पुढाकार घेतला आहे. 

पोलंड विद्यार्थ्यांचा दौऱ्याचा कार्यक्रम
सकाळी आगमन, साडेनऊला संगम चित्रपटगृहाच्या मागे असलेल्या ख्रिश्‍चन दफनभूमीला भेट, सेंट झेव्हियर हायस्कूल व शिवाजी विद्यापीठाला भेट, भोजन, दुपारी दोनला वळिवडे वसाहतीस भेट, रात्री नवीन राजवाड्यावर शाहू छत्रपतींशी भेट, मंगळवारी सकाळी अंबाबाई मंदिर दर्शन व पन्हाळा भेट, रात्री कर्नल विजयसिंह गायकवाड यांच्या निवासस्थानी भेट, बुधवारी औरंगाबादकडे रवाना.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 22 college students of Poland on Kolhapur tour