इचलकरंजीतील  'या' बॅंकेत 24 कोटींचा अपहार 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 13 नोव्हेंबर 2019

काय घडले? 
- लेखापरीक्षणात अपहार उघड 
- वसंतराव नाईक सूतगिरणीच्या नावे खाते 
- कागदपत्रे, शिक्का, लेटरहेड बनावट 
- 2011 ते 31 मार्च 2018 पर्यंत डल्ला  

इचलकरंजी - बनावट कर्ज प्रकरणातून तब्बल 24 कोटी 40 लाखांचा अपहार केल्याप्रकरणी शिवम सहकारी बॅंकेचे अध्यक्ष, संचालक मंडळ, अधिकारी व कर्मचारी अशा तब्बल 37 जणांवर येथील शिवाजीनगर पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद झाला. 

पोलिसांनी या संदर्भात दिलेली माहिती अशी

सोलापूर येथील वसंतराव नाईक भटक्‍या विमुक्त जाती-जमाती सूतगिरणीच्या नावावर बनावट कागदपत्रांच्या आधारे कर्ज प्रकरण करून हा अपहार करून फसवणूक केल्याचे स्पष्ट होत आहे. या प्रकरणी चार्टर्ड अकौंटंट लक्ष्मण शंकर हरगापुरे (वय 45, रा. पुणे) यांनी फिर्याद दिली आहे. 

यांच्याविरोधात गुन्हा नोंद

या प्रकरणी अध्यक्ष अभिजित माधवराव घोरपडे (कोल्हापूर), मुख्य कार्यकारी अधिकारी प्रशांत बाबासाहेब चव्हाण (मिरज), संचालक सुरेंद्र मधुकर चौगुले (अंकलखोप, ता. पलूस), उदयसिंग प्रतापराव शिंदे (अर्दाळ, ता. आजरा), सुरेंद्र सूर्यकांत काळे (कडेपूर, ता. कडेगाव), शिवाजी शेळके (कोरोची, ता. हातकणंगले), जयदीप हनुमंतराव घोरपडे (ंमंगळवार पेठ, कोल्हापूर), रामचंद्र भाऊ वांगणेकर (आर्दाळ, ता. आजरा), सुनील पोपट रेणुसे (रेणुकशेवाडी, ता. कडेगाव), पतंगराव शिवाजी यादव (कडेपूर), जितेंद्र वसंतराव करांडे (शाळगाव), राजाराम आकाराम तंवर (हिंगणगाव), शिवाजी मारुती लोहार व विद्या मोहन यादव (दोघे गावभाग, इचलकरंजी), सविता अविनाश यादव (नाईक मळा), सुखदेव उत्तम पवार (बोंबाळेवाडी), सुहास पांडुरंग बुगड, विजयकुमार भानुदास पांढरपट्टे, विश्‍वजित वसंतराव देसाई, कृष्णराव बळवंत कवठेकर, नंदकुमार वसंतराव देसाई, रायगोपाल भंवरलाल लोया, संदेश यशवंत दळवी, नितीन गोपीनाथ खेडकर, अनिल विठ्ठलराव कुऱ्हाडे, लक्ष्मण धोंडीबा कांबळे, संजय अप्पासाहेब जुवे, सीमा शांताराम मांगले, विजयमाला शांताराम पाटील, कुबेर अप्पासाहेब पाटील, व्यवस्थापक नसीमा कादर तहसीलदार, रोखपाल शिवानंद शंकर नकाते, अधिकारी वसंत अच्युतराव हुक्केरी, अशोक चंद्रकांत सावरतकर, लिपीक रावसाहेब बाळासाहेब ऐतवडे, रत्नाप्पा वसंत अदुके, कर सल्लागार मनोज जोशी यांच्याविरोधात गुन्हा नोंद झाला आहे. 

बँकेत बनावट खाती

तक्रारदार हरगापुरे चार्टर्ड अकौंटंट आहेत. शासनाकडून शिवम बॅंकेच्या लेखापरीक्षणाची जबाबदारी त्यांच्याकडे देण्यात आली. त्यामध्ये या बनावट कर्जप्रकरणाची माहिती पुढे आली. सोलापूर येथे वसंतराव नाईक भटक्‍या विमुक्त जाती-जमाती सूतगिरणी ही संस्था आहे. या संस्थेच्या नावे बॅंकेमध्ये बनावट कर्ज खाते उघडले. त्यासाठी संस्थेची बनावट कागदपत्रे, शिक्का, लेटरहेड यांचा वापर करण्यात आला. खोट्या सह्या केल्या.

या कर्ज खात्यावर खोट्या नोंदी करून तब्बल 24 कोटी 40 लाख 40 हजार 799 रुपयांचा अपहार केल्याचे पुढे आले. विशेष म्हणजे, बॅंकेचे अंतर्गत लेखापरीक्षण करण्यात आले. त्याबाबतचे रोख स्वरूपात बिल दिले; पण त्या संदर्भातील कागदपत्रे प्राप्त झाली नाहीत, असे तक्रारीत नमूद करण्यात आले. 2011 ते 31 मार्च 2018 या कालावधीत हा प्रकार घडला आहे. या प्रकरणी अद्याप कोणासही अटक करण्यात आलेली नाही. पोलिस निरीक्षक ईश्‍वर ओमासे तपास करीत आहेत. 

काय घडले? 
- लेखापरीक्षणात अपहार उघड 
- वसंतराव नाईक सूतगिरणीच्या नावे खाते 
- कागदपत्रे, शिक्का, लेटरहेड बनावट 
- 2011 ते 31 मार्च 2018 पर्यंत डल्ला  

 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 24 Cores Fraud In Shivam Bank Ichalkaranji