अवहेलना झेलली...शांतिनगर वस्ती घडवली!

5jan17-kop
5jan17-kop

उचगावकडून हुपरीकडे जाताना रात्री या वस्तीवरून जायलाही लोक घाबरायचे. कारण फासेपारधी म्हणजे गुन्हेगारच आणि ते आपल्याला लुटणारच, अशीच भीती निष्कारण बहुतेकांनी घेतलेली. हे फासेपारधी त्यांचं नवं जग बनवायला इथं आलेत हे कोणाला पटायचंच नाही; पण जाणा-येणाऱ्यांच्या शंकास्पद नजरांना तोंड देत देत या वस्तीतल्या रहिवाशांनी अत्यंत चांगला बदल घडवून दाखवला. आज ही शासनाने गौरवलेली आदर्श वस्ती बनली आहे. स्वच्छता, वृक्षारोपण, वृक्षसंगोपन आणि पर्यावरण रक्षण अशा सर्व अंगांनी ही वस्ती आदर्श ठरली आहे. ही वस्ती पाहायला लोक अगदी खास येतात.

कोल्हापूर जिल्ह्यातील उचगाव-हुपरी रस्त्यावरील ‘शांतिनगर’ या परिसराची ही यशोगाथा. अगदी चार-चौघे वगळता बाह्य जगाची कोणतीही ओळख नसलेल्या या वस्तीतील लोकांनी स्वप्रयत्नातून हे घडवून दाखवले. साधारण पर्यावरण दिन जवळ आला, की बहुतेक ठिकाणी पर्यावरण दिनाची तयारी सुरू होते. फलक, व्याख्याने, रॅली, एकदिवस सामूहिक सफाई अशा पारंपरिक कार्यक्रमाचे आयोजन केले जाते; पण शांतिनगर वस्तीत रोजच्या रोज पर्यावरणाचे रक्षण केले जाते, म्हणूनच एखाद्या उच्च श्रीमंत कॉलनीपेक्षाही स्वच्छ आणि सुंदर वसाहत म्हणून ही वस्ती ओळखली जाते.

साधारण १२० घरे असलेल्या वस्तीत फासेपारधी कुटुंबीय रहातात. चाळीस वर्षांपूर्वी ती येथे राहायला आली तेव्हा खूप गदारोळ उठला. काही गुन्हेगार म्हणून सर्वच गुन्हेगार अशा नजरेने त्यांना पाहिले जाऊ लागले. त्यांना कोणी कामावरही घेत नसे; पण या अवहेलनेला वस्तीमधील रहिवाशांनी संयमाने तोंड दिले. उचगाव ग्रामपंचायतीनेही त्यांना चांगले सहकार्य केले. कै. आण्णाप्पा चव्हाण, गणेश काळे यांनी पुढाकार घेत शासन दरबारी या वस्तीचे प्रश्‍न मांडले. आमच्यावरील शिक्का पुसून आम्हाला कष्टकरी नागरिक म्हणून जगायचे आहे, हाच सूर त्यांनी प्रत्येक निवेदनातून मांडला.

हे करताना वस्तीने स्वयंःशिस्त लावून घेतली. रोजच्या रोज सर्व रस्ते साफ, सांडपाण्याची निर्गत, रस्त्याकडेला वृक्षारोपण, अधूनमधून फुलझाडे, श्रमदानाने विहीर, दारूबंदी, मांसाहाराऐवजी शाकाहारी जत्रा आणि ग्रामपंचायत निवडणुकीत एकमताने उमेदवार निवड ही पद्धत सातत्याने पाळली. आज ही वस्ती फासेपारध्यांची आहे हे कोणाला सांगूनही पटत नाही. एवढे स्वच्छ रस्ते व इतकी नीटनेटकी वसाहत जिल्ह्यात क्वचितच कोठेतरी आहे. आता ही आदर्श वस्ती पहाण्यासाठी, अभ्यास करण्यासाठी कॉलेजचे विद्यार्थी येतात. ग्रामीण जीवनाचा अभ्यास करणारे अभ्यासक येतात आणि आदर्श वसाहतीची संकल्पपूर्ती झाल्याचे पाहून थक्क होतात.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com