देवस्थान समितीकडून दुष्काळग्रस्तांसाठी २५ लाख

देवस्थान समितीकडून दुष्काळग्रस्तांसाठी २५ लाख

कोल्हापूर - पश्‍चिम महाराष्ट्र देवस्थान समितीच्या वतीने दुष्काळग्रस्तांसाठी पंचवीस लाखांचा निधी दिला जाणार आहे. लवकरच मुख्यमंत्री सहायता निधीकडे समितीच्या वतीने या निधीचा धनादेश दिला जाणार असल्याचे समितीचे अध्यक्ष महेश जाधव यांनी सांगितले. 

दरम्यान, अंबाबाई मंदिर परिसरातील अतिक्रमणे हटवण्याची प्रक्रिया आजपासून सुरू झाली. महाद्वारासमोरील सर्व अतिक्रमणे महापालिका कर्मचाऱ्यांनी पोलिस प्रशासनाच्या मदतीने हटवली. काही काळ या मोहिमेला विरोध झाला. फेरीवाल्यांनी वादावादी केली. पण पुनर्वसनाची ग्वाही दिल्यानंतर अतिक्रमणे हटवली.

मंदिर परिसरातील सर्व अतिक्रमणे हटवली जाणार आहेत. या पार्श्‍वभूमीवर आज देवस्थान समिती, महापालिका व पोलिस प्रशासनाची बैठक झाली. ही मोहीम राबवताना वर्षानुवर्षे मंदिर परिसरात व्यवसाय करणाऱ्या जुन्या व्यावसायिकांवर अन्याय होणार नाही, याची खबरदारी घेताना त्यांचे योग्य ठिकाणी पुनर्वसन केले जाणार आहे. 

महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त श्रीधर पाटणकर, उपायुक्त मंगेश शिंदे, शहर अभियंता नेत्रदीप सरनोबत, पोलिस निरीक्षक प्रमोद जाधव, वाहतूक शाखेचे निरीक्षक अनिल गुजर, आरोग्य अधिकारी दिलीप पाटील, अतिक्रमण विभागाचे पंडितराव पोवार, देवस्थान समितीच्या संगीता खाडे, शिवाजीराव जाधव, सचिव विजय पोवार, शिवाजी साळवी आदींच्या उपस्थितीत बैठक झाली. त्यानंतर मंदिर परिसराची पाहणी करण्यात आली. घाटी दरवाजाच्या उजव्या बाजूकडील व्यावसायिकांना अतिक्रमण हटवण्यासाठी आठ दिवसांची मुदत देण्यात आली. सरलष्कर भवन आणि विद्यापीठ परिसरातील पार्किंगजवळील अतिक्रमणे हटवण्याबाबत यावेळी चर्चा झाली.

कासव चौकातून प्रायोगिक मुखदर्शन
श्री अंबाबाई मंदिरात सध्या गरुड मंडप आणि गणपती चौकातून मुखदर्शनाची सोय आहे. आता कासव चौकातूनही मुखदर्शनाची प्रायोगिक सोय केली जाणार आहे. उद्या (गुरुवार) दुपारनंतर सलग आठ दिवस हा प्रयोग केला जाणार आहे. त्यातून येणाऱ्या अडचणींचा विचार करून तिन्ही ठिकाणांहून मुखदर्शन सुरू ठेवण्याचा अंतिम निर्णय होणार आहे.  

‘विद्यापीठ’समोर  होणार दर्शन मंडप?
अंबाबाई मंदिर विकास आराखड्यांतर्गत दर्शन मंडपासाठी आरक्षणाची प्रक्रिया महापालिकेकडून सुरू झाली आहे. विद्यापीठ हायस्कूलसमोरील वाहनतळाचे आरक्षण काढून तेथे दर्शन मंडपासाठी प्रयत्न सुरू झाले आहेत. त्यासाठी महापालिकेने नोटीस प्रसिद्ध केली असून एक महिन्याच्या आत सूचना व हरकती मागवण्यात आल्या आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com