कोल्हापूर - वैभववाडी रेल्वेमार्गासाठी 250 कोटी 

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 4 फेब्रुवारी 2017

या निर्णयाबद्दल श्री. महाडिक यांनी रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांचे आभार मानले आहेत. कोल्हापूरच्या दृष्टीने हा निर्णय महत्त्वाचा आहे. या मार्गामुळे व्यापार व पर्यटनातही वाढ होणार आहे. दरम्यान, हातकणंगले ते इचलकरंजी असा आठ किलोमीटरचा नवीन रेल्वेमार्गही मंजूर झाला आहे.

कोल्हापूर - कोल्हापूर-वैभववाडी रेल्वेमार्गासाठी अर्थसंकल्पात 250 कोटींची तरतूद करण्यात आल्याची माहिती खासदार धनंजय महाडिक यांनी आज प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे. दरम्यान, हातकणंगले ते इचलकरंजी या आठ किलोमीटर लांबीच्या रेल्वेमार्गालाही अर्थसंकल्पात मंजुरी देण्यात आली आहे, त्यामुळे वस्त्रनगरी इचलकरंजी रेल्वेने जोडली जाणार आहे. 

कोल्हापूर रेल्वेमार्गे कोकणशी जोडण्याचा प्रस्ताव गेली अनेक वर्षे प्रलंबित आहे; पण यंदा कोल्हापूर-वैभववाडी या रेल्वेमार्गासाठी निधीची तरतूद अर्थसंकल्पात करण्यात आल्याने हा प्रकल्प मार्गी लागेल. हा प्रकल्प पूर्ण व्हावा यासाठी आपण खासदार झाल्यापासून वारंवार पाठपुरावा केला आहे. संसदेत आवाज उठवला आहे. तत्कालीन रेल्वेमंत्री सदानंद गौडा, विद्यमान रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांना भेटून पाठपुरावा केला होता. परिणामी मागील वर्षाच्या अर्थसंकल्पात हा मार्ग मंजूर झाला. यंदाच्या अर्थसंकल्पात 250 कोटींचा निधी प्राप्त झाल्याने या पाठपुराव्याला खऱ्या अर्थाने यश आल्याचे श्री. महाडिक यांनी पत्रकात म्हटले आहे. 

या निर्णयाबद्दल श्री. महाडिक यांनी रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांचे आभार मानले आहेत. कोल्हापूरच्या दृष्टीने हा निर्णय महत्त्वाचा आहे. या मार्गामुळे व्यापार व पर्यटनातही वाढ होणार आहे. दरम्यान, हातकणंगले ते इचलकरंजी असा आठ किलोमीटरचा नवीन रेल्वेमार्गही मंजूर झाला आहे. त्यामुळे वस्त्रनगरी इचलकरंजी रेल्वेच्या नकाशावर आली आहे. त्याचा लाभ वस्त्रोद्योगातील सर्वच घटकांना व सामान्यांना होईल, असा विश्‍वास श्री. महाडिक यांनी या पत्रकात व्यक्त केला आहे. केंद्र सरकारच्या या निर्णयामुळे इचलकरंजीकरांची प्रदीर्घ काळाची मागणी मंजूर झाली आहे. पुढील कालावधीतही कोल्हापूर जिल्ह्यासाठी नवीन रेल्वे गाड्या, रेल्वे स्टेशनचे नूतनीकरण आणि प्रवाशांसाठी इतर सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न करण्याची ग्वाही श्री. महाडिक यांनी दिली आहे.

Web Title: 250 crore sanctioned to kolhapur-vaibhavwadi railway line