25 हजार अमेरिकन डॉलर्सची "ही' आंतरराष्ट्रीय स्पर्धा सोलापूरात

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 27 नोव्हेंबर 2019

स्पर्धेतील देशनिहाय खेळाडूंची यादी 
भारत -25, चीन -4, रशिया-5, नॉर्वे- 1, लॅटविया-1, अर्जेटिना-1, पोलंड-1, ग्रीस-1, जपान-2, ग्रेट ब्रिटन-5, युक्रेन-2, इजिप्त-1, तुर्की-1, इटली-2, थायलंड-2, इज्राईल-1, अमेरिका-1 असे एकूण 56 खेळाडूृ  

सोलापूर : महाराष्ट्र राज्य लॉन टेनिस असोसिएशन व सोलापूर जिल्हा लॉन टेनिस असोसिएशन यांच्यातर्फे महिलांच्या जागतिक मानांकन लॉन टेनिस स्पर्धेचे सोलापुरात आयोजन करण्यात आले आहे. "प्रिसिजन सोलापूर ओपन वूमन्स आयटीएफ टेनिस टूर्नामेंट' असे या स्पर्धेचे नाव असून त्यामध्ये 25 हजार अमेरिकन डॉलर्स इतक्‍या रकमेची पारितोषिके आहेत. कुमठा नाका येथील जिल्हा क्रीडा संकुलातील एम.एस.एल.टी.ए. टेनिस सेंटर येथे 1 ते 8 डिसेंबर दरम्यान ही स्पर्धा होणार आहे. 

महाराष्ट्र राज्य लॉन टेनिस असोसिएशनचे संयुक्त सचिव राजीव देसाई यांनी पत्रकार परिषदेत स्पर्धेबाबत माहिती दिली. या वेळी प्रिसिजन 
उद्योगसमूहाचे अध्यक्ष यतिन शहा, डॉ. सुहासिनी शहा उपस्थित होत्या. या स्पर्धेचे उद्‌घाटन रविवारी (ता. 1 डिसेंबर) सायंकाळी 4.30 वाजता उस्मानाबादच्या जिल्हाधिकारी दीपा मुधोळ-मुंडे, आमदार प्रणिती शिंदे, महाराष्ट्र राज्य क्रीडा व युवक सेवा संचालनालयाचे सहसंचालक डॉ. जयप्रकाश दुबले यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे. 

हेही वाचा : धोनीचे मार्चमध्ये पुनरागमन?

लॉन टेनिस खेळाचा प्रसार व प्रचार 
सोलापूरसह आजूबाजूच्या जिल्ह्यांमध्ये लॉन टेनिस खेळाचा प्रसार व प्रचार व्हावा आणि सोलापूरचा नावलौकिक जागतिक पातळीवर व्हावा या उद्देशाने ही स्पर्धा आयोजिण्यात आली आहे. या स्पर्धेसाठी आंतरराष्ट्रीय टेनिस फेडरेशनने श्रीलंकेच्या धारका इलावाला यांची सामना पर्यवेक्षक तर राज्य संघटनेचे संयुक्त सचिव राजीव देसाई यांची सामना संचालक म्हणून नियुक्ती केली आहे. तसेच पंच म्हणून अखिल भारतीय लॉन टेनिस संघटनेने पुणे येथील श्रीराम गोखले तसेच कोलकाता येथील अतनु चक्रवर्ती, हिमांशू मलिक व धर्मेंद्र सिंग यांची नियुक्ती केली आहे. 

हेही वाचा : सॅफ स्पर्धेवर भारताचा बहिष्कार? 

17 देशांमधील 56 खेळाडूंचा सहभाग 
अशा प्रकारची आंतरराष्ट्रीय स्पर्धा सोलापूरात पाचव्यांदा भरविण्यात येत असून सहभागी खेळाडूंना जागतिक मानांकन गुण मिळतील. या स्पर्धेत भारतासह 17 देशांमधील 56 महिला टेनिसपटू सहभागी होणार असून त्यापैकी 33 खेळाडू परदेशी आहेत. स्पर्धेतील एकेरी विजेत्याला प्रिसिजन कॅमशाफ्ट्‌स लिमिटेडकडून तर उपविजेत्याला जामश्री रिऍल्टी यांच्यातर्फे चषक देण्यात येईल. दुहेरीच्या विजेत्या जोडीला बालाजी अमाईन्स तर उपविजेत्या जोडीला ओऍसिस मॉल यांच्या हस्ते चषक देण्यात येईल.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: $ 25,000 "This" International Competition in Solapur