कोंबड्यांसाठी २५ हजार ऑनलाइन अर्ज

हेमंत पवार
गुरुवार, 13 डिसेंबर 2018

कऱ्हाड - शासनाच्या पशुसंवर्धन विभागाकडे कुक्‍कुटपालन योजनेत कुक्‍कुटपक्ष्यांसाठी राज्यातून तब्बल २५ हजारांवर ऑनलाइन अर्ज दाखल झाले आहेत. मात्र, त्यामधील केवळ ७८८ लाभार्थ्यांना कुक्‍कुटपालनासाठी अनुदानाचा लाभ मिळणार आहे. 

कऱ्हाड - शासनाच्या पशुसंवर्धन विभागाकडे कुक्‍कुटपालन योजनेत कुक्‍कुटपक्ष्यांसाठी राज्यातून तब्बल २५ हजारांवर ऑनलाइन अर्ज दाखल झाले आहेत. मात्र, त्यामधील केवळ ७८८ लाभार्थ्यांना कुक्‍कुटपालनासाठी अनुदानाचा लाभ मिळणार आहे. 

गेल्या काही वर्षांपासून कुक्‍कुटपालनासाठी अनुदानावर कुक्‍कुटपक्ष्यांचे वाटप लाभार्थ्यांना केले जाते. हे वाटप अनुसूचित जाती, जमाती, सर्वसाधारण व ३३ टक्के महिला अशा वर्गवारीने केले जाते. एक हजार पक्षी पालनासाठी ही योजना सुरू करण्यात आली आहे. सर्वसाधारण प्रवर्गातील लाभार्थ्याला या योजनेतील रकमेच्या ५० टक्के, तर राखीव प्रवर्गातील लाभार्थ्याला या योजनेच्या ७५ टक्के अनुदान शासनामार्फत देण्यात येते.

गेल्या काही वर्षांपासून या योजनेला चांगला प्रतिसाद मिळतो आहे. मात्र, शासन त्यासाठी पुरेशा निधीची तरतूद करत नसल्याच्या तक्रारी आहेत. यंदा या योजनेतून सर्वसाधारण प्रवर्गातील ४९८, विशेष घटक योजनेमधून मागासवर्गीय २९० लाभार्थ्यांना लाभ मिळणार आहे. गेल्या काही वर्षांत मागणीचा वाढलेली आकडेवारी लाखांच्या घरात पोचली आहे. सुमारे २५ हजारपेक्षा जास्त लाभार्थ्यांनी कुक्‍कुटपालन योजनेसाठी ऑनलाइन नोंदणी केली आहे. त्या तुलनेत मिळणारा लाभ हा हाताच्या बोटावर मोजण्याइतपतच आहे. कुक्‍कुटपालन योजना अनुदानाचा लाभ देण्यासाठी या वर्षासाठी सर्वसाधारण गटासाठी ७११ लाभार्थ्यांसाठी सात कोटी ९९ लाख ८७ हजार ५०० रुपये, तर विशेष घटक योजनेतून ४१४ लाभार्थ्यांना सहा कोटी ९८ लाख ६२ हजार ५०० रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. त्यातून ११२५ लाभार्थ्यांसाठी १४ कोटी ९८ लाख ५० हजार रुपयांची तरतूद करण्यात आली होती. मात्र, सध्या ३० टक्के निधी कपात केल्याने दहा कोटी ४८ लाख ९५ हजार रुपये उपलब्ध होणार असून, त्यातून ३३७ लाभार्थी कमी झाले आहेत.

सोडतही ऑनलाइनच! 
शासनाने यंदापासून कुक्‍कुटपालनासाठी ऑनलाइन अर्ज स्वीकारण्यास सुरवात केली आहे. त्यात रेशनिंग कार्डावरील सर्वांचीच नावे भरावी लागत आहेत. त्यामुळे आता एका कुटुंबातील एकालाच अर्ज करता येत आहे. संबंधित दाखल झालेल्या अर्जांची सोडतही आता ऑनलाइन पद्धतीनेच करण्यात येणार आहे.

Web Title: 25000 online form for hen

टॅग्स