25,000 कोरोनामुक्त; सांगली जिल्हा आज गाठणार महत्त्वाचा टप्पा 

अजित झळके
Monday, 28 September 2020

जिल्ह्यात कोरोनामुक्त रुग्णांची संख्या सोमवारी (ता. 28) पंचवीस हजारांचा टप्पा पार करेल. गेल्या सहा महिन्यांमध्ये 34 हजारांहून अधिक रुग्णांना कोरोनाची बाधा झाली आणि त्यापैकी 25 हजार रुग्णांनी कोरोनावर मात केली.

24 मार्च 2020 रोजी जिल्ह्यात पहिला कोरोना बाधित आढळला आणि त्यानंतर गेली सहा महिने जिल्हा या महामारीशी दोन हात करतोय. रोज नव्या संकटाला तोंड दिले जातेय. मृत्यूदर चिंताजनक परिस्थितीत आहे. वैद्यकीय पंढरीची सारी यंत्रणा अपुरी पडतेय. या स्थितीत सांगलीकरांनी धैर्याने तोंड देत कोरोनाला परतावून लावण्याचा लढा सुरू ठेवला आहे. जिल्ह्यात कोरोनामुक्त रुग्णांची संख्या सोमवारी (ता. 28) पंचवीस हजारांचा टप्पा पार करेल. गेल्या सहा महिन्यांमध्ये 34 हजारांहून अधिक रुग्णांना कोरोनाची बाधा झाली आणि त्यापैकी 25 हजार रुग्णांनी कोरोनावर मात केली. त्यात सर्व वयोगटातील रुग्णांचा समावेश आहे. शंका वाटल्यास तत्काळ डॉक्‍टरांना भेटणे, गरज असल्यास तपासणी करणे, अहवाल पॉझिटिव्ह येताच औषधोपचार आणि समुपदेशन या पातळीवर रुग्णांनी या संकटाला तोंड दिले आणि देत आहेत. 

जिल्ह्यात जुलै महिन्यापासून कोरोना बाधितांची संख्या प्रचंड वेगाने वाढली. या वेगावर नियंत्रण मिळवणे आजही शक्‍य झालेले नाही. मृत्यूदर सातत्याने 3.5 ते 3.75 राहिला आहे. तोही आटोक्‍यात आलेला नाही. या काळात बेडची उपलब्धता वाढवणे, ऑक्‍सिजन यंत्रणा निर्माण करणे, ग्रामीण भागात कोरोना केअर सेंटर सुरू करणे, आयसीयू बेड आणि व्हेंटिलेटरची शक्‍य तेवढी उपलब्धता करणे, यासाठी धडपड सुरू आहे. याघडीला जिल्ह्यात 2300 बेडची उपलब्धता आहे. 619 आयसीयू बेड असून, 260 व्हेंटिलेटर आहेत. प्राथमिक आरोग्य केंद्राच्या ठिकाणी सुमारे 240 बेड तयार केले आहेत. त्यामुळे बेड मिळवण्यासाठी गेल्या दोन-तीन महिन्यांत रुग्णांना जसा संघर्ष करावा लागला, तो आता कमी झाला आहे. 

81 टक्के "होम आयसोलेशन' 
सध्या 8 हजार 604 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. पैकी 6 हजार 379 रुग्ण घरी थांबून उपचार घेत आहेत. हे प्रमाण तब्बल 80.77 टक्के इतके आहे. बहुतांश रुग्ण हे 50 वर्षांपेक्षा कमी वय असलेले आणि कोणतीही गंभीर व्याधी नसलेले आहेत. त्यांनी गोळ्यांचे किट, दररोज दोनवेळा फोनवरून संपर्क, ऑक्‍सिजन पातळीबाबत सतत चर्चा, मानसिक आधार देऊन त्यांना कोरोनाशी लढाईत मदत केली जात आहे. आतापर्यंत घरीच उपचार घेणाऱ्यांतील 99.50 टक्के लोक बरे झाले आहेत. या काळात 17 दिवस महत्त्वाचे आहेत. त्यात कोरोनाचा अहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतर दहा दिवस स्वतःला एका खोलीत बाजूला ठेवणे आणि पुढे 7 दिवस खोलीबाहेर, मात्र घरीच राहणे असे टप्पे ठरलेले आहेत. सतरा दिवसांनंतर रुग्णाची तपासणी करण्याचीही गरज नाही, त्यांना कोरोनामुक्त जाहीर केले जाते. 

हट्ट करू नका 
काही रुग्ण वय 60 वर्षांपेक्षा जास्त असताना आणि गंभीर व्याधी असताना होम आयसोलेट होण्याचा आग्रह करत आहेत. हा आग्रह घातक आहे. घरात राहून उपचार घेत असताना किंबहुना रुग्णालयात दाखल करण्यास विरोध करून घरीच थांबलेल्या तीन लोकांचा मृत्यू झाला आहे. या तीनही रुग्णांनी रुग्णालयात दाखल होण्यास स्वतःहून तीव्र विरोध केला होता. त्याची चौकशीही झाली. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र डुडी यांनी वयस्कर रुग्णांनी चुकीचा निर्णय घेऊ नये, डॉक्‍टरांचा सल्ला ऐकावा, असे आवाहन केले आहे. 

मृत्यूचे प्रमाण चिंताजनक 
जिल्ह्यात कोरोनाने मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्या 1259 इतकी झाली आहे. एकूण बाधित रुग्णांच्या प्रमाणात मृत्यूदर 3.76 टक्के इतका आहे. तो चिंताजनक आहे. देशाचा मृत्यूदर 1.57, तर महाराष्ट्राचा 2.67 टक्के आहे. त्यामुळे साहजिकच, सांगली जिल्ह्यातील मृत्यूदराबाबत गंभीर परिस्थिती आहे. या पार्श्‍वभूमीवर जिल्हा प्रशासनाने उपचारांचे ऑडिट करण्यासाठी समितीची स्थापना केली आहे. महापालिका क्षेत्रात 12 तर जिल्ह्यात दहा अशा 22 समित्यांत तज्ज्ञ डॉक्‍टर असून, ते उपचार पद्धतीवर लक्ष ठेवतील. रुग्णाला व्हेंटिलेटरवर जाण्यापासून रोखण्यासाठी आता जिल्ह्यात विशेष प्रयत्न सुरू झाले आहेत.

संपादन : युवराज यादव 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 25,000 people will corona free; Sangli district will reach an important stage today