आचारसंहितेचा भंग करत केलेली बदली "मॅट'कडून रद्द

ऊर्मिला देठे : सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 16 जानेवारी 2017

मुंबई : नाशिकमध्ये पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीची आचारसंहिता असताना पोलिस निरीक्षकाची केलेली बदली महाराष्ट्र प्रशासकीय प्राधिकरणाकडून (मॅट) रद्द करण्यात आली आहे. पोलिस निरीक्षक प्रभाकर पाटील यांना मालेगावहून पुन्हा घोटीला रुजू होण्याचे अंतरिम आदेश मॅटने दिले आहेत.

महाराष्ट्र पोलिस कायदा, 1951 च्या सुधारित नियमांनुसार एका पोलिस ठाण्याला बदली झाल्यानंतर किमान दोन वर्षे बदली करता येत नाही. मात्र या नियमाला हरताळ फासत जिल्हा पोलिस अधीक्षक अंकुश शिंदे यांनी पोलिस निरीक्षक प्रभाकर पाटील यांची एका वर्षात बदली केली होती. प्रभाकर पाटील यांची जानेवारी 2016 मध्ये घोटीला बदली झाली होती. त्यानंतर 10 जानेवारी 17 ला त्यांची मालेगावला बदली करण्यात आली. जिल्हा पोलिस अधीक्षक अंकुश शिंदे यांच्या या निर्णयाला प्रभाकर पाटील यांनी मॅटमध्ये आव्हान दिले होते.

कायद्यानुसार, संबंधित अधिकाऱ्यावर फौजदारी गुन्हा दाखल असेल, विभागीय चौकशी सुरू असेल किंवा प्रशासकीय कारण अशी विशेष परिस्थिती निर्माण झाली असेल, तर पोलिस आस्थापना मंडळाच्या परवानगीने संबंधित अधिकाऱ्याची बदली करता येते. पण यातील कुठलेही कारण लागू नसतानाही, पाटील यांची बदली करण्यात आली होती. जिल्हा अधीक्षक अंकुश शिंदे यांनी आपल्या मर्जीतील अधिकाऱ्याला घोटीत बदली मिळावी, यासाठी प्रयत्न केल्याची बाब त्यांनी मॅटच्या निदर्शनाला आणून दिली.