मिरजेत नेपाळहून परतले २८ जण; एक ‘सिव्हिल’मध्ये दाखल....

सकाळ वृत्तसेवा 
मंगळवार, 24 मार्च 2020

नेपाळमध्ये सहलीला गेलेले सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यातील २८ लोक आज परतले. कवठेमहांकाळ तालुक्‍यातील नागज येथे फाट्यावर तपासणी सुरू असताना अचानक प्रवासी बस ‘दत्त’ म्हणून हजर झाली.

सांगली : नेपाळमध्ये सहलीला गेलेले सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यातील २८ लोक आज परतले. कवठेमहांकाळ तालुक्‍यातील नागज येथे फाट्यावर तपासणी सुरू असताना अचानक प्रवासी बस ‘दत्त’ म्हणून हजर झाली. त्यानंतर प्रशासनाची तारांबळ उडाली. त्यातील एक प्रवाशाला खोकला अधिक प्रमाणात होता. त्यामुळे त्याला तत्काळ सांगलीतील शासकीय रुग्णालयात दाखल केले. अन्य प्रवाशांच्या हातावर शिक्का मारून त्यांना ‘घरी थांबा’ असे सक्तीचे आदेश देण्यात आले. 

 हेही वाचा- रत्नागिरीतील विठ्ठल मंदिर इतिहासात प्रथमच बंद ​
याबाबत महापालिका प्रशासनाकडून मिळालेली अधिक माहिती अशी

सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यातील २८ लोकांना घेऊन तीर्थक्षेत्र दर्शन घडवण्यासाठी केलेली बस आज दुपारी नागज फाटा येथे आली. तेथे लोकांनी पर्यटन व तीर्थक्षेत्र दर्शनासाठी गेल्याचे सांगितले. 
त्यावर तेथील अधिकाऱ्यांनी त्यांची प्राथमिक तपासणी करून हातावर शिक्के मारले. त्यांना पुढील १४ दिवस घरीच थांबा, असे आदेश दिले. ही बस मिरजेत आल्यानंतर महापालिका उपायुक्त स्मृती पाटील यांनी वाहनाची तपासणी केली.

हेही वाचा- मुंबईतून अनेक तरूण दुचाकीवरून गावच्या दिशेने...

लोकांशी संवाद साधला. त्याआधी मिरज शहरातील आठ लोक त्यांच्या घरी रवाना झाले  होते. त्यांचे संपर्क क्रमांक मिळवून त्यांच्याशी संपर्क केला. या लोकांना पुढील १४ दिवस घरातून बाहेर पडू नका, वैद्यकीय यंत्रणा सतत संपर्कात  राहिल, असे सांगण्यात आले. त्यापैकी एकाला खोकला असल्याने तत्काळ शासकीय रुग्णालयात दाखल केले. त्यानंतर उर्वरीत प्रवासी कोल्हापूरच्या दिशेने रवाना झाले. तेथे त्यांची तपासणी करून १४ दिवसांसाठी घरातच थांबवण्यात येणार आहे. 
पोलिस उपाधीक्षक संदीपसिंह गिल यांनी संबंधित प्रवासी वाहतूक यंत्रणेला खडसावले. इतके दिवस नेपाळमध्ये फिरून आले आहात, त्याची माहिती प्रशासनाला का दिली नाही, असा जाब त्यांनी विचारला. 

पूर्ण दक्षता घेतली जात आहे

नागज फाट्यावर झालेल्या तपासणीनंतर या लोकांच्या हातावर शिक्के मारले आहेत. पूर्ण दक्षता घेतली जात आहे. अशा पद्धतीने कुणी बाहेरून आले असेल तर प्रशासनाशी संपर्क साधला पाहिजे.
-स्मृती पाटील, उपायुक्त, महापालिका


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 28 tourist returned from Nepal came in sangli marathi news