मुळीकवाडीत पाझर तलावासाठी 29 लाख; पाणीसाठ्यात 70 टीसीएमने होणार वाढ

संजय जगताप
रविवार, 13 मे 2018

पाझर तलावाच्या दुरुस्तीसाठी सुमारे 29 लाख रुपये खर्च होणार असुन तलावात 70 हजार घनमीटर पाणीसाठा होणार असल्याची माहिती कलेढोण गणाच्या पंचायत समिती सदस्या मेघा पुकळे यांनी दिली.

मायणी (जि. सातारा) - मुळीकवाडी (ता. खटाव) येथील आडवदरा शिवारातील गळती लागलेल्या पाझर तलावाच्या दुरुस्तीचे काम 
हाती घेण्यात आले आहे. त्यासाठी सुमारे 29 लाख रुपये खर्च होणार असुन तलावात 70 हजार घनमीटर पाणीसाठा होणार असल्याची माहिती कलेढोण गणाच्या पंचायत समिती सदस्या मेघा पुकळे यांनी दिली.
 
मुळीकवाडी येथील आडवदरा शिवारात 1972 च्या दुष्काळात रोजगार हमी योजनेतुन पाझर तलाव बांधण्यात आला होता. पाणलोट क्षेत्र मोठे असल्याने तेथे पाणीसाठाही चांगला होत असतो. मात्र तलावाचा बांध तळातुन कमकुवत झाल्याने पाण्याची गळती होत आहे. ती रोखण्यासाठी तलाव दुरुस्तीचे काम हाती घेण्याची मागणी परिसरातील शेतकऱी व ग्रामस्थ वारंवांर करीत होते. माजी आमदार डाॅ. दिलीप येळगावकर यांच्या माध्यमातून पाठपुरावा करुन तलाव दुरुस्तीला मंजुरी मिळवली.

दुरुस्तीसाठी 28 लाख 86 हजार रुपये मंजुर झाले आहेत. त्यामध्ये (सीओटी) चर खोदणे, पाचशे मायक्राॅनचा पाॅलिथीन पेपर घालणे, अस्तरीकरण करणे, मुरमाचा भराव चाकुन सांडव्याला काॅँक्रीटचे जॅकेटिंग करणे आदी कामे करण्यात येणार आहेत. तलावात 70 हजार घनमीटर (टीसीएम) पाणीसाठा होणार आहे. गळती दुर झाल्यानंतर आडवदरा भागासह परिसरातील विहीरींना पाणी वाढण्यास मदत होणार आहे. ते काम जुनअखेर पुर्ण करण्यात येणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. दरम्यान, तलावाच्या 
कामाचा शुभारंभ माजी आमदार डाॅ. दिलीप येळगावकर यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आला. त्यावेळी प्रमुख कार्यकर्ते मायणीचे सरपंच सचिन गुदगे, मुळीकवाडीच्या सरपंच सौ. शोभाताई मुळीक, उद्योजक जीवनशेठ पुकळे, अशोक कदम, अहिल्या प्रतिष्ठानचे अध्यक्ष सुहासबाबा पुकळे, नानासाहेब मुळीक, आकाश ओवे, महेंद्र ओवे, राम जाधव, पप्पु ओवे, जगन्नाथ कारंडे, अमोल कोल्हटकर, वडुज लघु पाटंबंधारेचे अभियंता शशिकांत फराकटे आदी मान्यवर उपस्थित होते.

आपण एका क्लिकवर ताजे अपडेट्स आपल्या मोबाईलमध्येही मिळवू शकता.

Web Title: 29 lakh sanctioned for the pajar lake in Mulikwadi