महिन्यात डिझेलमधून ३ लाखांची बचत

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 8 नोव्हेंबर 2016

वर्कशॉपमधील १४० वाहनांना जीपीएस ट्रॅकिंग सिस्टीम बसविल्याचा फायदा 

वर्कशॉपमधील १४० वाहनांना जीपीएस ट्रॅकिंग सिस्टीम बसविल्याचा फायदा 
कोल्हापूर - महापालिकेच्या वर्कशॉपमधील १४० वाहनांना जीपीएस ट्रॅकिंग सिस्टीम बसविल्यामुळे महिन्यात सुमारे पाच हजार लिटर डिझेलची बचत झाली आहे. महिन्यात ३ लाखांची ही बचत आहे. जीपीएस ट्रॅकिंग सिस्टीम बसविण्यासाठी सुमारे ८ लाख खर्च झाला आहे. सततच्या घोटाळ्यामुळे आणि काटामारीमुळे अडचणीत आलेल्या वर्कशॉपमध्ये या निमित्ताने बचतीची प्रक्रिया सुरू झाली आहे. आयुक्त पी. शिवशंकर यांनी धाडसी निर्णय घेऊन ट्रॅकिंग सिस्टीम बसविली आहे. दरम्यान, वाहनांच्या किलोमीटरमध्येही फरक पडला आहे. वाहने महापालिकेच्या कामासाठीच जास्तीत जास्त फिरत आहेत.

त्यामुळे महापालिकेतर्फे दिल्या जाणाऱ्या सेवासुविधांच्या गतीमध्ये वाढ होणार असल्याचे आयुक्त पी. शिवशंकर यांनी पत्रकारांना सांगितले.
आयुक्तांनी वर्कशॉपमधील गैरकारभाराला आळा घालण्यासाठी विविध पावले उचलली आहेत. सततच्या गैरकारभारामुळे वर्कशॉप चर्चेत आले होते. महापालिकेचे नाक म्हणून समजले जाणारे वर्कशॉप अडचणीत येणे महापालिकेच्या दृष्टीने सोयीचे नसल्याने पी. शिवशंकर यांनी वर्कशॉपमधील गैरकारभार दूर करण्याचे प्रयत्न सुरू केले. काही मुद्दे निनावी पत्रांद्वारे नगरसेवकांच्याकडे आले होते. नगरसेवकांनी सर्वसाधारण सभेत हे मुद्दे उपस्थित केल्यानंतर आयुक्तांनी याची गंभीर दखल घेऊन संबंधित प्रकरणांची चौकशी करून दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई केली. त्यानंतर एकही अधिकारी वर्कशॉपमध्ये काम करायला धजत नव्हता. अखेर नूतन सहायक आयुक्त सचिन खाडे यांच्याकडे वर्कशॉपची जबाबदारी देण्यात आली.

तेव्हापासून सायकल रिक्षा दुरुस्तीचेही काम सुरू झाले. टाकाऊ मटेरियल वापरून ५० हून अधिक सायकल रिक्षा तयार केल्या आहेत. त्याचबरोबर महापालिकेच्या वाहनांत वापरल्या जाणाऱ्या डिझेलमध्ये महिन्याकाठी ५ हजार लिटरची बचत झाली आहे. फॉगिंग मशिनसाठीही मोठ्या प्रमाणात डिझेल लागते. दरमहा दोन हजार लिटर डिझेल या मशिनसाठीच लागते. त्यामुळे या मशिनलाही आता जीपीएस ट्रॅकिंग सिस्टीम बसविले आहेत.

प्राधिकरणाबाबत दोन दिवसांत सादरीकरण
हद्दवाढीऐवजी प्राधिकरणाचा विचार करा, असा पर्याय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईत झालेल्या बैठकीत दिल्यानंतर आता लेखी सूचना मागविल्या होत्या. त्यासाठी आणखी काही दिवस मुदतवाढ मिळण्याची शक्‍यता आहे. दरम्यान, प्राधिकरणासंदर्भातले एक सादरीकरण महापालिकेने तयार केले असून दोन दिवसांत ते महापालिकेचे पदाधिकारी आणि गटनेते यांच्या बैठकीत दाखविले जाणार आहे. त्यासाठी लवकरच प्रशासन, पदाधिकारी, गटनेते यांची बैठक बोलावली जाईल, असे आयुक्तांनी सांगितले.

Web Title: 3 lakh rupees savings in diesel