रायगडावर बंदोबस्तासाठी 24 तास तीन पोलिस

सुधाकर काशीद
बुधवार, 14 डिसेंबर 2016

छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याभोवती कुंपण; तातडीच्या उपाययोजना राबविण्यास सुरवात

छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याभोवती कुंपण; तातडीच्या उपाययोजना राबविण्यास सुरवात
कोल्हापूर - रायगडावरील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यापर्यंत पोचू शकणार नाही, यासाठी कुंपण व बंदोबस्तासाठी 24 तास तीन पोलिस, अशा तातडीच्या उपाययोजना राबविण्यास सुरवात झाल्याचे महाडचे (ग्रामीण) पोलिस निरीक्षक मा. शा. पाटील यांनी आज "सकाळ'शी बोलताना सांगितले. ते म्हणाले, 'छत्रपती शिवाजी महाराज हे सर्वांचे दैवत आहे; पण या पुतळ्यावर चढून पुतळ्यासोबत सेल्फी घेणारे अनेक पर्यटक होते. कदाचित यातूनही पुतळ्याच्या तलवारीचा भाग तुटला असावा, असा प्राथमिक अंदाज आहे. त्यामुळेच पुतळ्याजवळ कोणी जाऊ शकणार नाही, अशी उपाययोजना राबविण्यात आली आहे.''

रायगडावरील पुतळ्याच्या बाबतीत नेमका एखाद्या पर्यटकाचा उत्साहच कारणीभूत ठरला असावा, असा प्रशासनाचा अंदाज आहे.

ज्या दिवशी ही घटना घडली, त्या दिवशी सकाळी साडेसात-आठ वाजताच एका शाळेची सहल रायगडावर आली होती. मुले शिवप्रेमापोटी पुतळ्यापर्यंत चढून त्यांना अभिवादन करत होती. ही सहल गेल्यावर नऊच्या सुमारास गडावरच्या पुरातत्त्व विभागाच्या कर्मचाऱ्यास तलवारीच्या पाठीमागील बाजूचा भाग तुटल्याचे ध्यानात आले. रायगड, केंद्रीय पुरातत्त्व खात्याच्या अखत्यारीत असल्याने तेथे हा प्रकार कळविला. तेथून सूचना मिळाल्यानंतर म्हणजे दुपारी तीननंतर अधिकृतपणे पोलिस ठाण्यात नोंद झाली. मात्र तत्पूर्वी ही घटना कळल्यानंतर महाड पोलिसांनी बंदोबस्त ठेवला होता.

तुटलेल्या तलवारीचा तुकडा कोठे आहे हा तपासाचा भाग आहे; पण तो मिळण्यासाठी खूप प्रयत्न करावे लागणार आहेत. कारण पुतळ्याच्या मागे तलाव व बाजूला काही अंतरावर दरी, तर आसपास खुरटी झाडे व गवत आहे. या घटनेचा तपास अलिबाग स्थानिक गुन्हा अन्वेशन विभागाकडे सोपविला असून, सध्या सहा ते सात पोलिस, एक उपनिरीक्षक रायगडवर आहेत.

Web Title: 3 police bandobast on raigad