दमदार पावसामुळे कोयना धरणात 3 टीएमसी पाण्याची भर

विजय लाड
सोमवार, 8 जुलै 2019

गेल्या चोवीस तासांत कोयना पाणलोट क्षेत्रातील कोयनानगर येथे 139 मिमी, नवजा येथे 115 मिमी, महाबळेश्वर येथे 127 मिमी पावसाची नोंद झाली आहे.

कोयनानगर : गेल्या चार दिवसांपासून कोयना धरण परिसरात दमदार पाऊस पडत आहे. त्यामुळे धरणातील पाणीसाठ्यात वाढ होऊ लागली आहे. आत्तापर्यंत धरणात 50,565 क्युसेक्स पाण्याची आवक झाली असून चोवीस तासात धरणाच्या पाणीसाठ्यात 3 टीएमसीने वाढ झाली आहे.

पाणलोट क्षेत्रात पावसाची संततधार कायमच असल्यामुळे आत्तापर्यंत धरणात एकूण 29 टीएमसी पाणीसाठा जमा झाला आहे. कोयना धरणाच्या पाणीसाठय़ात समाधानकारक वाढ झाल्यामुळे गेल्या चाळीस दिवसांपासून बंद ठेवण्यात आलेले पश्चिमेकडील वीजनिर्मितीचे प्रकल्प सुरू करण्यास राज्य शासनाने व कोयना सिंचन मंडळाने अखेर परवानगी दिली आहे.

गेल्या चोवीस तासांत कोयना पाणलोट क्षेत्रातील कोयनानगर येथे 139 मिमी, नवजा येथे 115 मिमी, महाबळेश्वर येथे 127 मिमी पावसाची नोंद झाली आहे. आज (सोमवार) दिवसभरात पाणलोट क्षेत्रात संततधार पाऊस सुरू आहे. कोयना धरणाची जलपातळी 2074.7 फूटापर्यंत वाढ झाली असून धरणात 29 टीएमसी पाणीसाठा जमा झाला आहे.

चाळीस दिवसांपूर्वी धरणात अत्यल्प पाणीसाठा असल्याने 31 मेला पश्चिमेकडील वीज प्रकल्प बंद करण्याचे आदेश जलसंपदा राज्यमंत्री विजय शिवतारे यांनी सातारा जिल्हाधिकारी यांना दिले होते. यामुळे 31 मेपासून पश्चिमेकडील 95% वीजनिर्मिती प्रकल्प बंद होते. महानिर्मिती कंपनीने बंद असणारे हे वीजनिर्मिती प्रकल्प चालू करण्याची परवानगी राज्य शासनाकडे व कोयना सिंचन मंडळाकडे मागितली होती. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 3 TMC water will be filled in Koyna dam