कोल्हापुरात उभारला 303 फूट उंच ध्वजस्तंभ

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 22 एप्रिल 2017

कोल्हापूर - देशातील सर्वाधिक उंचीच्या दुसऱ्या क्रमांकाचा (303 फूट उंच) ध्वजस्तंभ पोलिस मुख्यालयातील उद्यानात शुक्रवारी दुपारी उभा करण्यात आला. अत्याधुनिक यंत्रसामग्री व तंत्रज्ञानाचा वापर आणि कुशल मनुष्यबळाच्या आधारे हा ध्वज उभा राहिला तेव्हा हजारो उपस्थितांनी टाळ्या वाजवून या उपक्रमाचे स्वागत केले. स्तंभावर शनिवारी (ता. 22) राष्ट्रध्वजाची चाचणी घेण्यात येणार आहे. या ध्वजस्तंभावर येत्या 1 मे रोजी तिरंगा डौलाने फडकणार आहे. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पालकमंत्री चंद्रकांत पाटील उपस्थित राहणार आहेत.

वाघा सीमेवरील आटारी येथे 350 फूट उंचीचा देशातील सर्वांत मोठा ध्वजस्तंभ आहे. पोलिस मुख्यालयातील एक लाख चौरस फूट जागेत पोलिस स्मृती उद्यानाचे नूतनीकरणाचे काम सुरू आहे. याच उद्यानात देशातील दुसऱ्या क्रमांकाचा अर्थात 303 फूट उंचीचा ध्वजस्तंभ उभारण्याचे नियोजन दोन महिन्यांपूर्वी केले होते. पालकमंत्री चंद्रकांत पाटील व विशेष पोलिस महानिरीक्षक विश्‍वास नांगरे-पाटील यांनी यासाठी विशेष प्रयत्न केले. आज सकाळी सहा वाजता 50 ते 60 जणांच्या पथकाने स्तंभ उभारणीच्या कामाला सुरवात केली. त्यात माळी, कारागिरांसह अभियंत्यांचा समावेश होता. दुपारी साडेबाराच्या सुमारास तीन क्रेनच्या साहाय्याने ध्वजस्तंभ तीन फूट उंचीच्या फाउंडेशनवर उभारण्याचे काम सुरू झाले. स्तंभ उभारण्याचे काम दुपारी दोनच्या सुमारास पूर्ण झाले. उपस्थितांनी भव्यदिव्य स्तंभाचे व ते बसविणाऱ्यांचे टाळ्या वाजवून कौतुक केले. केएसबीपीचे सुजय पित्रे यांच्यासह बजाजचे मुकुंद गुरव, कॉन्ट्रॅक्‍टर सिद्धनाथ ठोकळे, जाधव इंड्रस्ट्रिजचे चंद्रकांत जाधव, उद्योजक पारस ओसवाल आदींनी या कामात सहकार्य केले.

90 बाय 60 फुटांचा राष्ट्रध्वज
राष्ट्रध्वज 90 बाय 60 फुटांचा असून त्याचे कापड डॅनियल पॉलिस्टर कंपनीचे आहे. खादीनंतर सरकारने मान्यता दिलेले हे कापड आहे. त्याचे वजन 60 ते 65 किलो इतके आहे. असे पाच ध्वज मागविण्यात आले आहेत. त्याची उद्या सायंकाळी सहा ते आठ या वेळेत चाचणी घेण्यात येणार आहे. स्तंभाजवळ दोन्ही बाजूला प्रकाशझोत, सुरक्षारक्षक आणि आठ सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात येणार असल्याचे सुजय पित्रे यांनी सांगितले.

Web Title: 303 feet national flag in kolhapur