कऱ्हाड जनता बॅकेत 310 कोटींचा अपहार, 37 जणांवर गुन्हा 

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 17 ऑगस्ट 2019

बहुचर्चीत कऱ्हाड जनता सहकारी बॅंकेत 310 कोटींच्या कर्ज वितरणात अपहार झाल्याबद्दल येथील शहर पोलिसांत विद्यमान अध्यक्ष राजेश पाटील-वाठारकर यांच्यासह 37 जणांवर गुन्हा झाला आहे. वाठारकर यांच्यासह सध्याचे संचालक मंडळ, पुण्यातील सनदी लेखापाल, चार्टड अकाऊटंट, बॅंकेचे नऊ अधिकारी, कऱ्हाडच्या बिजापुरे ग्रुपसह अन्य कर्जदारांचाही गुन्ह्यात समावेश आहे.

कऱ्हाड ः बहुचर्चीत कऱ्हाड जनता सहकारी बॅंकेत 310 कोटींच्या कर्ज वितरणात अपहार झाल्याबद्दल येथील शहर पोलिसांत विद्यमान अध्यक्ष राजेश पाटील-वाठारकर यांच्यासह 37 जणांवर गुन्हा झाला आहे. वाठारकर यांच्यासह सध्याचे संचालक मंडळ, पुण्यातील सनदी लेखापाल, चार्टड अकाऊटंट, बॅंकेचे नऊ अधिकारी, कऱ्हाडच्या बिजापुरे ग्रुपसह अन्य कर्जदारांचाही गुन्ह्यात समावेश आहे.

चिमणगाव येथील जरंडेश्वर सहकारी साखर कारखान्यास 45 कोटी, कडेगाव येथील डोंगराई सहकारी साखर कारखान्यास 55 कोटी, सांगली येथील महिपराव फडतरे ग्रुप ऑफ इंडस्ट्रीजला 112 कोटी आणि कऱ्हाडातील बिजापुरे ग्रुपला 98 कोटींची कर्जे देताना अपहार झाल्याचा आरोप आहे.

एवढी मोठी कर्जे देताना बोगस कागदपत्रे करणे, नियमबाह्य
आणि विनातारण कर्ज वाटणे असे आरोप ठेवण्यात आले आहेत. त्यानुसार बॅंकेवर 1998 च्या बेनामी व्यवहार बंदी कायद्यानुसार अन्य सात कलमान्वये गुन्हा नोंदविण्यात आला आहे. बॅंकेचे सभासद आर. जी. पाटील यांनी येथील न्यायालयात फिर्याद दाखल केली होती. त्यांच्या फिर्यादीवर न्यायमुर्ती आर. डी. गवई यांना पोलिसांना गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

कऱ्हाड जनता बॅंकेचे विद्यमान अध्यक्ष राजेश पाटील-वाठारकर यांच्यासह बॅंकेचे संचालक राजीव शाह, दिलीप चव्हाण, विकास धुमाळ, दिनकर पाटील, शंकर पाटील, प्रकाश तवटे, प्रा. शिवाजी पाटील, वसंतराव शिंदे, रमेश गायकवाड, डॉ. परेश पाटील, संजय घोक्षे, राजेंद्र पाटोळे, प्रतिभा पाटील, ज्योती शाह, अनिल यादव, संजय जाधव आदी संचालकांसह बँकेचे विद्यमान मुख्य कार्यकारी अधिकारी मारुती शितोळे, विलास सुर्यवंशी, दिपकसिंह पाटणकर, विजयकुमार डुबल, प्रदिप काळे, जनार्दन पवार, बाळासाहेब क्षीरसागर, आण्णासाहेब पाटील, नितीन साळुंखे यांच्यासह पुण्याचे सनदी लेखापाल, जी. आर. डी. एन. के अॅण्ड कंपनीचे दिपक नाझरे आणि पुण्याचे चार्टड आकौंटंट व एस.जी. पी. आर. एस असोशिएटसचे महेंद्र बोऱ्हाडे यांचाही गुन्ह्यात समावेश आहे. त्याशिवाय बँकेचे कर्जदार कऱ्हाडच्या बिजापुरे ग्रुपचे अनिसा शकील बिजापुरे, बेगम अब्दुलशक्कूर बिजापुरे, शकील अब्दुलशक्कूर बिजापुरे, अब्दुलशक्कूर हमजा बिजापुरे, रविवार पेठेतील मुश्ताक वाईकर व जब्बीन वाईकर पोतले (ता. कऱ्हाड) येथील संतोष पवार, मलकापूर येथील केसीटी कन्स्ट्रक्सनचे सुनिल आटुगडे आदी कर्जदारांचाही गुन्हायत समावेश केला आहे. 

मलकापूरच्या आर. जी. पाटील यांनी येथील न्यायालयात 27 जुलै 2019 खासगी फौजदारी गुन्हा दाखल केला होता. त्यावर येथील न्यायालयात न्या. गवई यांच्यासमोर सुनावणी झाली. त्यात चिमणगाव येथील जरंडेश्वर सहकारी साखर कारखान्यास 45 कोटी, कडेगाव येथील डोंगराई सहकारी साखर कारखान्यास 55 कोटी, सांगलीच्या महिपराव फडतरे फडतरे ग्रुप ऑफ इंडस्ट्रीजला 112 कोटी आणि कऱ्हाडातील बिजापुरे ग्रुपला 98 कोटींची कर्जे देताना अपहार झाल्याचे म्हणणे मांडण्यात आले. त्यानुसार न्या. गवई यांनी 156 (३) प्रमाणे गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले. संबधितांना मोठी कर्जे देताना बोगस कागदपत्रे करणे, नियमबाह्य आणि विनातारण कर्ज वाटणे याचा तपास करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. त्यानुसार बॅंकेवर 1998 च्या बेनाम व्यवहार बंदी कायद्यानुसार अन्य सात कलमान्वये गुन्हा नोंदवला आहे.

३८५ कोटी थकीत कर्जापैकी चौघांकडे ३१० कोटी कर्ज -

फडतरे ग्रुपला देण्यात आलेल्या कर्जामध्ये कर्जदारांची संख्या ३२ आहे. त्या सर्वांना ८६.९४ कोटींचे कर्ज देण्यात आले. सध्या त्या ग्रुपची येणारी थकबाकी १११.९७ कोटी आहे. डोंगराई सहकारी साखरकारखान्याच्या ऊसतोडणी व वाहतूक कंत्राटदार यांना दिलेल्या कर्जात १०४ लोकांचा समावेश आहे. त्या सगळ्यांना ८ कोटी १० लाखांचे कर्ज देण्यात आले. त्याची येणेबाकी ५५ कोटी आहे. चिमणगाव येथील जरंडेश्वर सहकारी साखर कारखान्याला ऊसतोडणी व वाहतूक कंत्राटदारांना दिलेल्या कर्जात १५७ लोकांचा समावेश आहे. त्याची रक्कम ३ कोटी ५४ लाख आहे सध्या कारखाना ४५ कोटींची देणेबाकी आहे. कऱ्हाडच्या बिजापूर ग्रुपला बिजापुरे फिटनेस स्टुडीओसाठी चार वेगवेगळ्या खात्यातून २५ कोटी ८७ कर्ज दिले गेले. २०१८ अखेर बँकेच्या एकूण येणे कर्ज रक्कम ३८५ कोटी पैकी या चारच ग्रुपचे ३१० कोटी कर्ज येणे बाकी आहे. त्यामुळे सभासद, ठेवीदार यांचे आतोनात व न भरून येणारे नुकसान झाले आहे, असेही फिर्यादीत म्हटले आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 310 crore fraud in karad