प्रलंबित रेशनिंगकार्डसाठी ३१ ऑगस्टची डेडलाइन

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 26 जुलै 2019

जीर्ण शिधापत्रिका बदलून देणे, संयुक्त शिधापत्रिकांचे विभक्तीकरण करणे व नवीन शिधापत्रिका तातडीने देण्यासाठी विशेष मोहीम राबवून ही कार्यवाही ३१ ऑगस्टपर्यंत पूर्ण करावी, अशा सूचना अन्न व नागरी पुरवठा विभागाने दिल्या आहेत. त्यामुळे आता प्रलंबित असणारी रेशनिंगकार्डांची प्रकरणे मार्गी लागण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. 

कऱ्हाड - जीर्ण शिधापत्रिका बदलून देणे, संयुक्त शिधापत्रिकांचे विभक्तीकरण करणे व नवीन शिधापत्रिका तातडीने देण्यासाठी विशेष मोहीम राबवून ही कार्यवाही ३१ ऑगस्टपर्यंत पूर्ण करावी, अशा सूचना अन्न व नागरी पुरवठा विभागाने दिल्या आहेत. त्यामुळे आता प्रलंबित असणारी रेशनिंगकार्डांची प्रकरणे मार्गी लागण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. 

एकत्रित कुटुंबे मोठ्या प्रमाणात विभक्त होवू लागली आहेत. त्यामुळे पूर्वी कुटुंब एकत्र असताना एकाच्या नावावर असणारी रेशिंगकार्ड कुटुंबातून विभक्त झालेल्या अन्य व्यक्तींच्या नावावर करण्यासाठी दुय्यम शिधापत्रिका काढण्यासाठी अनेकजण पुरवठा विभागाकडे अर्ज करतात. त्याचबरोबर ज्यांच्या शिधापत्रिका जीर्ण झाल्या आहेत, फाटल्या आहेत, काही कारणाने वाया गेल्या आहेत, त्यांनाही शिधापत्रिकांची गरज असते, तेही नवीन शिधापत्रिकेसाठी अर्ज करतात.

त्याचबरोबर काहीजण रेशनिंगकार्डावरील नावे कमी करण्यासाठी, वाढवण्यासाठीही अर्ज करतात. मात्र, पुरवठा विभागात गेल्यावर तेथील गर्दी, कागदांचे गठ्ठे पाहून आपले काम लवकर होईल की नाही, याबाबत सर्वसामान्यांना शंका येते. तेथील कर्मचाऱ्यांच्यापुढे असणारे काम, गर्दी आणि दैनंदिन करायचे काम याचा ताळमेळ घालताना तेथील कर्मचाऱ्यांच्या नाकीनऊ येते. त्यातच दररोज शिधापत्रिकेसाठी नवीन अर्ज दाखल होतात. त्यामुळे तातडीने शिधापत्रिका वितरित करणे शक्‍य होत नाही. त्याचबरोबर अनेकदा काही ठिकाणी तातडीने शिधापत्रिका दिल्याही जात नाहीत. त्यामुळे अनेकदा ही प्रकरणे प्रलंबित राहतात. त्यासंदर्भात विविध संघटनांनी तक्रारी केल्या होत्या. त्याची दखल खुद्द मुख्यमंत्र्यांनीच घेतली. त्यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात झालेल्या बैठकीत जीर्ण शिधापत्रिका बदलून देणे, संयुक्त शिधापत्रिकांचे विभक्तीकरण करणे व नवीन शिधापत्रिका देण्याबाबत चर्चा झाली. त्या बैठकीत मुख्यमंत्र्यांनी केलेल्या सूचनेनुसार संबंधित शिधापत्रिका तातडीने संबंधितांना मिळाव्यात, यासाठी विशेष मोहीम राबवून ही कार्यवाही ३१ ऑगस्टपर्यंत पूर्ण करावी, अशा सूचना अन्न व नागरी पुरवठा विभागाने दिल्या आहेत.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 31st August Deadline for Ration card