तरुणाईची मते ठरणार निर्णायक ; सातारा जिल्ह्यात 35 हजार नवमतदार

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 24 सप्टेंबर 2019

वाढलेल्या नवमतदारांची संख्या माण, सातारा, वाई आणि फलटण विधानसभा मतदारसंघांत जास्त आहे. 
 

सातारा : विधानसभा निवडणुकीत नव्याने समाविष्ट झालेली तरुणाईची मते या वेळेस निर्णायक ठरणार आहेत. जिल्ह्यात 35 हजार नवमतदारांची नोंद झाली आहे. या वेळेस 25 लाख 21 हजार 165 मतदार विधानसभा निवडणुकीत मतदान करणार आहेत. या वाढलेल्या नवमतदारांची संख्या माण, सातारा, वाई आणि फलटण विधानसभा मतदारसंघांत जास्त आहे. 

लोकसभेनंतर होणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीसाठी जिल्ह्यात 25 लाख 21 हजार 165 मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. यामध्ये 12 लाख 86 हजार 639 पुरुष आणि 12 लाख 34 हजार 507 स्त्री मतदारांचा समावेश आहे. सर्वाधिक मतदार माण-खटाव मतदारसंघात तीन लाख 40 हजार 97 इतके आहेत. त्यापाठोपाठ सातारा मतदारसंघात तीन लाख 36 हजार 209 मतदारांचा समावेश आहे. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत 24 लाख 84 हजार 39 मतदार होते. आता विधानसभेसाठी 25 लाख 21 हजार 165 मतदार झाले असून, तब्बल 35 हजार मतदार वाढले आहेत. 

विधानसभा मतदारसंघनिहाय मतदारांची संख्या अशी आहे.
फलटण : तीन लाख 31 हजार 561, वाई : तीन लाख 31 हजार 44, कोरेगाव : दोन लाख 98 हजार 547, माण : तीन लाख 40 हजार 97, कऱ्हाड उत्तर : दोन लाख 92 हजार 39, कऱ्हाड दक्षिण : दोन लाख 91 हजार 832, पाटण : दोन लाख 99 हजार 836, सातारा : तीन लाख 36 हजार 209 मतदारांचा समावेश आहे.

मागील (2019) लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादीचे उमेदवार उदयनराजे भोसले हे दीड लाखांवर मतांनी निवडून आले. त्यावेळी सातारा लोकसभा मतदारसंघात 91 हजार 768 नवीन मतदार वाढले होते. आता विधानसभा निवडणुकीपर्यंत 35 हजार नवमतदार वाढले आहेत. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 35,000 new youngsers voters in Satara district